रेल्वेबरोबरच सांभाळली शेतशिवाराची जबाबदारी

रेल्वेबरोबरच सांभाळली शेतशिवाराची जबाबदारी
रेल्वेबरोबरच सांभाळली शेतशिवाराची जबाबदारी

मध्य रेल्वेमध्ये ट्रेन मॅनेजर या पदावर कार्यरत असणारे रामराव जगताप यांनी आंबळे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील शेतीमध्ये बाजारपेठेचा अंदाज घेत पीक बदल केला. बाजारपेठेची मागणी आणि नियोजनाच्यादृष्टीने त्यांनी कोथिंबीर, झेंडू, शेवंती, चारा पिकांच्या लागवडीवर भर दिला. रेल्वेमधील नोकरी सांभाळून शेती विकासाचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.

रामराव लक्ष्मण जगताप हे सध्या मध्य रेल्वेमध्ये पुणे कार्यक्षेत्रात ट्रेन मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. रेल्वेगाडी सुटणाऱ्या स्थानकापासून ते पोचण्याच्या स्थानकापर्यंत गाडीची पूर्ण जबाबदारी त्यांना ट्रेन मॅनेजर म्हणून सांभाळावी लागते. कार्यालयीन नियोजनानुसार जगताप यांना कधी पुणे- मिरज, पुणे-लोणावळा, पुणे- दौंड आदी मार्गावर जावे लागते. कधी मालगाडी सोबतही जावे लागते.  दर आठवड्याला त्यांना कामकाजानुसार ३० तासांची सुटी मिळते. अशी सुटी मिळाल्यानंतर जगताप पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागात असलेल्या आंबळे (जि. पुणे) गावशिवारातील शेती नियोजनात रमतात. या काळात भाजीपाला पिकांना पाणी, खते व्यवस्थापन, कीटकनाशकांची फवारणी तसेच पिकांच्या नियोजनानुसार मशागतीची कामे करून घ्यावी लागतात. नोकरी सांभाळून, तसेच घरातील लोकांना शक्य होईल, अशाप्रकारे पिकांचे नियोजन त्यांनी बसविले आहे. शेतीच्या नियोजनात त्यांना वडील लक्ष्मण, आई कमल, पत्नी अंकिता आणि आजी वत्सला यांची मदत मिळते. जगताप दररोज ॲग्रोवनचे वाचन करतात. त्यातील पीक सल्ले आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव त्यांनी पीक व्यवस्थापनात उपयुक्त ठरले आहेत. असे आहे पीक नियोजन पीक लागवडीबाबत जगताप म्हणाले, की माझे सोळा एकर क्षेत्र आहे. त्यातील आठ एकर बागायती आहे. उरलेली शेती आठ महिने बागायती आहे. सध्या साडे तीन एकर ज्वारी, दीड एकर कांदा, अर्धा एकर पावटा, एक एकर मका, अर्धा एकर शेवंती आणि अर्धा एकरावर सीताफळाची बाग आहे. शेताच्या बांधावर नारळ, लिंबू, कवठ, आंबा, पपई लागवड आहे. तसेच घरगुती वापरासाठी वांगी, मिरची, कोथिंबीर, मेथीची लागवड केली जाते. काही क्षेत्रांवर पाण्याच्या उपलब्धेतनुसार गहू आणि हरभरा, भुईमूग लागवड असते. एप्रिल-मे मध्ये एक ते दीड एकरावर झेंडू, शेवंतीची लागवड करतो. ही फुले गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांना काढणीस येतात. पूर्वी मटार, टोमॅटो लागवड करायचो. पंरतु, बाजारपेठेत मिळणारा दर आणि वाढत्या व्यवस्थापन खर्चामुळे या पिकांची लागवड बंद केली. गेल्या चार वर्षांपासून भाजीपाला, फुलशेतीवर भर दिला आहे. कोथिंबीर मुख्य हंगामी पीक  बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जगताप यांनी कोथिंबीर लागवडीस सुरवात केली. याबाबत ते म्हणाले, की कोथिंबीर करताना बाजारातील आवक स्थिती, परिसरातील लागवड क्षेत्राचा अंदाज घेतो. रेल्वेतील फिरतीच्या नोकरीमुळे बाजारपेठेचा अंदाज येतो. कोथिंबीर हे माझे मुख्य हंगामी पीक झाले आहे. एप्रिल- मे हंगामात कोथिंबिरीची लागवड करतो. दरवर्षी दोन एकरावर टप्याटप्याने दर वीस दिवसांच्या अंतराने लागवड करतो. मॉन्सूनचा पाऊस येण्यापूर्वी कोथिंबिरीची काढणी होते. या काळात कोथिंबिरीला चांगला दर मिळत असल्याने चांगला नफा मिळतो. मात्र या काळात वळीवाचे मोठे पाऊस होत असल्याने धोकाही असतो. बाजार चांगला मिळाला तर खर्च वजा जाता कोथिंबिरीतून दोन महिन्यांत ८० हजारांचे उत्पन्न मिळते. दरवर्षी मी अर्धा ते एक एकर क्षेत्रावर कांदा पात आणि मेथीची लागवड करतो. बाजार मागणी व दराचा अंदाज घेऊन मेथीची लागवड केली जाते. कांद्याचे उत्पादन घेतल्यानंतर मोठा कांदा विकून शिल्लक राहिलेला लहान कांद्याची विक्री न करता तसाच ठेवतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमीन तयार करून त्यामध्ये लहान कांदा अंथरला जातो. पहिला पाऊस पडल्यानंतर कांद्याची उगवण वेगाने होते. दीड महिन्यात कांदापातीची बाजारात भाजी म्हणून विक्री केली जाते. दरवर्षी कांदा बियाणे आणि कांद्याचे उत्पादनही घेतो. कांदा पातीच्या विक्रीतून खर्च वजा जाता वीस हजारांचा नफा मिळतो. संरक्षित पाणी नियोजन  

जगताप यांना कूपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या उपलब्ध पाण्यावर नऊ एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. परिसरात पुरंदर उपसा योजनेचे पाणी आल्याने झिरपा वाढून कूपनलिकेला पाणी असते. शेतामध्ये ५० बाय ५० मीटर आकाराचे शेततळे घेतले आहे. यंदा प्लॅस्टिक कागद टाकून हे शेततळे भरून ठेवण्याचे नियोजन आहे. उन्हाळ्यामध्ये या संरक्षित पाण्याच्या साह्याने भाजीपाला पिके घेणे शक्य होणार आहे. शेतीला पशुपालनाची जोड

जगताप यांच्याकडे दोन दुभत्या संकरीत गाई आणि दोन कालवडी आहेत. दररोज सरासरी दहा लिटर दूध डेअरीला दिले जाते. यातून दरमहा तीन हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. घरचा चारा असल्याने खाद्याचा खर्च कमी होतो. जनावरांपासून मिळणारे शेण शेतामध्ये खत म्हणून वापरल्याने रासायनिक खतासाठी लागणारा खर्च कमी होतो. गाईबरोबरच दहा गावरान कोंबड्यांचे पालन जगताप यांनी केले आहे.

सीताफळाची ४० वर्षे जुनी बाग

जगताप याची अर्धा एकरावर सीताफळाची बाग आहे. ही बाग ४० वर्षे जुनी आहे. सीताफळाची गुणवत्ता चांगली असल्याने गेल्या पाच वर्षांपासून चांगला दर मिळत आहे. झाडांची उंची वाढत असल्याने दर पाच वर्षांनी छाटणी केली जाते. छाटणीनंतर एक वर्ष उत्पादन घेतले जात नाही. त्यामुळे नवीन फुटवे चांगले फुटून उत्पादन वाढते, फळांची गुणवत्ता चांगली राहते. उत्पादित सीताफळे मुंबई, पुणे बाजारपेठेत पाठविली जातात.अर्धा एकरामधील सीताफळ बागेतून खर्च वजा जाता दरवर्षी सुमारे ८० हजारांचे उत्पन्न मिळते.

चारा पिकांवर भर

पावसाने ओढ दिल्याने यंदा चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगताप यांनी अडीच एकरांवर मका, ज्वारी या चारा पिकांची लागवड केली आहे. सध्या दीड ते दोन हजार रुपये गुंठ्याने चाऱ्याची विक्री सुरू आहे. दरवर्षी ज्वारीचे २५ क्विंटल उत्पादन होते. यंदा शिवारामध्ये खायला काही नसल्याने पक्षी ज्वारीवर येत असल्यामुळे ज्वारी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे चारा म्हणून ज्वारी विकण्यावर भर दिला आहे.

 ः रामराव जगताप, ९९७५५८९९२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com