तंत्र खोडवा व्यवस्थापनाचे...

तंत्र खोडवा व्यवस्थापनाचे...
तंत्र खोडवा व्यवस्थापनाचे...

फेब्रुवारी पूर्वी तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा. उसाचे उत्पादन प्रतिहेक्टरी ८५ ते १०० टन मिळालेले असावे. पिकात रोग, किडींचा प्रार्दुभाव नसावा. पूर्वहंगाम व सुरु लागवडीचा खोडवा ठेवावा.

उपलब्ध जातींमध्ये को ८६०३२, कोव्हीएसआय ९८०५, कोव्हीएसआय ०३१०२, व्हीएसआय ०८००५, कोएम २६५ आणि एमएस १०००१ या जातींचा खोडवा चांगला येतो. कोसी ६७१ आणि व्हीएसआय ४३४ या जातीला फुटव्याचे प्रमाण कमी असले तरी पाचट न जाळता आच्छादन करून वेळेवर खत मात्रा दिल्यास फुटवे चांगले फुटतात. लागण उसातील पाचट काढले नसेल तर एका हेक्टरमध्ये ८ ते १० टन पाचट निघते. याचा सेंद्रिय खत म्हणून चांगला उपयोग होतो. शेतामध्ये पाचट कुजविल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जिवाणूंची वाढ चांगली होते. त्यामुळे हवा, पाणी संतुलित राहून पांढऱ्या मुळ्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. कुजलेल्या पाचटातील अन्नघटक मिसळल्याने खोडव्याची वाढ चांगली होते.

पारंपरिक पद्धतीमध्ये पाचटाचे आच्छादन  

  • पारंपरिक ऊस लागण पद्धतीमध्ये ( ३ फूट ते ३.५ फूट सरी) एक आड एक सरी पद्धतीने पाचटाचे आच्छादन करावे.
  • चार फूट किंवा ४.५ फूट अंतराची सरी काढून लागवड असल्यास खोडवा पिकाला पाचटाचे आच्छादन व्यवस्थित करता येते. पाचट आच्छादन करताना पूर्णपणे सरीमध्ये दाबून घ्यावे.
  • बुडख्यावर पाचट ठेऊ नये. बुडखे मोकळे ठेवल्याने फुटवे चांगले फुटतात.
  • मोठ्या बांधणीपर्यंत एक आड एक सरीस पाणी द्यावे. पाणी आच्छादन केलेल्या सऱ्यांना पाणी देऊन पाचट तुडवून घ्यावे. मातीशी संपर्क आल्याने पाचट लवकर कुजते.
  • रिकाम्या सऱ्यांच्या बगला फोडून मशागत करावी.
  • बगला फोडलेल्या सऱ्यांमध्ये शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर करावा.
  • जोडओळ पट्टा पद्धत आणि रुंद सरी पद्धतीमध्ये पाचटाचे आच्छादन ः

  • जोडओळ पट्टा लागवड पद्धतीमध्ये (२.५ फूट किंवा ३ फूट जोड ओळ आणि ५ फूट किंवा ६ फूट पट्टा) सर्व पाचट बसवून घ्यावे. दोन ओळींमध्ये यंत्राच्या साह्याने बगला फोडाव्यात.
  • रुंद सरी पद्धतीत दोन सरीतील अंतर चार फूट  किंवा त्यापेक्षा जास्त ठेवले असल्यास सर्व पाचट दोन सऱ्यांमध्ये बसवून घ्यावे.
  • तुटलेल्या उसात पाचट बारीक करणारे यंत्र चालविल्यास पाच तासांमध्ये एक हेक्टरमधील पाचट बारीक करता येते. बारीक केलेले पाचट सऱ्यांमध्ये, मोकळ्या पट्ट्यात आच्छादन करावे. यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते. ट्रॅक्टरच्या साह्याने चालणारे हे यंत्र आहे. ते जमिनीला न टेकता वरच्या वर उसाचे पाचट उचलून घेऊन ते बारीक करून जमिनीवर पसरविण्याचे काम करते.
  •  पाचट कुजविण्याचे उपाय पाचटावर हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे.२.५ लिटर द्रवरूप पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक एक बैलगाडी शेणखतामध्ये मिसळून पाचटावर पसरावे. पाचटावर ५ ते ७ टन कुजलेली मळी किंवा शेणखत पसरल्यास चांगला परिणाम दिसून येतो.

    बुडखा छाटणी

  • ऊस डोळ्याची उगवण ही जमिनीखालून होत असल्यामुळे खोडव्यामध्ये बुडखा जमिनीलगत छाटावा. जमिनीलगत बुडखा छाटल्यास फुटवे जमिनीतून येऊन मुळावाटे अन्न, पाणी शोषून खोडव्याची वाढ चांगली होते.
  • मर रोगाच्या नियंत्रणासाठी बुडखे छाटल्यानंतर त्यावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • बगला फोडणे

  • ऊस तुटून गेल्यानंतर ८ ते १० दिवसांत बगला फोडाव्यात.हलकी, मध्यम जमीन जास्त कोरडी असल्यास हलकेसे पाणी देऊन नांगराने बगला फोडून घ्याव्यात.
  • बगला फोडल्यामुळे जुनी मुळे तुटून नवीन मुळांच्या संख्येत चांगली वाढ होते.  नवीन मुळे जमिनीतील अन्नद्रव्ये व पाणी घेऊन फुटव्यांच्या जोमदार वाढीसाठी मदत करतात.
  • जमीन ६ ते ७ दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर वरखते देऊन रिजर चालवावा. यामुळे खते मातीत मिसळतात, नंतर पाणी द्यावे.
  • पारंपरिक लागण पद्धतीमध्ये पाचट आच्छादन करून रिकाम्या राहिलेल्या एक आड एक सरीमधील बगला अंकुश नांगराने फोडाव्यात.
  • पट्टा पद्धतीमध्ये पाचट आच्छादन केल्याने २.५ फूट किंवा ३ फुटामधील जोड ओळीत बगला फोडून घ्याव्यात. रुंद सरी पद्धतीमध्ये (पाच फूट) बगला फोडण्यास थोड्याशा अडचणी येतात. पाचट व्यवस्थित लावल्यास वरंब्याच्या कडेने बगला फोडणे सुलभ जाते.
  • आंतरमशागत
  • पीक ३ ते ४ महिन्यांचे झाल्यावर रिकाम्या सरीमध्ये बळीराम नांगर चालवून रासायनिक खताचा दुसरा हप्ता देऊन रिजरच्या साह्याने मोठी बांधणी करावी. नांग्या भरणे
  • ऊस तोडणीच्या अगोदर एक महिना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एक डोळा पद्धतीने ५०० ते १००० रोपे तयार करावीत.
  • ऊस तोडणीनंतर १५ ते २१ दिवसांच्या दरम्यान नांग्या भराव्यात. नांग्या भरतेवेळी रोपाचे वय दीड महिन्याचे असावे. रोपांची पाने कात्रीने कापावीत, हाताने तोडू नयेत (वाढणारा शेंडा कापू नये).
  • नांग्या भरल्यावर रोप जगेपर्यंत एक आड एक दिवस हलके पाणी द्यावे. नांग्या भरण्यासाठी खोडव्यातील ठोंबाचा वापर करावा.
  •  ः पी. व्ही. घोडके, ९८२२०१३४८२ (कृषिविद्या विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com