जुन्या संत्रा बागेचे पुनरुज्जीवन

जुन्या संत्रा बागेचे पुनरुज्जीवन
जुन्या संत्रा बागेचे पुनरुज्जीवन

भारी जमिनीमध्ये संत्र्याची लागवड, अन्नद्रव्याची कमतरता, अयोग्य ओलीत व्यवस्थापन, मशागतीचा अभाव आदी कारणांमुळे संत्रा बागांचा ऱ्हास वेगाने होतो. बुरशीजन्य रोगाच्या (फायटोप्थोरा) प्रादुर्भावामुळे योग्य जमिनीमध्ये लावलेल्या संत्रा बागासुद्धा ऱ्हास होण्याच्या स्थितीत आहेत. अशा जुन्या, ऱ्हास होणाऱ्या बागांचे पुनरुज्जीवन केल्यास उत्पादनात व दर्जात वाढ होते.

संत्रा बागेचे योग्य खत, पाणी व कीड-रोग व्यवस्थापन फारच कमी बागायतदार करतात. तांत्रिक माहितीचा अभाव आणि तिचा योग्य वेळी वापर न करणे ही दोन त्यामागील प्रमुख कारणे आहेत.

अवेळी ऱ्हास होण्याची कारणे

  • लागवडीसाठी अयोग्य जमिनीची व कलमांची निवड
  • ओलितासाठी पाण्याची कमतरता
  • योग्य कीड - रोग व पाणीव्यवस्थापनाचा अभाव
  • मृगबहारासाठी गरजेपेक्षा जास्त ताण देण्याची प्रवृत्ती
  • झाडावरील रोगट, वाळलेल्या फांद्या न काढण्याची वृत्ती, पाणी व खते देण्याची चुकीची पद्धत
  • बागेत सुरवातीच्या काळात आंतरपीक घेण्याची प्रवृत्ती
  • योग्य मशागतीचा अभाव
  •  बागेचा अवेळी ऱ्हास टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय  

  • भारी, खोल, पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड करू नये.
  • ताण देण्याचा कालावधी हा जमिनीच्या पोतानुसार व झाडाच्या क्षमतेनुसारच ठरवावा. अतिरिक्त ताण देऊ नये.
  • रंगपूर किंवा जंबेरी खुंटावरील कलमे निवडावीत.
  • ओलिताच्या पाण्याचा खोडाशी होणारा संपर्क टाळावा.
  • आळ्यामध्ये पाणी साचू देऊ नये. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून काढावे.
  • शिफारशीनुसार एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
  • कीड व रोगांचे वेळीच नियंत्रण करावे.
  • झाडांचे वय व ताकदीनुसार झाडावर फळांची संख्या (९०० ते १०००) राखावी. झाडाच्या शक्तिपेक्षा
  • जास्त फळधारणा झाल्यास झाडे सलाटण्याचा वेग वाढतो.  
  • छाटणीचे फायदे

  • संत्रा झाडावर जोमदार फांद्यांची वाढ होते. पानांचा आकार मोठा होतो आणि पानांचा रंग गर्द हिरवा होऊन चकाकी येते.
  • संत्र्यांची फळे मोठ्या आकाराची, उत्तम प्रतीची मिळतात. फळे पातळ सालाची, घट्ट, चमकदार आणि एकसारख्या आकाराची मिळतात. फळांना बाजारात भरपूर भाव मिळतो.
  • प्रत्येक झाडावर साधारणतः ७०० ते १२०० पर्यंत फळे येतात.
  • फलधारणा झाडाच्या आतील भागातील फांद्यांना होते. त्यामुळे फांद्या व झाडाला बांबूचा आधार देण्याची गरज नसते. तसेच फलधारणा योग्य प्रमाणात होत असल्यामुळे फांद्या तुटण्याची भीतीही नसते.
  • छाटणी केलेल्या झाडाला दरवर्षी बहार नियमित येतो.
  • झाडाचे आयुष्यमान ५ ते ७ वर्षाने वाढते आणि अधिक उत्पादन मिळते. झाड सशक्त, जोमदार, निरोगी व दीर्घायुषी बनते.
  • छाटणी करताना महत्त्वाच्या बाबी

  • संत्रा झाडाची छाटणी एकदाच जून महिन्यात करावी. छाटणी दरवर्षी करू नये.
  • छाटणी केल्यानंतर पहिल्या वर्षी मृग आणि आंबिया बहार येतो.
  • छाटणी केलेल्या संत्रा बागेस शिफारशीप्रमाणे खत व्यवस्थापन, ओलीत व्यवस्थापन व कीड - रोग व्यवस्थापन करावे.
  • १८ ते २० वर्ष वयापेक्षा अधिक जुन्या झाडाचीच छाटणी करावी. तरुण संत्रा झाडाची छाटणी करू नये.
  • सलाटलेल्या बागांचे पुनरुज्जीवन
  • पुष्कळदा अयोग्य व्यवस्थापन व किडी रोगांना बळी पडून संत्रा झाडे वरीन खाली वाळू लागतात. अशा बागांना सलाटलेल्या बागा असेही म्हटले जाते.
  • उपाययोजना

  • वाळत असलेल्या संत्रा झाडाच्या हिरव्या फांद्या ३० ते ४५ सें.मी. शेंड्यापासून सिकेटरच्या साहाय्याने छाटाव्यात.
  • वाळलेल्या फांद्यांचा हिरवा भाग २ ते ३ सें.मी. घेऊन छाटावा. छाटणी करताना प्रत्येक वेळी सिकेटर कार्बेन्डाझीमच्या (१ ग्रॅम प्रतिलिटर) द्रावणात बुडवावी.
  • छाटणीनंतर लगेच कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. मोठ्या फांद्या छाटल्या असतील तर त्या ठिकाणी त्वरित बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी. झाडाचा संपूर्ण वाफा खोदून मुळ्या उघड्या कराव्यात. सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात आणि वाफा ५ ते ७ दिवस उघडा ठेवावा.
  • प्रतिझाडास शेणखत ५० किलो अधिक निंबाेळी ढेप ७.५ किलो अधिक अमोनियम सल्फेट १ किलो अधिक सिंगल सुपरफॉस्फेट १ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश १/२ किलो यांचे मिश्रण करुन टाकावे. खत टाकल्यानंतर खोदलेले वाफे मातीने चांगले झाकावेत.
  • झाडाच्या बुंध्याला १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.
  • साल खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी झाडावरील अळीने खाल्लेला भाग साफ करावा. छिद्रात तार टाकून छिद्रे मोकळी करुन घ्यावीत. त्यानंतर त्या छिद्रात पिचकारीच्या साहाय्याने तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कीटकनाशक द्रावण सोडावे. छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत.
  • जुन्या बागेच्या पुनरुज्जीवनासाठी उपाय झाडाची छाटणी करणे जून महिन्यात झाडावरील वाळलेल्या व रोगट फांद्या ओल्या (हिरव्या) भागापासून १ इंच अंतरापासून दूर छाटून टाकाव्यात. मध्यम व मोठ्या फांद्या आरीने किंवा चैन सॉने छाटाव्यात. तसेच हिरव्या फांद्यासुद्धा शेंड्यापासून ४५ सें.मी. लांब अंतरावर छाटाव्यात. बोर्डो पेस्ट लावणे छाट दिलेल्या भागावर तसेच झाडाच्या मुख्य खोडास बोर्डो पेस्ट (१० टक्के) लावावी. खत व्यवस्थापन करणे छाटणीनंतर प्रत्येक झाडास ४०-५० किलो शेणखत अधिक ७.५ किलो निंबोळी ढेप झाडाच्या घेराखाली मातीत मिसळून द्यावे. ऑक्‍टोबर महिन्यात ५०० ग्रॅम नत्र अधिक ५०० ग्रॅम स्फुरद द्यावे. ओलीत व्यवस्थापन करणे झाडाच्या गरजेपुरते ओलीत करावे. ओलिताकरिता दुहेरी आळे पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचन पद्धतीने ओलीत केल्यास ३०-४० टक्के पाण्यात बचत होऊन उत्पादन उत्तम प्रतीचे मिळते.

    संपर्क : डॉ. शशांक भराड, ९६५७७२५७११ (फलोत्पादन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com