agricultural stories in Marathi, agrowon, Rural development through water management | Agrowon

पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकास
मारुती कंदले
सोमवार, 22 एप्रिल 2019

पाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि. ठाणे) ग्रामस्थांनी निर्धार करीत अखेर ही समस्या निकालात काढली. जलसंधारणाच्या विविध कामांतून पाण्याची शाश्‍वतता मिळविली. त्या आधारे विविध पिके फुलवली. कौटुंबिक जीवनमान उंचावले. पाणी व्यवस्थापनाचा सुकाणू महिलांच्या हाती असल्याने १८ वर्षापासून अखंड पाणीपुरवठा होत आहे. ग्रामविकासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दलही ग्रामपंचायतीला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

पाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि. ठाणे) ग्रामस्थांनी निर्धार करीत अखेर ही समस्या निकालात काढली. जलसंधारणाच्या विविध कामांतून पाण्याची शाश्‍वतता मिळविली. त्या आधारे विविध पिके फुलवली. कौटुंबिक जीवनमान उंचावले. पाणी व्यवस्थापनाचा सुकाणू महिलांच्या हाती असल्याने १८ वर्षापासून अखंड पाणीपुरवठा होत आहे. ग्रामविकासातील उत्कृष्ट कामगिरीबद्दलही ग्रामपंचायतीला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

कोकणपट्ट्यात म्हणजे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे बारमाही स्त्रोत नाहीत. पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. अपवाद वगळता बहुतांश गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवावे लागतात. ठाणे जिल्ह्यात मुरबाडपासून १० किलोमीटरवर असलेले सुमारे १२०० लोकवस्तीचे कान्होळ हे त्यापैकीच छोटेसे गाव. गावात दोनशे उंबरे आहेत.

गावाने अगदी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून स्थानिक पातळीवर राजकारण कटाक्षाने टाळले आहे. सन १९६२ पासून आत्तापर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होऊन सरपंच आणि सदस्य निवडले गेले. मनीषा देसले सध्या सरपंच असून सात सदस्यांपैकी तीन महिला आहेत. तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे पुरस्कार गावाला मिळाले आहेत. गेल्या कित्येक वर्षांत गावात एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. ग्रामविकासाची बाजू उजवी दिसत असली, तरी पाणीटंचाई व नियोजनाची दुसरी बाजू काळवंडलेली होती. कित्येक वर्षे गाव पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करीत टँकर्सवर जगत होते. ग्रामस्थांनी कित्येक वर्षे डोक्यावरुन पाणी वाहून आणले. शेती पावसावरच अवलंबून व तीही भातपिका पुरतीच मर्यादित होती. भाताचे उत्पादनही मर्यादित असल्याने फार काही हाती लागत नव्हते.

पाणीसंकटाचा शिक्का पुसला
सन २००० सालापर्यंत परिस्थिती जैसे थेच होती. त्यानंतर ग्रामस्थांनी निर्धार केला. गावावरील पाणीसंकटाचा शिक्का पुसून काढण्यास सुरवात केली लोकशक्तीतून बारवी नदीवर वनराई बंधारे बांधले. गावच्या आजूबाजूच्या डोंगर उतारावरील पाणी अडवले. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. यातून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना यशस्वीपणे राबवली. लोकसहभागासोबत गावाला मिळालेल्या विविध पुरस्कारांची रक्कम जलसंधारणाच्या कामांसाठी वापरण्यात आली.  जलसंधारणाच्या कामांमुळे गावात पडणारे पाणी बऱ्यापैकी अडवले गेले. गावातील विहिरी, कूपनलिका ‘रिचार्ज’ होऊ लागल्या. बाराही महिने अखंड पाणी उपलब्ध होऊ लागले. आधीच्या मोठ्या कालखंडात भीषण टंचाईचे चटके अनुभवले असल्याने भविष्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा निश्‍चय ग्रामस्थांनी केला होता. गेल्या १७-१८ वर्षात त्याची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे.

कामांची फलश्रुती
  गावात नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित    एकमताने गावात महिलांची पाणी व्यवस्थापन समिती नियुक्त    त्याद्वारे गावातील पाणी पुरवठा योजनेचे व्यवस्थापन   सरपंच मनीषा देसले यांच्याकडेच काही वर्षांपासून पाणी पुरवठा व्यवस्थापन    सकाळी ५ ते ८ आणि संध्याकाळी ६ ते ८ अशा दोन सत्रांत पाणी पुरवठा. त्यामुळे पाणीपुरवठ्यात शिस्त    गेल्या अठरा वर्षांपासून गावात अखंड पाणीपुरवठा    घरटी ५० रुपये पाणीपट्टी. त्यातून वीजबील आणि योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम   संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या पाच लाख रुपयांच्या पुरस्कार रकमेतील तीन लाख २० हजार रुपये खर्चून पाण्याची टाकी. त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा    प्रत्येक घरामागे तसेच सार्वजनिक नळाच्या ठिकाणी शोषखड्डे. कुठेही तुंबून राहत नसल्याने गावात डास व त्यांच्यामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध   शोषखड्ड्यांमुळे उत्तम जलसंधारण होऊन कूपनलिकेद्वारे बारमाही मुबलक पाणीपुरवठा    गावाशेजारील एका शेतघरमालकाने ग्रामस्थांसाठी यंत्रणा बसवून त्याद्वारे पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी उपलब्ध   लवकरच रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प होणार

शेतकरी नव्या प्रयोगांसाठी पुढे सरसावले
 कान्होळने आता पारंपरिक शेतीतही कात टाकायला सुरूवात केली. पाण्याची शाश्‍वती झाल्याने हे शेतकरी नव्या प्रयोगांसाठी पुढे सरसावले. पावसाळ्यात भात शेतीपुरता मर्यादित राहिलेल्या कान्होळे शिवारात विविध हंगामात भेंडी, सिमला व साधी मिरची, वांगी, टोमॅटो, काकडी आदी पिकांची विविधता दिसू लागली. त्यातून दोन पैसे हाती खेळू लागले. गेल्या आठ-दहा वर्षात शेतीचे चित्र पालटल्याचे शेतकरी सांगतात. त्यांचे राहणीमानही उंचावले आहे. पाटपाण्यापेक्षा सूक्ष्म सिंचनाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. शेतीच्या पाणी वाटपातही काटकसरीचेच धोरण कायम राबविले आहे. पिकांना गरजेपुरतच किंवा काटेकोर पाणी दिले जाते. ढोबळी मिरची आणि भेंडी ही अनेक शेतकऱ्यांची मुख्य पिके झाली आहेत. भेंडीचा दिवसाआड तोडा येतो. हंगामात साधारण ४० ते ४५ तोडे होतात. प्रतितोड्याला सुमारे दोन क्विंटल तर एकरी ७० ते ८० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. गावातील अनेक जण उत्कृष्ट भेंडी पिकवण्यात माहीर झाले आहेत. त्यांच्या दर्जेदार भेंडीला चांगला दर मिळत असल्याचे स्थानिक कृषी निविष्ठा वितरक सचिन सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले चालू वर्षी भेंडीने एकरी सव्वा लाख रुपयांचे तर सिमला मिरचीने दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवून दिले. यंदा भेंडीला प्रति किलो ३५ ते ४० रुपयांचा तर सिमला मिरचीला ४५ ते ५० रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. सुमारे सात आठ वर्षांपासून शेती उत्पन्नाचा आलेख वाढत असल्याचे शेतकरी चंद्रकांत मुरबाडे यांनी सांगितले.

कान्होळे गावाने तयार केलेले आदर्श

  •  स्वयंशिस्त, स्वच्छता, परस्परांमधील सुसंवाद, बचत, काटकसरीने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा वापर या पंचसूत्रीचे काटेकोर पालन  
  •  तंटामुक्ती, दारूबंदी, गावातल्या प्राथमिक शाळेत आधुनिक पद्धतीचे डिजिटल शिक्षण, पाणीपुरवठा या साऱ्या आघाड्यांवर ‘स्मार्ट’ सुविधा पुरवल्या.  ग्रामस्थांकडून दररोज सकाळी आपल्या परिसराची स्वच्छता  गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा. लोकसहभागातून डिजिटल सुविधा   गावात शिक्षणाचे प्रमाण लक्षणीय.   पुरस्काराची घोषणा होण्याच्या कितीतरी आधीपासून गाव तंटामुक्त
     

प्रतिक्रिया...

गावात पडणारा पाऊस अडवण्यासोबतच पाण्याचा काटकसरीने वापर ग्रामस्थ करतात. महिलांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करुन त्यांच्या हाती पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपवली आहे. आठवड्यातून एखाद्या दिवशी पाणी कपातही केली जाते.
- मनीषा देसले,९२०९३९३३३०,
सरपंच, कान्होळ.

माझ्या पाच एकरांपैकी दोन एकरांत काकडी, दीड एकरात टोमॅटो आणि तेवढीच भेंडी घेतो.  ढोबळी मिरची, भेंडी कमी पाण्यावर चांगली येतात. ढोबळीला आठवड्यातून एकदा तर भेंडीला २०-२१ दिवसांतून पाणी देतो. काकडीला सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देतो. ढोबळीचा आठवड्याला आठ ते नऊ क्विंटलचा तोडा मिळाला. जवळपास दीड महिना तोडा सुरु होता. किलोला ४० रुपयांच्या वर दर मिळाला. भेंडीचा दोन महिने तोडा सुरू होता. त्यालाही ३५ रुपयांहून अधिकचा दर मिळाला. गेल्या वर्षी तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात वाढ होण्याची आशा आहे.  
- सुरेश घोरड

पाण्यामुळे आमची शेती सुकर झाली. वेगळाच उत्साह आला. काही वर्षांपासून झेंडू घेतो. अर्धा एकरात दोन हंगाम घेतो. दोन्ही हंगामात खर्च जाऊन लाखभर रुपये सुटतात. गेल्यावर्षी सुमारे ७० हजार रुपये मिळाले. शेतीसोबत शेजारील म्हसा या बाजारपेठेच्या ठिकाणी फुलांपासून हार बनवण्याचा व्यवसायही करतो. त्यातून कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लागतो. लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळते. अलीकडेच दीड एकरात हापूसची लागवड केली आहे. सूक्ष्म सिंचनाचा वापर करतो. दोन एकरांत पावसाळ्यात भातशेती असते. पाणीटंचाई सोसली असल्याने त्याचा वापर काटकसरीनेच करतो.
- नंदकुमार कुर्ले, ९२७१४८१५३९, पोलिस पाटील, कान्होळ.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...