बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधी

बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधी
बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधी

नेवासा (जि. नगर) येथे नऊ वर्षापूर्वी बारा महिलांनी एकत्र येत तुकाई महिला बचत गट स्थापन केला. सदस्यांनी दरमहा १०० रुपये बचत केली. या गटाला बॅंकेने कर्ज दिले. यातून नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. आता गावात सुमारे २९ महिला बचत गट सुरू असून, ३१७ महिला सदस्या झाल्या आहेत. गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक प्रगतीच्या वाटेवर आहेत. नगर जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये महिला बचत गट सुरू झाले. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्येच महिलांना रोजगाराच्या संधी तयार झाल्या. नेवासा (जि. नगर) येथे २०११ साली तुकाई महिला बचत गटाची बारा महिलांनी एकत्र येऊन सुरवात केली. या गटाच्या अध्यक्षा नीला लोखंडे आणि सचीव सुधा मस्के आहेत. गटातील प्रत्येक महिलेने दर महिन्याला शंभर रुपयांची बचत केली. सहा महिन्यानंतर बचतीतून जमा झालेल्या पैशांचा अंतर्गत व्यवहार केला. त्यानंतर बॅंकेकडून गटाला ५० हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यातून काही महिलांनी व्यवसाय सुरू केला. सध्या नेवासा गावामध्ये सखी, रेणुका, संघर्ष, स्वामी समर्थ, साई, म्हाळसा, कुलस्वामिनी, कृष्णा, सितारा, तुलसी, ईश्वरी, ज्ञानेश्वरी, जीवन, जय मारुती, श्रावणी, परिवर्तन, जीवन, मैत्री, शक्तीशाली, माऊली, मधमेश्वर, वैभवी, जोगेश्वेरी, ओमसाई, ओमशांती असे सुमारे २९ महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून ३१७ महिलांचे संघटन उभे राहिले आहे. बचत केली, कर्ज मिळाले ः महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नऊ वर्षापूर्वी नेवासा येथे बारा महिलांनी एकत्र येऊन पहिला बचत गट केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने २९ महिला बचत गट तयार झाले. गटातील प्रत्येक महिला दर महिन्याला शंभर रुपयांची बचत करते. आतापर्यंत या सर्व गटांनी साडेबारा लाखांपेक्षा अधिक रकमेची बचत केली आहे. याचबरोबरीने सुरवातीला दिलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली. आतापर्यत महिला बचत गटांना एक कोटी २२ लाखांचे कर्ज मिळाले असून त्यापैकी ५० लाखांचे कर्ज त्यांनी फेडले आहे, अशी माहिती बचत गटाच्या सहयोगिनी संगीता खंडागळे आणि लोक संचालित साधना केंद्राचे मयूर कुलकर्णी यांनी सांगितले. कुटुंबाला मिळाली आर्थिक ताकद ः १) तुकाई महिला बचत गटातून हिरा निंबाळकर यांनी कर्ज घेतले. या रकमेतून त्यांनी कुरडया, पापड निर्मिती व्यवसाय सुरू केला. या पूरक व्यवसायाने कुटुंबाला आर्थिक बळ दिले. २) रेणुका मापारी यांनी कर्ज घेऊन शेतीत सुधारणा केली. याचबरोबरीने दूध व्यवसाय सुरू केला. ३) सुलताना अफजलखान पठाण यांनी रेणुका गटाकडून कर्ज घेऊन कुक्‍कुटपालन सुरू केले. सुरवातीला त्यांनी वीस कोंबड्या घेतल्या. आता त्यांच्याकडे शंभर कोंबड्या आहेत. कोंबडीपालनामुळे हमखास उत्पन्नाचा स्रोत तयार झाला. ४) मीना इनामदार यांनी तीन वर्षापासून पिठाची गिरणी सुरू केली आहे. मीना शिंदे यांनी लॉंड्रीच्या दुकानाचा विस्तार केला. ५) मीरा परदेशी यांनी मुलाला उच्च शिक्षण देत संगणकाचे दुकान सुरू करून दिले. सविता मस्के यांनी पंक्चर दुकानाच्या विस्ताराला मदत केली. सुजाता कोकणे यांचा झेरॉक्स व कुरिअरचा व्यवसाय होता. गटात सहभागी झाल्यावर आर्थिक भांडवल मिळाले. त्यांनी नवीन यंत्र खरेदी केले. त्यामुळे व्यवसायाला बळ मिळाले. महिलांना प्रशिक्षण अन् मिळाला रोजगार... सहा वर्षापूर्वी अश्विनी सदभावे यांनी सितारा महिला बचत गटातून पावणेदोन लाखाचे कर्ज घेऊन शेवया, कुरडया, पापड निर्मितीचा गृहउद्योग सुरू केला. त्यांच्या उत्पादनांना पंचक्रोशीमध्ये तसेच शहरातही चांगली मागणी आहे. विशेषतः एप्रिल, मे महिन्यात त्यांच्या उत्पादनांची सर्वात जास्त विक्री होते. या कालावधीतच त्यांच्याकडे दहा महिलांना रोजगार उपलब्ध होतो. पंधरा वर्षांपासून मेघा कैलास परदेशी शिवणकाम शिकवतात. त्यांनी गटाच्या माध्यमातून शिवणकामासाठी पाच यंत्रांची खरेदी करून प्रशिक्षणाला गती दिली. आतापर्यंत त्यांनी सुमारे तीन हजार महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले आहे, असे मयूर कुलकर्णी यांनी सांगितले. सामाजिक उपक्रमात सहभाग नेवासामधील महिलांना बचत गटातून संघटन उभे केले. त्याचबरोबरीने त्यांचा सामाजिक उपक्रमांतही पुढाकार असतो. गावातील यात्रेच्या निमित्ताने महिला बचत गटांतर्फे मुलींच्या जन्माचे स्वागत आणि हिमोग्लोबीन तपासणी शिबिर, माता-बालक सुदृढ स्पर्धा, मुली वाचवा याबाबत जनजागृती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमामध्ये गावातील महिला सहभागी होतात. गाव समितीमार्फत सार्वजनिक प्रश्न मांडण्यासाठी महिलांचा पुढाकार असतो. या उपक्रमामुळे महिलांचा ग्रामविकास तसेच सामाजिक उपक्रमामध्ये चांगला सहभाग वाढला आहे. महिलांना मिळालेला व्यवसाय शेळीपालन ः ८३, दुग्ध व्यवसाय ः १५, कोंबडीपालन ः १५, शिवणकाम ः १८०, शिलाई प्रशिक्षण ः ५, शेवया, कुरडई निर्मिती ः २०, लॉंड्री दुकान ः ३, मिरची कांडप ः ३, पीठ गिरणी ः ४, ब्युटी पार्लर ः २०, जनरल स्टोअर्स ः ६, विणकाम ः ९ उत्पादनांना चांगली मागणी ‘‘मी बचत गटातून कर्ज घेऊन शेवया, कुरडई, पापड निर्मिती उद्योग सुरू केला. आम्ही औरंगाबाद येथील मॉलसाठी तसेच अन्य भागात मागणीनुसार विविध उत्पादनांचा पुरवठा करतो. अनेक लोक घरी येऊन विविध उत्पादनांची खरेदी करतात. बचत गटामुळे आम्हाला वर्षभर रोजगार मिळाला आहे.’’ - अश्विनी सदभावे, ९८८१३७०१७५ वीणकाम उद्योगात वाढ ‘‘महिलांनी निश्चय केला तर कोणतेही काम अवघड नाही. गटातून कर्जरुपाने पैसे मिळाल्याने मी आठ वर्षापासून विणकामास सुरवात केली. या व्यवसायात चांगली वाढ केली आहे. त्यामुळे माझा आर्थिक नफा वाढला आहे.’’ - आरती नायडू महिला गट झाले सक्षम ‘‘महिला आर्थिक विकास महामंडळ ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी योजना राबवत आहेत. महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना कर्ज दिले जाते. नेवासा येथील महिलांना विविध योजनांचा चांगला फायदा झाला आहे.’’ संजय गायकवाड, ९४०४९८३१९९ (जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com