AGROWON_AWARDS : नावीन्यपूर्ण तंत्रातून धुंडाळल्या प्रगतीच्या वाटा

AGROWON_AWARDS : नावीन्यपूर्ण तंत्रातून धुंडाळल्या प्रगतीच्या वाटा
AGROWON_AWARDS : नावीन्यपूर्ण तंत्रातून धुंडाळल्या प्रगतीच्या वाटा

अॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार - अनिल पाटील - सांगे (जि. पालघर) अतिपावसाच्या कोकणामध्येही नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करत सांगे (जि. पालघर) येथील अनिल पाटील यांनी आपली पीक पद्धती बसवली आहे. प्रत्येक पिकासाठी मल्चिंग, शुन्य मशागत अशा आधुनिक तंत्राचा वापर, फळबागेसाठी सघन लागवड यातून प्रगतीच्या वाटा धुंडाळल्या आहेत.

कोकण म्हटले आपल्याला भात आणि आंबा एवढेच आठवतात. मात्र, सांगे (ता. वाडा जि. पालघर) येथील अनिल पाटील यांनी आपल्या सातत्यपूर्ण प्रयोगातून कोकणामध्ये नवी पिके रुजवली आहेत. आता त्यांच्याकडे कोकणच्या वैशिष्ट्यपूर्ण भात पिकामध्येही नावीण्यपूर्ण पॉलिमल्चिंग, शून्य मशागत तंत्र, ड्रमसीडरने लागवड अशा मनुष्यबळ बचतीच्या तंत्राचा अवलंब होतो. सघन केसर आंबा, चिकू बाग या बागांसह पपई, केळी, कलिंगड यांसारखी नवी पिकेही अतिपावसाच्या स्थितीतही त्यांच्या शेतात उच्चांकी उत्पादन देताना दिसतात. कारण त्यांनी कोकणासाठी योग्य असे तंत्र या प्रत्येक पिकांसाठी बनवले आहे. पाटील यांच्या शेतीची वैशिष्ट्ये :

  •   भातात पॉलिमल्चिंग व शून्य मशागत ः मजूरबळामध्ये बचत करण्याच्या उद्देशाने विविध प्रयोग. त्यात शून्य मशागत व पॉलिमल्चिंगवर लागवड यांसह ड्रमसीडरद्वारे भात पेरणी अशा पद्धतीचा अवलंब केला. अशा प्रयोगातून १ गुंठा क्षेत्रातून ६४ किलो भाताचे उत्पादन घेण्यात यश आले.
  •   कलिंगड - सुरवातीला पारंपरिक पद्धतीने कलिंगड लागवड करणाऱ्या पाटील यांनी २००८ पासून पॉलिमल्चिंगवर उत्पादन घेण्यास प्रारंभ केला. यात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे, फळमाशी नियंत्रणासाठी सापळे, प्रकाश सापळ्यांचा वापर करतात. गेल्या वर्षी २१ टन प्रतिएकर इतके उच्चांकी कलिंगड उत्पादन घेतले आहे. यंदाही ८ एकरवर पॉलिमल्चिंगवर कलिंगड लागवड केली.
  •   सघन पद्धतीने आंबा लागवड केली असून, सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले जाते.
  •   कोकणातील अधिक पावसामध्ये पपई पीक घेताना आवश्यक ते लागवडीचे बदल केले आहेत. दहा वर्षांपासून जून-जुलै महिन्यात पपई लागवड करून पावसाआधीच फळाची काढणीचे तंत्र अवलंबले आहे.
  •   ठाणे जिल्ह्यातील हवामान ओळखून मशागत, हंगाम यामध्ये आवश्यक बदल करून केळी पीक घेत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये केळी पीक रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सध्या चार एकर केळी बाग.
  •   काली पत्ती जातींची चिकू बाग चार एकरांमध्ये असून, सेंद्रिय पद्धतीने जोपासना.
  •   रोपवाटिका - १ एकर. त्यात अर्धा एकर पॉलिहाउस केले आहे. भाजीपाल्यामध्ये मिरची, वांगी, कलिंगड रोपे मागणीनुसार केली जातात.
  •   फळ रोपवाटिका - केसर व हापूस जातीची आंबा कलमे, चिकू कालीपत्ती व क्रिकेटबॉल जाती, फणस सिंगापुरी, बरका आणि कापा जातीची कलमे.
  • प्रयोगात रमलेले पाटील प्रसारातही आघाडीवर शेतीत मन रमल्यावर १९९५ च्या सुमारास परिसरातील प्रगतिशील शेतकरी डॉ. जयंतराव पाटील (बोर्डी), दिनूभाऊ कोरे (वाणगाव) आणि जयवंत चौधरी (केळवे) यांच्याकडून शेतीतील बारकावे जाणून घेत शेतीत आगेकूच सुरू केली. प्रयोग करीत गेल्यामुळे पुरस्कार व समाजात मानसन्मान मिळत गेले. तशी आपल्या ज्ञानाचा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करण्याची जबाबदारीही वाढली. कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, आत्मा विभागाचे पीक प्रात्यक्षिक, प्रयोग आणि प्रशिक्षणासाठी त्यांचे शेत नेहमी खुले असते. शेतीविकासाबरोबरच कृषी ज्ञान प्रसारातील महत्त्वपूर्ण कामासाठी अनिल पाटील यांना २०१२ चा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, कै. वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उत्कृष्ट भाजीपाला उत्पादन यासह राज्य व जिल्हापातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पाटील यांना पत्नी सौ. आश्‍विनी, थोरला मुलगा गौतम यांचे पूर्ण सहकार्य असते. गौतमने मुक्त विद्यापीठातून बी.एस्सी (अॅग्री) केले असून, तोही पूर्णवेळ शेतीत वडिलांना मदत करतो. धाकटा मुलगा आश्‍विन आयटी इंजिनिअर असून, सध्या अमेरिकेत कार्यरत आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com