शेतकऱ्यांने भू-सूक्ष्मजीवशास्त्र शिकलेच पाहिजे...

शेतकऱ्यांने भू-सूक्ष्मजीवशास्त्र शिकलेच पाहिजे
शेतकऱ्यांने भू-सूक्ष्मजीवशास्त्र शिकलेच पाहिजे

१९६०-७० च्या हरितक्रांतीनंतर २०-२५ वर्षे आपण धान्योत्पादनाचे उच्चांक केले. १९९० नंतर त्याला उतरती कळा लागली व हरितक्रांती बदनाम झाली. कृषिशास्त्रावर आज जैवतंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असून, शेतीतील प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर म्हणजे त्याला प्रतिकारक जात शोधणे असा कल होत आहे. मात्र त्याला निश्‍चित मर्यादा आहेत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीने भू-सूक्ष्मजीवशास्त्र फायद्याचेच ठरणार आहे. कृषी अभ्यासक्रमासह शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणात याचा सखोल समावेश झाल्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल. त्याच उद्देशाने ही लेखमाला दर बुधवारी सुरू करत आहोत. १९७० मध्ये कृषी पदवीधर झाल्यानंतर शेती सुरवात केली. शिक्षण व कृषि खात्याच्या घडीपत्रिका, शेतकरी मेळाव्यातील मार्गदर्शन, वर्तमानपत्रे, मासिकातील लेख यांचा उपयोग करत असल्याने प्रारंभीची १५-२० वर्षे उत्तम उत्पादनही मिळाले. मात्र त्यानंतर अनेक उपाययोजना करूनही उत्पादन घटत गेले. पुढे तमिळनाडू येथून मागविलेल्या सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख करून दिली. अभ्यासक्रमात वनस्पतीवर अनेक रोग सूक्ष्मजीवांमुळे येतात इतकी माहिती होती. मात्र ते अनेक सूक्ष्मजीवांच्या जाती-प्रजाती वनस्पतींच्या वाढीसाठी मदत करत असल्याचे समजले. या उपयुक्त जिवाणूंच्या मदतीने जमिनीची उत्पादकता वाढवता येईल, या उद्देशाने भू-सूक्ष्मजीव शास्त्राविषयी आसपासच्या ग्रंथालयात उपलब्ध ग्रंथाचे वाचन सुरू केले. कृषी पदवीधर असलेल्या मलाही यात अनेक नवीन गोष्टी आढळत गेल्याने अभ्यासातील गोडी वाढली. गेली २८ वर्षे मी या विषयाचा विद्यार्थी आहे. या विषयाने माझी शेती करण्याची पद्धत आमूलाग्र बदलून टाकली. नवीन तंत्राच्या वापरातून उत्पादकतेचा आलेख परत वर जाऊ लागला. रसायनशास्त्रज्ञांद्वारे पीकपोषणाचा अभ्यास ः सर्व विज्ञानशाखांमध्ये वेगाने प्रगती होत असताना भारतात सूक्ष्मजीवशास्त्र शाखा तुलनेने अंधारात राहिली असल्याचे माझे मत आहे. विद्यापीठीय कृषी अभ्यासक्रमात मिळालेल्या तुटपुंज्या ज्ञानावर स्वतः त्या विद्यार्थ्यांचे पोषण होत नाही, तर त्यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांचे पोषण कसे होणार? याचे उत्तर इतिहासात शोधताना एक बाब लक्षात आली. १९१० मध्ये इंग्रज सरकारने भारतात चार ठिकाणी कृषी महाविद्यालये स्थापन करून कृषी शिक्षणाचा पाया घातला. पुण्यातील कृषी महाविद्यालय यापैकीच एक. युरोपात अगर इंग्लंडमध्ये त्यापूर्वी काही वर्षे या अभ्यासक्रमाला सुरवात झाली असावी. त्या काळात भारतात अजूनही रासायनिक खतांचा वापर सुरू झाला नव्हता. युरोपात नत्र, स्फुरद, पालाश व काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपयुक्तता लक्षात आली होती. जर्मन रसायनशास्त्रज्ञ लायबिग यांच्या ‘लॉ ऑफ मिनिमम’ वरून त्याला पुष्टी मिळू शकते. पिकांच्या गरजांचा अभ्यास करून कोणते रसायन दिल्यास फायदा होईल, याबाबत बहुतांश अभ्यास रसायनशास्त्र विभागाकडून होत होता. यातून पुढे आलेल्या शिफारशीमुळे उत्पादन वाढत असल्याचे पुढे आल्याने रासायनिक खतांचे कारखाने उभे राहिले. उत्पादनात वाढ होत असल्याने हा पर्याय शेतकऱ्यांतही लोकप्रिय होत गेला. भारतात १९६० नंतर यांच्या वापराला वेग आला असला तरी माझ्या वडिलांच्या १९४० मधील टिपणामध्ये माती परीक्षणातून खत मात्रा हे तंत्र सापडते. एकूणच पीक पोषणावर १००-१२५ वर्षांपूर्वीपासून कृषी रसायनशास्त्राचा प्रभाव आहे. अगदी २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना आरोग्य कार्डवाटप कार्यक्रमामागेही हेच तंत्र आहे. सूक्ष्मजीवशास्त्राचा अल्प परिचय ः

  • सूक्ष्मजीवांची डोळ्याआडची सृष्टी माणसाला सूक्ष्मदर्शकांच्या शोधानंतर (ल्यूएनहॉक १६३२-१७२३) माहीत झाली.
  • पुढे इंग्लंड येथील रॉबर्ट हूक (१६३५-१७०३) यांनी सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे जिवाणू, बुरशी व त्याचे बिजाणू, वनस्पतींच्या पेशी यांचा अभ्यास सुरू केला. वनस्पती अगर प्राण्यांच्या शरीराचा सर्वांत लहान भागाला इंग्रजीत सेल (Cell) असे नावही त्यांनीच दिले. मराठीत त्याला पेशी म्हणतात. १६६५ मध्ये हूक यांचा ‘मायक्रोग्राफिया’ हा सूक्ष्मजीवशास्त्रावरील पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे सुमारे १०० वर्षे या विषयात फारशी प्रगती झाल्याचे दिसत नाही.
  • लुईस पाश्‍चर (१८२२-९५) हे मूळचे रसायन शास्त्रज्ञ औद्योगिक उत्पादने खराब होण्यामागील कारणांचे शोध घेत होते. त्यात सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव हे कारण स्पष्ट झाल्याने त्यावर अभ्यास करताना पाश्‍चर पुढे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होऊन गेला. दूध नासण्यापासून तयार केलेल्या तंत्राचा (पाश्‍चराझेशन) आजही वापर सुरू आहे. त्यांनी शोधलेल्या निर्जंतुकीकरणाच्या पद्धतीमुळे फ्रान्समधील वाइन व बीअर उद्योग तरला. पुढे त्यांनी विविध लस शोधून काढत मानवाच्या आरोग्यांच्या समस्या सोडवल्या.
  • पुढे रॉबर्ट कोच (१८४३-१९१०) यांनी अनेक सूक्ष्मजीवांच्या मिश्रणातून एखाद्या सूक्ष्मजीवाचे शुद्ध कल्चर तयार करण्याचे तंत्र विकसित केले. यामुळे एखाद्या सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करणे शक्‍य झाले. रोगास कारणीभूत नेमक्या सूक्ष्मजीवांचा शोध शक्य झाला.
  • भू-सूक्ष्मजीवशास्त्रात काम सुरू करण्याचे श्रेय विनोग्रेडस्की (१८५६ ते १९७३) या रशियन शास्त्रज्ञाकडे जाते. त्यांनी जमिनीत चालणाऱ्या अनेक जैवक्रियासंबंधी संशोधन केले. त्यांचे समकालीन मार्टिनस बैजेरिंक (१८५१-१९३१) हे हॉलंड स्थित सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांनी सर्वप्रथम नत्र स्थिर करणाऱ्या सूक्ष्मजीवांची यशस्वी कल्चर तयार केली. त्यांनी सूक्ष्मजीवापेक्षाही लहान रोगकारक घटकांचा अभ्यास केला. त्याला ‘व्हायरस’ (मराठीत विषाणू म्हणतात.) हे नाव प्रथम बैजेरिंक यांनी दिले.
  • युरोपात अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवशास्त्रावर संशोधन सुरू होते. त्या काळात अमेरिकेतील असे संदर्भ पुस्तकात सापडत नाहीत. अमेरिकेतील अलेक्‍झांडर प्लेमिंग (१८८१-१९५५) यांना १९२६ मध्ये पेनिसिलीन या प्रजिजैविकांची प्रथम जाणीव झाली. १९४५ मध्ये नोबेलही मिळाला. परंतु त्याचे व्यापारी उत्पादन करण्याचे काम रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या जोकोब लिपमन (१८७४-१९३९) यांनी केले. त्यांनी रुटगर्ट विद्यापीठांतर्गत न्यूजर्सी येथील कृषी संशोधन केंद्रात कृषी रसायनशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र असा स्वतंत्र विभाग स्थापन केला. आपला शिष्य सेलमन वॉक्‍समन (१८८८ ते १९७३) यांना रशियातून बोलावून भू-सूक्ष्मजीवशास्त्रात पुढे काम चालू केले. या गुरुशिष्यांना अमेरिकेत भू-सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधनाचे जनकत्व जाते.
  • स्ट्रेप्लोमायसेस ग्रेशियसपासून स्ट्रेप्टोमायसीन हे ॲन्टिबायोटिक निर्मितीचे श्रेय या वॉक्‍समन यांना जाते. १९५२ चा नोबेलही मिळाला. स्टेप्टोमायसीनमुळे तोपर्यंत असाध्य मानला जाणारा क्षयरोगही आटोक्‍यात आला. जगभरात या कामासाठीच ते लोकप्रिय असले तरी १९३५ पूर्वीचे २५ वर्षे त्यांनी केलेले भू-सूक्ष्मजीवशास्त्रातील कामही दुर्लक्षण्याजोगे नाही. १९१०-३५ या काळात त्यांचे संशोधन ‘सॉइल अँड मायक्रोबस’ (१९२५) व ह्यूमस या दोन पुस्तकांतून आणि विविध संशोधन पेपरमधून पुढे येते. यापैकी पहिला ग्रंथ मला पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रात मिळाला, त्यानेच मला सूक्ष्मजीवशास्त्राची गोडी लावली. ज्यांना जमिनीच्या सुपीकतेचा अभ्यास करावयाचा आहे, त्यांनी हा ग्रंथ वाचावा.
  • डॉ. वॉक्‍समन यांच्या हाताखाली दोन भारतीय विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यापैकी डॉ. रंगास्वामी यांचे ‘ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी’ हे पुस्तक प्रसिद्ध असून, दुसरे डॉ. अय्यंगार हे बंगळूर येथे औद्योगिक सूक्ष्मजीव शास्त्रात काम करतात. कृषी संशोधनाकडून प्रतिजैविकांच्या संशोधनाकडे वॉक्समन का वळले, असे त्यांना विचारले. तेव्हा १९१० ते ३५ या काळातील संशोधनाची दखल अमेरिकन कृषी खात्याने योग्य प्रकारे न घेतल्याचे त्यांना सांगितले. मात्र या साऱ्या प्रक्रियेतून भू-सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय मागे पडला. यातून अँटिबायोटिक व लसीकरणाने जगात वैद्यकीय प्रगती झाली, तर शेतकरीवर्गाचे प्रचंड नुकसान झाल्याची खंत आहे.
  • संपर्क ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com