इंधनासाठी गोड ज्वारी सर्वोत्तम

संपादकीय
संपादकीय

गोड ज्वारीच्या पिकापासून ज्वारी हे धान्य आणि त्याचबरोबर काही प्रमाणात इथेनॉल बनविण्याचा पर्याय आपण स्वीकारला तर इंधनाच्या निर्मितीबरोबर अन्नसुरक्षाही सुदृढ होईल. 2014 नंतर 2018 मध्ये पुन्हा एकदा खनिज तेलाच्या किमती भारतातील नागरिकांना परवडणार नाहीत, अशा पातळीवर पोचल्या आहेत. त्यामुळे जैव इंधनाचा पर्याय शोधण्याची निकड निर्माण झाली आहे. आपण जैव इंधनाचा पुरेशा प्रमाणात आणि स्वस्त दरात पुरवठा करणारा पर्याय शोधण्यात यशस्वी ठरलो तर असे स्वस्तात उपलब्ध होणारे द्रव्य महागड्या पेट्रोलमध्ये मिसळून इंधनाची दरवाढ नियंत्रणात आणता येईल. तसेच खनिज तेलाची आयात करण्यासाठी जे परकीय चलन खर्च होते त्यात लक्षणीय प्रमाणात कपात होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न देणारा उत्पादक रोजगार मिळेल. अशारीतीने समाजातील जवळपास सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरणारा गोड ज्वारीपासून इथेनॉल तयार करण्याचा व्यवसाय होय. नॅशनल काऊन्सिल फॉर ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्‍स ऍन्ड पॉलिसी रिसर्च या शासकीय संशोधन संस्थेने 2012 मध्ये प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधानुसार भारतात कमीत कमी पाणी वापरून आणि कमीत कमी खर्चामध्ये इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी गोड ज्वारीच्या पिकाकडे वळणे हाच सर्वात चांगला पर्याय ठरतो. या शोधनिबंधाचे एक लेखक निती आयोगाचे सन्माननीय सभासद असलेले डॉक्‍टर रमेश चंद हे होत. या शोधनिबंधानुसार गोड ज्वारीच्या धाटातील रसापासून इथेनॉल बनविल्यास त्याचा उत्पादन खर्च लिटरला सुमारे 17 रुपये एवढा कमी राहणार आहे. सध्या साखरेचे उत्पादन अमाप झाल्यामुळे ब्राझीलमध्ये थेट उसाच्या रसापासून इथेनॉल बनविण्याचा पर्याय स्वीकारण्याची घोषणा सरकारने केली आहे. परंतु या इथेनॉलचा दर लिटरला 59.13 रुपये एवढा चढा असणार आहे. तसेच सुमारे 48 हजार घनमीटर पाणी वापरून एक हेक्‍टर क्षेत्रावर ऊस पिकवून त्यापासून इथेनॉल बनविणे पाण्याची टंचाई असणाऱ्या आपल्या देशासाठी किफायतशीर ठरणार नाही. त्याऐवजी केवळ चार हजार घनमीटर पाणी वापरून पिकवलेल्या गोड ज्वारीच्या धाटातील रसापासून इथेनॉल तयार करणेच आपल्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल.

एक हेक्‍टर क्षेत्रावर ऊस पिकवण्यासाठी राज्यात उत्पादनखर्च सुमारे 1,41,436.69 रुपये एवढा येतो ही बाब कृषिमूल्य आयोगाने उजेडात आणली आहे. तेवढ्याच क्षेत्रावर ज्वारी पिकविण्यासाठी केवळ 24,272 रुपये एवढेच खर्ची पडतात. तसेच संकरित गोड ज्वारीचा एकदा पेरा केला की त्यापासून सहा ते सात वेळा ज्वारीचे पीक घेता येते, असे डॉक्‍टर आनंद कर्वे हे ख्यातनाम कृषी वैज्ञानिक सांगतात. त्यामुळे पहिल्या पिकासाठी 24,272 रुपये उत्पादनखर्च येतो. तेव्हा पाच ते सहा पिकांसाठी उत्पादन खर्च सुमारे 16,000 रुपये एवढा कमी राहणे संभवते. यामुळे गोड ज्वारीपासून इथेनॉलची निर्मिती करणे अधिकच किफायतशीर ठरणार आहे. गोड ज्वारीपासून इथेनॉल बनविण्यासाठी महाराष्ट्रात सध्या तरी नव्याने भांडवली गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही. सध्या राज्यात बंद पडलेल्या साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीचा वापर करून इथेनॉलनिर्मिती करणे शक्‍य होणार आहे. गोड ज्वारीच्या धाटातील रस काढून उरणारा चोथा हा गुरांसाठी दर्जेदार चारा म्हणून वापरता येईल. त्यामुळे राज्यातील चाऱ्याच्या टंचाईची समस्या निकालात निघेल आणि दुग्धोत्पादन व्यवसायाला चालना मिळेल. गोड ज्वारीचे दांडे साफ करण्याचे काम हे श्रमसघन असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उत्पादक रोजगारनिर्मिती होईल. सर्वसाधारणपणे साखर कारखाना हा वर्षातील जास्तीत जास्त सहा महिने चालू राहतो. त्याच्याऐवजी हा गोड ज्वारीपासून इथेनॉल बनविण्याचा कारखाना वर्षातील किमान 270 दिवस सुरू राहील अशी आखणी करता येईल. थोडक्‍यात ग्रामीण महाराष्ट्रात सुख समृद्धी निर्माण करण्याची क्षमता या उद्योगात आहे.

राज्यात गोड ज्वारीपासून इथेनॉलनिर्मितीचा प्रकल्प सुरू करायचा असेल तर अशा पिकासाठी सिंचनाची सुविधा निर्माण करावी लागेल. सध्या राज्यात सुमारे 12 लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस पिकवला जातो. त्यासाठी जेवढे पाणी खर्ची पडते त्याच्या निम्यापेक्षा कमी पाणी वापरुन 40 लाख हेक्‍टर क्षेत्रावर गोड ज्वारी पिकविता येईल आणि शिल्लक राहिलेले पाणी भाज्या व फळे यांच्या उत्पादनासाठी वापरता येईल. गोड ज्वारीचे पीक असे 40 लाख हेक्‍टर क्षेत्रावर घेतले तर वर्षाला 2200 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करता येईल. तसे झाले तर देशात पेट्रोलमध्ये 25 टक्के एवढे मिसळण्यासाठी सुमारे 500 कोटी लिटर इथेनॉलचा वापर करून आपण शिल्लक राहिलेले 1700 कोटी लिटर इथेनॉल जागतिक बाजारपेठेत विकून परकीय चलन मिळवू शकू. त्याचप्रमाणे केवळ इथेनॉलवर चालणारी वाहने बनविण्यात आपण यशस्वी झालो तर खनिज तेल आयात करण्याची गरज भासणार नाही. गोड ज्वारीपासून इथेनॉलची निर्मिती स्थिरावण्यासाठी साधारणपणे पाच वर्षांचा कालखंड खर्ची पडेल. सध्या देशात गरजेपेक्षा सुमारे चाळीस टक्के एवढे साखरेचे अधिक उत्पादन होत आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात उत्पादन केलेली साखर ठेवायला गोदामे अपुरी पडणार आहेत. मागणीपेक्षा पुरवठा 40 टक्‍क्‍यांनी अधिक असल्यामुळे बाजारात साखरेचे भाव कोसळू नयेत म्हणून सरकारला नवनवीन खर्चिक उपाय योजावे लागत आहेत. याचा सरकारी तिजोरीवर जो आर्थिक भार पडणार आहे तो अंतिमतः लोकांनाचा वाहावा लागणार आहे. या दुष्टचक्रातून सुटका करून घ्यायची असेल तर महाराष्ट्राने उसाच्या शेतीऐवजी गोड ज्वारीची शेती करण्याचा पर्याय जवळ करायला हवा. राज्यातील एक नामवंत कारखानदार बी. बी. ठोंबर यांचा 16 सप्टेंबर 2018 रोजी ऍग्रोवन या दैनिकात गोड ज्वारीपासून इथेनॉलची निर्मिती कशी किफायतशीर ठरेल हे विषद करणारा प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख राज्यातील पीक रचनेत बदल घडवून आणण्याची सुरवात ठरो.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी उसाशिवाय दुसरे लाभदायक पीक अस्तित्वात नाही अशी कालपर्यंतची स्थिती होती. आज ती उसाची शेतीही लाभदायक राहिलेली नाही. या समस्येवर एक रामबाण उपाय म्हणून आपण गोड ज्वारीच्या पिकाचा आणि त्यापासून इथेनॉल बनविण्याच्या उद्योगाचा विचार करायला हवा. या पिकामध्ये आणि त्यापासून इथेनॉल बनविण्याच्या उद्योगामध्ये राज्याच्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता निश्‍चितपणे आहे. उद्योजकांनी आणि राज्यकर्त्यांनी गोड ज्वारी या पिकातील बीजरूप शक्ती विचारात घेऊन ती कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. तसे केले तरच महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादक रोजगारनिर्मिती होईल. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असणाऱ्या भाज्या आणि फळे यांच्या उत्पादनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. दुभत्या गुरांसाठी मुबलक प्रमाणात आणि वाजवी दरात चारा उपलब्ध झाला की दुधाच्या उत्पादनखर्चात कपात होईल. दुधाच्या उत्पादनात लक्षणीय प्रमाणात वाढ होईल. थोडक्‍यात ग्रामीण भागातील बेरोजगारीची समस्या आणि पर्यायाने दारिद्र दूर करण्याची सुप्त शक्ती गोड ज्वारी या पिकामध्ये आहे. तसेच शहरी व ग्रामीण ग्राहकांना भाज्या, फळे व दूध वाजवी भावात आणि मुबलक प्रमाणात मिळवण्यासाठी उत्पादनात आवश्‍यक असणारे बदल होण्यासाठी उसाच्या शेतीऐवजी गोड ज्वारीच्या पिकाचा पर्याय आपल्याला निवडावा लागेल.

गोड ज्वारीच्या पिकापासून ज्वारी हे धान्य आणि त्याच बरोबर काही प्रमाणात इथेनॉल बनविण्याचा पर्याय आपण स्वीकारला तर इंधनाच्या निर्मितीबरोबर अन्नसुरक्षाही सुदृढ होईल. हैद्राबाद येथील इक्रिसॅट या संशोधन संस्थेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार एक हेक्‍टर क्षेत्रावर एका हंगामात गोड ज्वारीचे पीक घेतले तर 3200 किलो ज्वारी व 50 टन ओल्या कडब्याचे उत्पादन होते. अशी उत्पादने विकून शेतकऱ्याला एका हंगामात 98000 रुपये मिळतील. शेतकऱ्याला एका वर्षात अशी तीन पिके घेता येतील. म्हणजे त्याला वर्षाला 2,94,000 रुपयांचे ढोबळ उत्पन्न मिळेल. असे झाले तर राज्यातील शेतकऱ्यांचे दारिद्र संपेल. साखर उद्योगाला मंदीने ग्रासले आहे. या संधीचा लाभ उठवून ग्रामीण महाराष्ट्रातील पीक रचनेत बदल केला आणि साखर कारखान्यामध्ये उसाऐवजी गोड ज्वारीच्या धाटांचे गाळप करण्यास सुरवात केली तर राज्यातील शेती क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती होईल.

रमेश पाध्ये, 9969113029 (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com