कोकणातही मक्यावर स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डाचा प्रादुर्भाव

कोकणातही मक्यावर स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डाचा प्रादुर्भाव
कोकणातही मक्यावर स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डाचा प्रादुर्भाव

अमेरिकन लष्करी अळी (शा. नाव -स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या मक्यावरील कीडीचा भारतामध्ये मे २०१८ मध्ये प्रथम आढळला. कर्नाटक राज्यामध्ये मका पिकावर अक्षरशः धुमाकूळ घातलेल्या या कीडीने हळूहळू कर्नाटकच्या आजूबाजूंच्या राज्यांमध्येदेखील उपस्थिती दाखवण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम जून-जुलै महिन्यामध्ये सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये या कीडीचा प्रादुर्भाव आढळला. नंतर तो सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात दिसून आला. कोकणामध्येही फेब्रुवारी २०१९ मध्ये या कीडीने अस्तित्व दाखविले. येथील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये चाऱ्यासाठी किंवा स्वीट कॉर्नसाठी केलेल्या मक्यांमध्ये या कीडीचा प्रादुर्भाव आढळला.

कीडीचा जीवनक्रम ही पतंगवर्गीय कीड असून, त्यांची एक पिढी ३० ते ४० दिवसांत पूर्ण होते. मादी पतंग २०० ते ३०० च्या समूहात अंडीपुंजामध्ये अंडी घालतो. अळीच्या सहा अवस्था असून, त्या १४ ते ३० दिवसांत पूर्ण होतात. पूर्ण वाढलेल्या अळीच्या डोक्यावर इंग्रजी ल् आकाराची खूण असते. तर, शेपटीकडे वरच्या पृष्ठभागावर चार काळे ठिपके चौकोनी आकारात दिसून येतात. त्यानंतर अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोषावस्थेचा काळ ८ ते १० दिवसांपर्यंत असतो. मात्र, तापमान कमी असल्यास कालावधी ३० दिवसांपर्यंत वाढू शकतो. पतंग ८ ते १० दिवस जगतात. मादी पतंग निशाचर असून, रात्री अंडी घालायला बाहेर येतो. कीडीचे पतंग हे सदृढ असल्याने उडून दूरवरचा पल्ला गाठू शकतात.    

कीडीचे नुकसान अंड्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या अळ्या पानांचा हिरवा भाग खरवडून खातात, त्यामुळे पानावर पांढरट पापुद्रयासारखे चट्टे पडतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानांना छिद्रे पाडतात. अळ्यांनी मक्याच्या अंकुरलेल्या शेंड्यावर हल्ला केल्याने झाडाची वाढ खुंटते.    

नियंत्रणाच्या उपाययोजना

  •  स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा कीडीचा प्रादुर्भाव सलगपणे मका पीक घेतल्या जाणाऱ्या भागांमध्ये आढळतो. त्यामुळे पिकात फेरपालट करावी.       
  •  ही कीड गवतवर्गीय पिकावर येते.  
  •  या कीडीचा प्रादुर्भाव त्वरित लक्षात येण्यासाठी उगवणीनंतर कामगंध सापळा किंवा प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.       
  •  मिश्रपीक पद्धती अवलंबावी. मका, ज्वारी, ऊस या पिकांवर अंडी घालण्यासंदर्भात मादी पतंगामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते.       
  •  बांधावरील गवत, अनावश्यक वनस्पती नष्ट कराव्यात.       
  •  या कीडीचे अंडीपुंज, अळ्या  त्वरित जाळून नष्ट कराव्यात.      
  •  कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्यास पिकाच्या बाल्यावस्थेतील नुकसान टाळता येईल.       
  •  वनस्पतीजन्य कीटकनाशक ५ टक्के निंबोळी अर्काची १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी. त्यामुळे नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होईल.
  •  शेतीमध्ये मका पिकात राखेचा वापर धुरळणीद्वारे करावा. त्यामुळे अळी अवस्था सुकून मरून जाईल.  
  • कीटकनाशकांच्या शिफारशी   

  • थायोमिथाॅक्झाम (१२.६ टक्के सीजी) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेड सी) १२५ मि.ली. प्रति हेक्टर प्रति  ५०० लिटर पाण्यात किंवा     
  •  क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) १५० मि.ली. प्रति हेक्टर मिसळून फवारणी करावी.
  •        ः डाॅ. आनंद नरंगलकर, ९४०५३६०५१९  ः डाॅ. शेखर मेहेंदळे, ९४२१९१६३०९ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com