एकीचे बळ पेरतोय दुष्काळातही आशावाद

एकीचे बळ पेरतोय दुष्काळातही आशावाद
एकीचे बळ पेरतोय दुष्काळातही आशावाद

साधी, सरळ राहणी. अगदी मधमाशीप्रमाणे. भिलपुरी (ता. जि. जालना) येथील चार एकर शेती असलेल्या लहाने कुटुंबाचा कोरडवाहू शेतीतील संघर्ष सुरू आहे. कापूस, सोयाबीनच्या जोडीला दहा-बारा जित्राबांचा सांभाळ, मळणीयंत्राचा व्यवसाय. हे सगळे जमवताना कुटुंबातील सदस्यांचा समन्वय, आशावादी, जिगरी वृत्ती या बाबींमधून संकटांतून मार्ग शोधत पुढे जाण्याची वृत्ती या कुटुंबाचं जगणं सुकर करून गेली आहे. जालना जिल्ह्यातील भिलपुरी येथील ७३ वर्षे वयाचे कुटुंबप्रमुख शिवाजीराव दामोदर लहाने. त्यांना शंकर आणि नारायण ही मुलं. चार एकर कोरडवाहू शेती असलेल्या या कुटुंबाकडं आजघडीला चार मोठ्या म्हशी, दोन वगारं, दोन गायी, एक कालवड, चार बैल असं पशुधन आहे. बैल खुट्यावर असणं हे शेतकऱ्याचं वैभव असल्याचं शिवाजीराव सांगतात. साधारण १९६७ मध्ये विभक्‍त झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक गाय व दोन बैल आले. कोरडवाहू शेतीत ७७ गुंठे कापूस, खरिपात सोयाबीन व रब्बीत ज्वारी ही पिकं ठरलेली. दोन मुलं व तीन मुली असलेल्या शिवाजीरावांना कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी मग मजुरीची जोड दिली. तीन मुलींचे विवाह केले. थोडी शेती अडचणीमुळे विकावी लागली, पण पुढे तेवढीचं शेती पुन्हा विकत घेण्याची किमया त्यांच्या मुलांनी केली ही समाधानाचाची बाब म्हणावी लागेल. मुलांनी कामांत जपलेले सातत्य व एकमेकांची साथ यामुळेच हे शक्‍य झाल्याचे शिवाजीराव सांगतात. ज्ञानेश्‍वरी वाचनाची आवड असलेले शंकर म्हणतात, की आपले प्रयत्न कमी पडायला नको या जाणिवेतून कुटुंबातील प्रत्येक व्यक्‍ती झटून काम करतो. कुटुंबाची नड ओळखली शेतीतील काम संपले, की मजुरीचा शोध घ्यायची सवय दोन्ही भावांनी स्वत:ला लावून घेतलेली. त्यामुळे कामांव्यतिरिक्‍त अन्य बाबींसाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. कुटुंबाची नड ओळखून शंकर यांनी पाच वर्षे तर नारायण यांनी आठ वर्षे शहरात जाऊन कामे केली. वाचनाच्या छंदातून शंकर यांनी जनावरांच्या आरोग्याविषयी इत्थंभूत माहिती घेतली. आता त्यांना वेगळा वैद्य शोधावा लागत नाही. परिसरातील पशुपालक त्यांच्याकडून आवश्‍यक उपचारांची मदत घेतात. जनावरं खुट्यावर असणं हे वैभव

  • शिवाजीरावांच्या मते जनावरं खुट्यावर असणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं वैभव. शेण कधीच विकलं जात नाही. त्याचा शेतीतच वापर केला जातो. पावसाळा समाधानकारक असला की शेती चांगली पिकते.
  • शेतीचा पोत टिकविण्यासाठी दरवर्षी साधारण पाच चे सहा ट्रॉली शेणखत उपलब्ध होते.
  • गोऱ्हे कामात आले की मोठ्या जोडीची विक्री होते. आर्थिक क्षमतेप्रमाणे गोठा, पिण्याच्या पाण्याचा हौद, चारा साठवणुकीसाठी जागा, कुट्टी यंत्र घेणं शक्य झालं.
  • दुधाची विक्री नाही

  • सन १९६७ पासून दुधात खंड नाही. मुला-बाळांना दूध मिळावं म्हणून सातत्यानं म्हशी, गायीचं संगोपन करण्याला प्राधान्य दिलं. दूध विकून जेवढे पैसे मिळत नाहीत त्यापेक्षा दूध पाजून संगोपन केलेले
  • पशुधन एखाद्या पशुपालकाला अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकतो असे शिवाजीराव सांगतात.
  • गोठ्यात जन्मलेल्या ‘युवराज’गोऱ्ह्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते.
  • जनावरांच्या विक्रीतून हातभार

  • दरवर्षी किमान एक ते दोन जनावरं विकणं शक्य होतं. त्यातून ५० ते ६० हजार रुपये हाती येण्याची शक्यता असते. यंदा मात्र परिस्थिती थोडी नाजूक होती. म्हैस ४० हजार रुपयांनाच विकावी लागली.
  • मात्र या उत्पन्नाचा दुष्काळात आधार होतो.
  • चाऱ्याची सोय शंकर आपल्या मजुरीतून जनावरांच्या ढेपेची सोय करतात. कुणाच्या धान्याची मळणी करून दिल्यास किंवा संबंधित शेतकऱ्याकडे जनावरे नसल्यास शेतीमालाच्या भुश्‍श्‍याची मागणी करतात. प्रसंगी विकतही घेतला जातो. वर्षभर पुरेल एवढा कडबा व सोयाबीनसह अन्य मालाचा भुस्सा जमा करून ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचे नारायण सांगतात. मळणी यंत्राद्वारे उत्पन्न स्रोत

  • मजुरीसोबतच लहाने बंधूंनी २००५ मध्ये बैलगाडीचलित मळणीयंत्र घेतले. जवळपास ११ वर्षं
  • त्याचा कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लागला. ते बिघडल्यानंतर २०१६ मध्ये सुधारित यंत्र घेतले गेले. वर्षाला सुमारे २०० क्‍विंटलपर्यंत धान्याची मळणी त्याद्वारे शेतकऱ्यांना करून दिली जाते.
  • नारायण या व्यवसायाची जबाबदारी सांभाळतात. एक क्विंटल मळणीच्या बदल्यात पाच किलो धान्याचा मोबदला घेतला जातो. साहजिकच त्याचा मोठा आधार कुटुंबाला होतो.
  • कुटुंबात एकच ‘मोबाईल’

  • आज घरातील प्रत्येक सदस्याच्या हातात ‘मोबाईल’ असतोच, पण लहाने कुटुंबात सर्वांचा मिळून एकच मोबाईल आहे. सर्वांचे निरोप व संवाद त्याद्वारेच साधले जातात. मुख्य म्हणजे कुटुंबातील सदस्यांनी
  • एकमेकांशी ठेवलेला समन्वय व विश्‍वासच त्यामागे महत्त्वाची भूमिका बजावतो. कुटुंबाची जेवढी गरज आहे तेवढी सद्यःस्थितीत एक मोबाईल पूर्ण करते, अशी कुटुंबाची भूमिका आहे.
  • दुष्काळातील नियोजन दुष्काळावर मात करायची तर ऐन वेळेला तयारी करून चालत नाही. जनावरांच्या चाऱ्याची सोय आधी करवी लागते. अशी प्रत्येक कामासाठीची सवय संकटसमयी कामी येते. यंदा पाण्याची फारच समस्या आहे. मित्राकडून पाणी घेणं सुरू आहे. कापसाचं दीड एकरांत यंदा चार-पाच क्विंटल उत्पादन मिळालं. सोयाबीन अडीच एकरांत पाच क्विंटलच झालं. त्याचे १९ हजार रुपये मिळाले. मजुरीला बाहेर जावं लागणार आहे. पण मार्ग काढावाच लागेल असं लहाने सांगतात. - शंकर लहाने नारायण लहाने- ९६०४२२०८९३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com