फळबागेतून शेती केली शाश्वत

फळबागेतून शेती केली शाश्वत
फळबागेतून शेती केली शाश्वत

औरंगाबादमध्ये पोलिस खात्यामध्ये पोलिस नाईक पदावर कार्यरत असलेल्या रमेश लक्ष्मण शिंदे यांनी शेतीमध्ये वेगळेपण जपले आहे. रमेश शिंदे यांनी माळीवाडी (ता. अंबड, जि. जालना) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये कुटुंबाच्या मदतीने डाळिंब आणि शेवगा लागवड केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने डाळिंब उत्पादक गटाची सुरवात केली. डाळिंब आणि शेवगा पिकाच्या काटेकोर नियोजनातून रमेश शिंदे यांनी शाश्वत उत्पन्नाची दिशा पकडली आहे. जालना जिल्ह्यातील माळीवाडी गावशिवारात रमेश लक्ष्मण शिंदे यांची बारा एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीमध्ये कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पीक पद्धतीवर त्यांचा भर होता. दहा वर्षांपूर्वी रमेश शिंदे पोलिस दलात शिपाई म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल करण्यास सुरवात केली. सध्या रमेश शिंदे हे औरंगाबाद येथे पोलिस विभागात कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षांत नोकरी सांभाळत त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतीमध्ये सुधारणा करण्यास सुरवात केली. त्या अगोदर परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांशी चर्चा करत पारंपरिक पिकाएेवजी डाळिंब बागेचे नियोजन केले. त्यानुसार, सन २००९ मध्ये दोन एकर क्षेत्रावर डाळिंबाच्या भगवा जातीच्या रोपांची १० फूट बाय १० फूट अंतरावर लागवड केली. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागेचे व्यवस्थापन ठेवले. सोळा महिन्यांनी पहिल्या बहरातून आठ टनांचे उत्पादन मिळाले. जागेवरच व्यापाऱ्याला विक्री केली.

पारंपरिक पिकापेक्षा डाळिंबातून आर्थिक मिळकत वाढल्याने टप्प्याटप्प्याने त्यांनी सर्व जमीन डाळिंब लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेतला. सन २०११ मध्ये सहा एकरांवर १२ फूट बाय ८ फूट अंतरावर डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. सर्व बागेला ठिबक सिंचन केले आहे.

फळबागेच्या व्यवस्थापनाबाबत रमेश शिंदे म्हणाले की, मी पोलिस खात्यामध्ये नोकरीला असल्याने दररोज फळबागेकडे लक्ष देता येत नाही. सुटीच्या दिवशी मी पूर्णपणे शेती नियोजनात असतो. माझी पत्नी सौ. ज्योती ही फळबागेचे व्यवस्थापन शिकली आहे. बागेतील दैनंदिन व्यवस्थापन, फवारणी, खतमात्रेच्या नियोजनाची जबाबदारी माझ्या पत्नीकडे आहे. तसेच आई, वडिलांचे देखील शेतीच्या दैनंदिन नियोजनामध्ये मार्गदर्शन मिळते. पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी मी ३४ मीटर बाय ३४ मीटर बाय दहा फूट खोलीचे शेततळे घेतले. त्यामुळे संपूर्ण बागेला पुरेश्या पाणीपुरवठ्याची सोय झाली. गेल्यावर्षी विहीरदेखील घेतली. काही क्षेत्रातील बागेत आंबे बहर तर काही क्षेत्रात मृग बहर घेतो. बागेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेणखत, गांडूळ खताचा वापर करतो. तसेच दर पंधरा दिवसांनी जीवामृत स्लरी दिली जाते. माझ्याकडे एक गीर आणि दोन गावरान गाई आहेत. जैविक कीडनाशकांच्या फवारणीवर माझा भर आहे. गरज लागली तरच एखाद्यावेळी रासायनिक कीडनाशकांचा वापर करतो. गेल्यावर्षी स्वतंत्र चार एकर क्षेत्र पूर्णपणे सेंद्रिय व्यवस्थापनाखाली आणले आहे. त्याचे प्रमाणीकरण करत आहे.

फळबागेत दरवर्षी हिरवळीचे पीक म्हणून ताग लागवड करून फुलोऱ्यात असताना बागेत गाडून देतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. तसेच जमिनीत ओलावाही टिकून रहातो आहेत. येत्या काळात रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर बंद करून सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापनाव भर देणार आहे. मला डाळिंबाचे एकरी सरासरी दहा टन उत्पादन मिळते. डाळिंबाची विक्री बागेतच व्यापाऱ्यांना केली जाते. आत्तापर्यंत मला प्रति किलो सरासरी ३० ते ७५ रुपये असा दर मिळाला आहे. सन २०१७ मध्ये चार एकरांवर डाळिंबाची नवीन लागवड केली. त्यामध्ये कांद्याचे आंतरपीक घेतले. कांद्याचे योग्य व्यवस्थापन ठेवले. माझे वडील लाडसावंगी, करमाड, आडूळ, पाचोड, अंबड आदी बाजारात कांद्याची विक्री करतात. खर्च वजा जाता मला कांदा पिकातून एेंशी हजारांचे उत्पन्न मिळाले. परिसरातील शेतकऱ्यांच्या समन्वयातून शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी एका ठिकाणी अडविण्याची व्यवस्था केली आहे. या ठिकाणावरून पावसाळ्यामध्ये पाणी उचलून शेततळ्यात साठविले जाते. साठविलेले पाणी पावसाचा खंड आणि मार्च ते मे दरम्यान डाळिंबाच्या बागेसाठी वापरले जाते. बागेच्या व्यवस्थापनाची सूत्रे ः

  • प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागेचे व्यवस्थापन.
  • शेणखत, गांडूळ खत, जीवामृताचा जास्तीत जास्त वापर.
  • सेंद्रिय कीडनाशकांच्या फवारणीवर भर.
  • हिरवळीच्या पिकांच्या लागवडीतून जमिनीची सुपीकता वाढविली.
  • ठिबक सिंचनातून काटेकोरपणे पाण्याचा वापर. आच्छादनाचा वापर.
  • बागेमध्ये कांद्याचे आंतरपीक.
  • बांधावर शेवग्याची झाडे रमेश शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी तीन एकरांवर शेवग्याची लागवड केली होती. त्यांचे वडील परिसरातील बाजारपेठेत कांद्याबरोबरच शेवग्याचीही थेट ग्राहकांना विक्री करीत होते. त्यामुळे शेवग्याला २५ ते ५० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत होता. परंतु, मजुरांच्या कमतरतेमुळे त्यांनी शेवग्याऐवजी त्या क्षेत्रात डाळिंब लागवड केली. मात्र, प्रत्येक डाळिंब बागेच्या चारही बांधावर त्यांनी शेवग्याची लागवड केली. बांधावरील शेवग्याच्या पिकातून त्यांना खर्च वजा जाता वर्षाला साठ हजारांचे उत्पन्न मिळते. गाव परिसरातील आठवडी बाजारात शेवग्याची विक्री केली जाते. स्थापन केला शेतकरी गट गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या साथीने रमेश शिंदे यांनी गेल्यावर्षी आत्माअंतर्गत कृषीरत्न डाळिंब उत्पादक शेतकरी गटाची स्थापना केली. सध्या या गटात गावातील पंधरा डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. गटामार्फत औरंगाबाद, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यातील प्रयोगशील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेला भेट दिली जाते. त्यांच्याकडून नवीन तंत्रज्ञान समजावून घेतले जाते. या तंत्रज्ञानाचा गटातील सर्व शेतकरी अवलंब करतात. आलेल्या अडचणीवर एकमेकांचा सल्ला घेतात. कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विविध कृषी विषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. रमेश शिंदे यांनी गटाचा व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. या गटामध्ये दररोज संध्याकाळी डाळिंब बागेतील अडचणी आणि उपाययोजना तसेच दैनंदिन व्यवस्थापनाबाबत चर्चा केली जाते. शेतकरी गटामुळे डाळिंब शेतीच्या बरोबरीने इतर पिकांचे व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीला चालना मिळाली आहे. येत्या काळात गटाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचा अवलंब करण्यात येणार आहे. संपर्क ः रमेश शिंदे, ८३२९३८८७३१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com