agricultural stories in marathi, agrowon, technowon, Changes in rural area due mechanisation | Page 2 ||| Agrowon

यांत्रिकीकरणाचे ग्रामीण जीवनावरील परिणाम

सतीश कुलकर्णी
शुक्रवार, 30 मार्च 2018

यंत्राने अनेक कामे सोपी आणि वेगाने होत असल्याने यांत्रिकीकरणाचा वेग कृषी क्षेत्रामध्येही वाढत आहे. वाढत्या यांत्रिकीकरणाचे ग्रामीण भागातील जीवनावर अनेक परिणाम होत आहेत. त्याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

माणसाचे कष्ट कमी व्हावेत म्हणून सुरू झालेल्या
यांत्रिकीकरणाने एकूणच मानवी आयुष्याला चांगलेच कवेत घेतले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रावर अवलंबून राहण्याची माणसाची सवय वाढत चालली आहे. अगदी साध्या साध्या गणितांसाठी कॅलक्युलेटरवर अवलंबून राहणाऱ्या माणसांचे विनोद आता इतिहासजमा झाले आहेत. कारण आपणही त्यांच्याच माळेमध्ये सामील होत चाललो आहोत.

यांत्रिकीकरणामुळे माणसांच्या हातचे काम त्याच्याही नकळत काढून घेतले आहे. प्रत्येक कारखान्यामध्ये पूर्वी हजारो हात काम करत असत. आता अनेक कामे यंत्राच्या साह्याने केली जातात. छोट्या छोट्या कामासाठी स्वयंचलित यंत्रे-रोबो आणले आहेत. हजारो कौशल्यपूर्ण हात बेरोजगार होत आहेत. संपूर्ण कारखान्यामध्ये केवळ काही डोकी रोबोट चालवण्यासाठी पुरेशी ठरतात. पुन्हा त्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने त्यांचे व्यवस्थापन (दडपून टाकणे) तुलनेने सोपे होत आहे. (एचआर विभागाचे काम कमी झाले.) ही संगणक अभियंता वा तत्सम प्रणालीमध्ये कार्य करणारी माणसे अक्षरशः दिवसाचे १२ ते १८ तास काम करत आहेत. उदा. सिंगापूरमध्ये संगणकीय प्रकल्पाच्या कामामध्ये तर वेळेचे कोणतेही बंधनच नाही. येथे कायदे कामगारांऐवजी उद्योजकांना पुरक असल्याने असे घडते.

यांत्रिकीकरणाचे एकूण परिणाम

 • स्वयंचलित यंत्रामुळे अनेक कुशल माणसांच्या नोकऱ्या गेल्या. काही ठिकाणी अकुशल माणसांच्या नोकऱ्यांमध्ये वाढ झाली. उदा. एटीएम यंत्रामुळे बॅंकेतील क्लार्क आणि कॅशिअर या पदावरील व्यक्तींचे भरती व प्रमाण कमी झाले. त्या तुलनेत एटीएमच्या सुरक्षेसाठी कोणतेही कौशल्य आवश्यक नसलेल्या वॉचमन मंडळीची भरती (तीही कंत्राटी पद्धतीने-स्वस्तामध्ये) झाली. या यंत्रामध्ये रक्कम भरण्यासाठी संरक्षित गाड्या, व्यक्ती पुन्हा कंत्राटीच आहेत. एटीएम निरीक्षणासाठी यांत्रिक डोळा (सीसीटीव्ही कॅमेरा), छेडछाड केल्यास वाजणारा स्वयंचलित बझर हे त्यांच्या मदतीला आहेतच.
 • यंत्र आणि तंत्राचे जाणकार व चालक असणाऱ्या व्यक्तींच्या कामामध्ये वाढ झाली. यंत्रे, उपकरणे यांची निर्मिती, देखभाल, भाड्याने-कराराने चालवणे अशा अनेक स्वरूपामध्ये कुशल व्यक्तींना मागणी वाढली आहे.  
 • शेतीमध्ये अधिक क्षमतेच्या यंत्रामुळे कामे सुलभ झाली. मात्र, त्याच वेळी गावातील मजुरांना मिळणाऱ्या कामामध्ये घट झाली. परिणामी गावात राहून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होईना. स्थलांतराशिवाय पर्याय राहिला नाही. शेतीतील कुशल मजूरही शहरामध्ये बांधकामावर बिगारी कामाकडे गेले. गावातील मजुरांची संख्या कमी झाली. पर्यायाने मजुरी वाढली. अद्यापही यांत्रिकीकरणाकडे न वळलेल्या लहान मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू लागला. तो कर्ज काढून का होईना, यंत्रे घेण्यासाठी धडपडू लागला. अगदीच शक्य नसल्यास भाड्याने यंत्राद्वारे कामे करून घेऊ लागला. म्हणजे सर्वसामान्यांना भरडणारे एक चक्र अविरत सुरू राहणार यात शंका नाही. 

ग्रामीण भागातील बेरोजगारी

 • बेरोजगारी ही समस्या सर्वत्र व्यापलेली आहे. वरवर पाहता ती अनेक वेळा दिसूनही येत नाही. ग्रामीण भागामध्ये छुपी बेरोजगारी हा प्रकारही आहे. तसेच शेतीमध्ये अर्धवेळ बेरोजगारांचे प्रमाण मोठे आहे. विशेषतः कोरडवाहू शेतीमध्ये. वर्षातील काही महिने पावसावर अवलंबून असलेल्या या गावात काहीही काम नसते. तेव्हा अनेक जण स्थलांतर करून काम चालवतात. जिथे खुद्द शेतकऱ्यांचीच ही स्थिती तिथे मजुरांचे हाल काय विचारता? मात्र, मजुराकडे स्वतःची शेती असल्याचे किमान बंधन तरी नसते. त्यामुळे त्याला कायमचे स्थलांतर करण्यात फारशी अडचण येत नाही. निदान झोपडीत राहून का होईना पण शहरात तरी मजुराचे स्थिर बस्तान बसू शकते. मात्र, शेतकऱ्याची मेढ रोवलेल्या गुरासारखी अवस्था होते. समोर हिरवा चारा दिसत असतो, गळ्यात मेढीला बांधलेल्या दोराचा फास काचत असतो. किमान पावसाळ्यात तरी त्याला शेताची जोत करावीच लागते. त्यामुळे शहरात कायमस्वरूपी काम नाही, आणि गावात वर्षभर काम नाही अशी ‘घर का न घाट का’ अशी स्थिती होते.
 • बागायती भागांमध्ये वर्षभर शेतीत कामे असतात. तुलनेने शेतांचा आकार कमी असल्याने वर्षभर कायमस्वरूपी मजूर ठेवणे परवडत नाही. तात्पुरत्या स्वरूपामध्ये मजूर घ्यावे लागतात. अनेक वेळा अधिक मजूरी मोजूनही वेळेवर मजूर मिळणे दुरापास्त होत आहे. वाढलेली मजुरी शेतकऱ्यांना परवडत नसल्याने यंत्रांसह विविध पर्याय शोधले जात आहेत. उदा. खुरपणीसाठी महिलांची अनुलब्धता आणि वाढत्या खर्चामुळे तणनाशकांचा वापर वाढला.
 • बहुतांशी स्थलांतरीत अकुशल मजूर हे शहरातील बांधकाम व्यवसायामध्ये सामावले जातात. बांधकाम व्यवसामध्येही यांत्रिकीकरण आल्याने मजुरांचे प्रमाण कमी झाले आहे. ज्या बांधकामाला पूर्वी दोन तीन वर्षे लागत असत, ती केवळ वर्षभरात पूर्ण होत आहे. त्यामुळे मिळणाऱ्या मजुरीमध्ये वाढ झाली असली तरी मजुरांची संख्या कमी झाली आहे.
 • कुशल कारागीर किंवा मजूर ः कोणतेही एक कौशल्य असलेल्या व्यक्तींना शहरांमध्ये अद्यापही मोठी मागणी असल्याचे दिसते. (उदा. प्लंबर, मेकॅनिक, इलेक्टिशियन). खासगी कंपन्यामध्येही ते सामावले जातात. ग्रामीण भागामध्ये तर अशा कुशल लोकांची कमतरताच आढळते. तीन चार गावामध्ये एखादा चांगला मॅकॅनिक असतो. कोणतेही यंत्र कामावेळी बंद पडल्यास शेतकऱ्यांची तारांबळ उडते.

यंत्रामुळे झालेले सामाजिक, आर्थिक बदल  

 • ग्रामीण भागामध्ये यंत्रावर अवलंबून असलेल्या ट्रॅक्टर चालक, उपकरणाचे निर्माते, फॅब्रिकेटर यांच्या कामामध्ये दरम्यानच्या काळामध्ये वाढ झाली होती. बहुतांश ट्रॅक्टर हे वर्षभर भाड्याने शेती आणि अन्य कामांसाठी वापरले जात. अलीकडे गावामध्ये ट्रॅक्टरची संख्या वाढल्याने तुलनेने भाड्याचे प्रमाण कमी झाले आहे. ट्रॅक्टरचा सर्वाधिक वापर मशागतीसाठी होतो. हंगामाच्या सुरवातीच्या काळात प्रचंड काम असले तरी वर्षभर प्रत्येकाला चालक ठेवणे परवडत नाही. शेतकऱ्यांना स्वतःच्या कामापुरते तरी ड्रायव्हिंग व किरकोळ दुरुस्त्या शिकण्याशिवाय पर्याय राहिला नाही.  
 • आता बहुतांशी तंत्रज्ञानातील कंपन्या चालकरहित कार विकसित करण्यामध्ये उतरल्या आहेत.
 • त्याच तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून अगदी ३० एचपी पासून १०० एचपीपर्यंतचे लहान मोठे स्वयंचलित ट्रॅक्टर विकसित केले जात आहे. ते या वर्षअखेरपर्यंत भारतातही येण्याची शक्यता आहे. (अधिक माहितीसाठी पान १४ पहा). त्यामुळे चालकांनाही बेरोजगारीला सामोरे जावे लागेल, यात शंका नाही.
 • पूर्वी एका मोठ्या बागायतदार शेतकऱ्यावर अवलंबून अशी तीन ते चार मजूर कुटुंबे गावात जोडलेली असत. अडीअडचणीला धान्य, पैसे देत ती जोडून ठेवलेली असत. अगदी शेतात काम कमी असले तरी शेतकरी छोटीमोठी कामे यांच्यासाठी काढत. मात्र, अलीकडे मजुरीचे प्रमाण वाढल्याने अशी कामे काढणे बंद झाले आहे. अलीकडे प्रत्येक काम किंवा व्यवहार माणुसकीऐवजी यांत्रिक आणि आर्थिक होत आहे.

छोटी यंत्रे, अवजारांची आवश्यकता
ज्या देशामध्ये सर्वाधिक तरुण मनुष्यबळ आहे, तिथे यंत्रांची कितपत आवश्यकता आहे? असा प्रश्न मी यांत्रिकीकरणाच्या पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीला विचारला. त्याला उत्तर देण्यासाठी आढेवेढे आणि अनेक वळसे घ्यावे लागले. जागतिक पातळीवर आघाडीवर राहण्यासाठी यंत्र, तंत्रज्ञानाच्या संशोधनात मागे राहूनही चालणार नाही, हे खरेच. मात्र, तंत्रज्ञानाची साथ आणि मनुष्यांचे हात यांची सांगड घालणेही भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतामध्ये मोठ्या अवजड किंवा पूर्ण स्वयंचलित यंत्रांऐवजी कष्ट कमी करणाऱ्या, कामात सुलभता आणि वेग आणणाऱ्या छोट्या यंत्र आणि उपकरणांची आवश्यकता आहे. सातत्याने कमी होत चाललेल्या दरडोई क्षेत्रामध्ये उपजिवीका करणाऱ्या शेतकऱ्यांना अशीच छोटी यंत्रे व अवजारे आर्थिकदृष्ट्या परवडू शकतील.  

संपर्क ः सतीश कुलकर्णी, ९९२२४२१५४०,
(लेखक ॲग्रोवनचे उपसंपादक आहेत. )

 


इतर टेक्नोवन
मेथी वाळवण्याचे तंत्रभारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम -...
फ्राइम्स प्रक्रिया उद्योगातील यंत्रेतळलेल्या पदार्थांच्या बाजारपेठेमध्ये फ्राइम्स...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
सौर ऊर्जा उपकरणाचे उपयोग, फायदेभविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार...
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेकोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या...
नत्रयुक्त खतांच्या वापराशिवाय उत्पादन...कडधान्याच्या मुळावरील गाठीमध्ये वसाहती करणाऱ्या...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांचा वापरपारंपरिक ऊर्जास्त्रोतांच्या तुटवड्यामुळे व जास्त...
किफायतशीर बैलचलित अवजारेबैलचलित बहूपीक टोकण यंत्रामध्ये पिकानुसार...
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रेसोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने...
जवसापासून जेल, कुरकुरीत पदार्थविविध आजारांवरील उपचारामध्ये जवस उपयुक्त असूनही...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
मातीरहित शेतीचे हायड्रोपोनिक्स तंत्रमातीची सुपीकता कमी होत असून, जमिनी क्षारपड होत...
बैलचलित अवजारे ठरताहेत फायदेशीरशेतीमध्ये बैलशक्तीचा वापर मुख्यत: नांगरणी, वखरणी...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
ठिबक सिंचनासाठी पंप निवड करताना महाराष्ट्रामध्ये शेतकरी विविध पिकांसाठी ठिबक...
गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रेग्रामीण पातळीवर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय...
भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेतीबहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
बहुपयोगी पॉवर टिलरपॉवर टिलरमधील रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे...
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...