सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग यंत्र

सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग यंत्र
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग यंत्र

नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍नॉलॉजी (सिरकॉट) संस्थेमध्ये कपाशी पिकासाठी नव्या तंत्रज्ञानाचा विकास केला जातो. कपाशीच्या शिल्लक अवशेषांपासून ब्रिकेट निर्मिती, दहन सयंत्र तयार केले आहे. यातून पर्यावरणपूरकता जपली जाणार असून, शेतकऱ्यांना उत्पन्नांचा अतिरिक्त स्रोतही तयार होईल. राज्यामध्ये कपाशीखालील क्षेत्र मोठे असून, कोरडवाहूसह बागायतीमध्ये ते घेतले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेची सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍नॉलॉजी (सिरकॉट) ही संस्था कपाशी पिकातील तंत्रज्ञानाच्या विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेने काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये जिनिंगचे छोटे यंत्र विकसित केले आहे. तसेच, कपाशी काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या पिकांच्या अवशेषांपासून ब्रिकेट निर्मितीसाठी प्रयत्न केले आहे. या ब्रिकेटचा वापर वाढवण्यासाठी खास दहन सयंत्र विकसित केले आहे. ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांचेही या संशोधनात योगदान आहे. गावखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या या कपाशी झाडांच्या अवशेषांचा वापर प्रामुख्याने जळणासाठी केला जातो. लाकडांच्या ज्वलनातून होणारे प्रदूषण ही मोठी समस्या आहे. अशाच प्रकारे मयतांच्या दहनासाठी लाकडांबरोबरच सरासरी दहा लिटर रॉकेल वापरले जाते. सोबत कापूर, तूप यांचाही वापर होतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाकडे ओली असल्यास किंवा लाकडे उपलब्ध नसल्यास मयताच्या दहनामध्ये अडचणी येतात. अशा ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने घातक अशा टायरसदृश साहित्यांचा वापर केला जातो. हे सारे धोके कमी करण्याच्या उद्देशाने ओटाई प्रशिक्षण केंद्रामध्ये कपाशी किंवा कोणत्याही शेतीतील अवशेषांपासून ब्रिकेट तयार केल्या जातात. या ब्रिकेटचा वापर स्मशानामध्ये मयताच्या दहनासाठी वाढवण्याच्या उद्देशाने सिरकॉटने खास दहन सयंत्र विकसित केले आहे. असे आहे सयंत्र हे दहन सयंत्राची लांबी साडेसहा फूट आहे. त्याची रुंदी वरील बाजूस साडेतीन फूट, तर खालील बाजूस अडीच फूट अशी आहे. या चेंबरला सातत्याने हवा पुरवण्यासाठी एक अश्‍वशक्‍तीचा (हॉर्सपावर) ब्लोअर बसवला आहे. त्यामुळे ब्रिकेटमध्ये एकसारखी हवा खेळती राहून ब्रिकेट्स सलगपणे जळतात. एक मयत जळण्यासाठी सुमारे सहा ते सात तासांचा अवधी लागतो. यात इंधनाची मोठी बचत होते. पारंपरिक पद्धतीमध्ये मयताचे शरीर संपूर्ण जळण्यासाठी साडेपाच हजार रुपये खर्च लागतो. ब्रिकेटचा वापर केल्यास सरासरी अडीच हजार रुपये खर्च होतो. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत खर्चात ५५ टक्‍के बचत होत असल्याचा दावा संस्थेने केला आहे. सिरकॉट संस्थेने या सयंत्राच्या पेटंटसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. या सयंत्राचे लोकार्पण २ फेब्रुवारी रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणपूरकतेसह व्यवसायाची संधी

  • देशात प्रतिवर्ष सरासरी ७५ लाख मृत्यू होतात. त्यासाठी प्रत्येकी किमान ३०० किलो लाकूड या प्रमाणे २२.५ लाख टन लाकडे मयतांच्या दहनासाठी वापरली जातात. त्यासाठी १५ कोटी झाडांची तोड होते.
  • प्रतिव्यक्ती दहनासाठी सुमारे २०० किलो ब्रिकेट पुरेसे होतात. याचे ज्वलन पूर्णपणे होत असल्यामुळे त्यातून केवळ १५ ते १६ किलो राख तयार होते.
  • दहनासाठी सयंत्र आणि ब्रिकेटचा वापर वाढल्यास प्रतिवर्ष १५ लाख टन ब्रिकेटची गरज पडेल. सध्या प्रत्येक जिल्ह्यात ब्रिकेट निर्मितीचे एक किंवा दोन प्रकल्प सुरू आहेत. त्यात पूर्ण क्षमतेने चालणारे अत्यंत कमी प्लॅंट आहेत. मात्र, या नव्या सयंत्राच्या वापरामुळे ब्रिकेट निर्मितीचे सुमारे पाच हजार प्लॅंट चांगल्या पद्धतीने चालू शकतील. प्रत्येक गावात किमान एक सयंत्र आणि एक ब्रिकेट निर्मिती प्लॅंट आवश्यक असेल. यातून एक लाख ५० हजार युवकांसाठी रोजगार उपलब्ध होतील.
  • ग्रामपंचायतस्तरावर व्हावी उभारणी

  • दहनाकरिता ग्रामपंचायत स्तरावर सयंत्राची उभारणी करता येईल. त्याची जबाबदारी गावातील युवक संस्थांकडे दिल्यास उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे.
  • शेतीतील कपाशीच्या शिल्लक अवशेषांचे प्रमाण एकरी सरासरी एक टन इतके असते. त्याला २५०० रुपये प्रतिटन असे दर मिळू शकेल. शेतकऱ्यांकरिता अतिरिक्‍त उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होईल.
  • मिनी जिनिंग मॉडेल सिरकॉटने कापसातील रुई आणि सरकी वेगळी करण्यासाठी कमी क्षमतेची जिनिंग मॉडेल्स विकसित केली आहेत. त्यांची क्षमता प्रतितास ६, ९, १२ आणि २० किलो जिनिंग करण्याची आहे. ६ किलो क्षमतेच्या मॉडेलची किंमत २५ हजार रु., १२ किलोच्या मॉडेलची ३५ हजार रु., तर २० किलोच्या मॉडेलची किंमत ६० हजार रुपये आहे. यामध्ये जिनिंग करून तत्काळ कापसातील रुईची टक्‍केवारी काढता येते. कापूस खरेदीदार, शेतकऱ्यांसाठी हे मिनी जिनिंग फायद्याचे ठरेल. यापूर्वी वर्धा जिल्ह्यात रुईच्या प्रमाणात कापसाचे दर ठरविण्याचा पॅटर्न राबवला होता. त्या वेळी कापसाचा दर ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल असताना ४० टक्‍के रुईचे प्रमाण असणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा दर दोन वर्षांपूर्वी मिळाला होता. केवळ छोट्याशा प्रक्रियेद्वारे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. डबल रोलर जिनिंग मशिन डबल रोलर जिनिंग यंत्राद्वारे ताशी ९० ते १०० किलो रुई काढता येते. त्याच्या किमती दीड लाख रुपयांपासून असून, त्यात सेंसर अंतर्भूत केल्यास पावणेदोन लाख रुपयांपर्यंत किंमत जाते. त्यामध्ये ऑटोफीडरचा समावेश आहे. ४२ इंच रोलर सामान्य मशिन, ४८ इंच रोलर, जंबो ५३ इंच आणि प्लॅटिनम तसेच गोल्डन ज्युबिली ६० इंच रोलर असलेल्या मशिनचा समावेश आहे. या सर्व यंत्रांमध्ये ५ एचपी मोटर असते. या मशिनसोबतच प्री क्‍लीनर जोडलेले असून, कापसातील कचरा काढला जातो. अशा प्रकारची विविध संयंत्रे सिरकॉटने विकसित केली आहेत. कापसापासून गाठी तयार करण्याचीही यंत्रे तयार केली आहेत. रोटरी जिन भारतात केवळ नागपूरमध्ये डबल रोलर जिन मशिनची किंमत अवघी दीड लाख रुपये असताना रोटरी जिनची ७० ते ८० लाख रुपये आहे. ४५० ते ५०० किलो रुई प्रतितास अशी प्रक्रिया या मशिनच्या माध्यमातून होते. देशात अशा प्रकारचे रोटरी जिन केवळ नागपुरातील सिरकॉट या केंद्र सरकारच्या संस्थेकडेच आहे. मेडिकेटेड कापसासाठी सॉ जिनिंग सॉ जिनिंगची किंमतदेखील ८० लाख ते एक कोटी रुपये आहे. याची क्षमता प्रतितास १७० किलोच्या सहा ते सात गाठी इतकी असून, कमी लांब धाग्यांसाठी तिचा वापर होतो. कमी लांबीच्या धाग्याचा कापूस हा मेडिकेटेड कापूस उद्योगात वापरला जात असल्याची माहिती सिरकॉटचे तांत्रिक अधिकारी बाबासाहेब शिरसाट यांनी दिली. विशेष म्हणजे देशात सिरकॉट हे कापूस प्रक्रियेवर आधारित यंत्रे विकसित करणारे एकमेव केंद्र असून, देशभरातीलच नव्हे, तर जागतिक पातळीवरील संशोधकही येथे भेटीसाठी येतात.

    डॉ. एस.के. शुक्‍ला, ९१५८५०७७४१ (मुख्य शास्त्रज्ञ आणि प्रमुख, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍नॉलॉजी (सिरकॉट), नागपूर.) बाबासाहेब शिरसाट, ९९६०१४३८१५ (तांत्रिक अधिकारी, सिरकॉट, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com