गुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा घेतलाय ध्यास

गुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा घेतलाय ध्यास
गुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा घेतलाय ध्यास

गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या उत्पादनांतून लहान शहादे (ता. जि. नंदुरबार) येथील रवींद्र जगन्नाथ लोहार यांनी आपली आगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलांकडून मिळालेल्या कौशल्यात नावीन्याची भर घालत पारंपरिक व्यवसायाचे रुपडे पालटले आहे. त्यांच्या उत्पादनांची ख्याती महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशपर्यंत पोचली आहे. नंदुरबार शहरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना कौटुंबिक अडचणींमुळे विज्ञान विषयातील पदवी पूर्ण करता आली नाही. शिक्षण सोडल्यानंतर १९९६ मध्ये आपल्या वडिलांच्याच लाकडी अवजारे निर्मितीत उतरले. त्यांच्याकडून व्यवसायातील कौशल्ये आत्मसात केली. त्यावेळी ५०० चौरस फुटामध्ये केवळ चार-पाच पत्रे छप्पराच्या निवाऱ्यावर वडिलांचा व्यवसाय सुरू होता. प्रामुख्याने गावातील शेतकरी, सालदार यांच्या मागणीप्रमाणे अवजारे बनवली जात. रवींद्र यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून, एका वेळी अनेक कामे करणाऱ्या बैलचलित अवजारे निर्मितीला प्रारंभ केला. हळूहळू लोखंडी अवजारांच्या निर्मितीला सुरवात केली.

  • एकाच अवजारात पेरणी, कोळपणी, पिकाला मातीची भर अशी दोन तीन कामे व्हायला हवीत, अशा बहुउद्देशीय यंत्र निर्मिती करण्याचा कल असतो.
  • अवजारे गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी दर्जेदार लोखंड व इतर साहित्याचा वापर.
  • अॅडजस्टीव अवजारे हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ९ ते २४ इंची अंतरातील कोळपणीसाठीची अवजारे त्यांनी तयार केली.
  • व्यवसायाची वाढ ः वाढत्या व्यवसायाला निधीची कमतरता भासत होती. तात्पुरते खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन गरज भागवली जाई. पुढे २००४ मध्ये खादी ग्रामोद्योगकडून कर्ज मिळू शकते, हे समजले. मात्र मालकीची जागा नसल्याचे अडचण आली. अशा वेळी गावातील डॉ. कांतिलाल भबुता पटेल मदतीला धावले. त्यांनी स्वतःचे ३५०० चौरस फुटाचे दुमजली घर महामंडळाकडे तारण ठेवण्यासाठी दिले. अशा प्रकारे खादी ग्रामोद्योग मंडळाकडून चार लाख ७५ हजार रुपये कर्ज १२ टक्के व्याजदराने मिळाले. यातून व्यवसायासाठी आवश्‍यक बेंडिंग, वेल्डिंग, ड्रीलिंग, ग्रायंडिंग यासाठीची यंत्रे खरेदी केली. नंतर एक लाख ६५ हजार रुपये अनुदानही मिळाले. व्यवसाय वाढत गेला. कर्जाची व्यवस्थित परतफेडही केली. आता कार्यशाळाही वाढवली आहे. ट्रॅक्टर ट्रॉली व अवजारांची निर्मिती ः

  • गाव परिसरात छोट्या व मोठ्या ट्रॅक्‍टरचा वापर वाढत गेला. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या व्यवसायात बदल केला. ट्रॅक्‍टरचलित अवजारे, दुरुस्तीची किरकोळ कामे शिकून घेतली. ट्रॅक्‍टरसाठी अवजारांची निर्मिती सुरू केली.
  • २००५-०६ मध्ये त्यांनी ट्रॅक्‍टरची ट्रॉली दुरुस्तीचे काम सुरू केले. हे दुरुस्तीचे काम करीत असतानाच लहान व मोठ्या ट्रॅक्‍टरची ट्रॉली निर्मिती सुरू केली. कुणाल ट्रेलर या ब्रॅण्डने त्यांच्या ट्रॉलीची विक्री होत आहे. ट्रॉली वीस वर्षे टिकते, असा त्यांचा दावा आहे.
  • छोट्या व मोठ्या ट्रॅक्‍टरचे सारा, पेरणी यंत्र, कल्टीव्हेटर, रिजर, पलटी नांगर ते बनवितात. ऊस वाहतुकीसाठी उपयुक्त अशा लहान ट्रॉलीही ते तयार करतात. छोट्या ट्रॅक्‍टरवर बॅटरीचलित फवारणी पंप यंत्रणाही बसवून देतात.
  • अवजारे व ट्रॉली निर्मितीसाठी जो पत्रा, लोखंडी रॉड, अँगल लागतात ते दिल्ली, पंजाब, हरियाना भागातून मागवून घेतात. त्यांची अवजारे निर्मितीची गुणवत्ता, हातोटीमुळे नाशिक, नंदुरबार, जळगाव परिसरातील अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. लहान शहादे गावापासून गुजरातमधील तापी जिल्हा जवळ आहे. तर मध्य प्रदेशातील बडवानी, खेतिया भागही जवळ आहे. या गावांतही त्यांची उत्पादने पोचली आहेत.
  • कौशल्यातून विकासाकडे... आता नंदुरबार-प्रकाशा मुख्य रस्त्यावर १५ हजार चौरस फूट जागेत रवींद्र यांची कार्यशाळा सुरू आहे. पत्र्याचे टोलेजंग शेड उभारले आहे. हंगामाच्या दिवसात त्यांना रोज २० मजूर लागतात. दिवसात एक ट्रॉली तयार होते. नवीन तंत्र, अवजार किंवा अभियांत्रिकी संबंधित समस्या असल्यास कोळदा (ता. जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियांत्रिकी विषयतज्ज्ञ जयंत उत्तरवार यांची मदत घेतात. ज्या युवकांना प्रशिक्षित व्हायचे आहे, त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची रवींद्र यांची तयारी आहे. आजवर होतकरू दहा तरुणांनी येथे शिकून लोखंडी अवजारे निर्मितीचा व्यवसाय सुरू केला.

    शेतकऱ्यांची नेमकी समस्या जाणून घेतल्यानंतर शेतीची अवजारे निर्मितीचे काम सोपे होते. प्रत्यक्ष शेतामध्ये चाचण्या घेता येतात. शेतकऱ्यांचा विश्‍वास जिंकला की त्यांच्याकडूनच पुढे आपली जाहिरात होते, या साध्या तत्त्वातून व्यवसाय वाढवत नेला आहे. - रवींद्र लोहार, ९४०३६९९३६५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com