शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरण

शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरण
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरण

नंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील दारासिंग अरविंद रावताळे यांनी आपल्या संपूर्ण शेतीत यांत्रिकीकरण आणले आहे. विविध ट्रॅक्‍टरचलित अवजारे, यंत्रांच्या माध्यमातून पेरणी, मळणीचे यशस्वी नियोजन ते करतात. ट्रॅक्‍टरचलित यंत्रे भाडेतत्वावर देऊन त्यातून उत्पन्न मिळवतात. मजुरी, वेळ व श्रमाची बचत करणारी त्यांची शेती असून त्यासाठी पंचक्रोशीत त्यांनी ओळख कमावली आहे. नंदूरबार हा जिल्हा प्रामुख्याने आदिवासी बहुल मानला जातो. मात्र जिल्ह्यातील शेतकरी आता काळानुसार बदलत आधुनिक शेती करू लागले आहेत. शहादा तालुक्यातील आडगाव हे सातपुडा पर्वतातून येणाऱ्या सुसरी नदीकाठी वसलेले आदिवासी बहुल गाव. तालुका ठिकाणापासून सुमारे १८ किलोमीटरवर वसलेल्या या गावची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत आहे. गावचे पेरणीयोग्य क्षेत्र जवळपास २०० हेक्‍टर आहे. गावातील दारासिंग अरविंद रावताळे हे परिचित व्यक्‍तिमत्त्व. त्यांची ५० एकर बागायती शेती आहे. शेतीला सहा कूपनलिकांचा सिंचनासाठी आधार आहे. पीकपद्धती दहा एकर ऊस, पाच एकर केळी, पाच ते सहा एकर कापूस, १५ एकर मका, दोन-अडीच एकर मिरची, दोन एकर हळद असे पीक नियोजन असते. अन्य दहा एकर शेती मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील खेतियानजीकच्या बेड्या गावात आहे. तेथे ऊस असतो. या शिवाय १० म्हशी, सहा गायींचे संगोपन होते. दोन बैलजोड्या आहेत. दूध व्यवसायही यशस्वीपणे केला जातो. यांत्रिक शेतीची साथ शेतीचा डोलारा मोठा, त्यात मजूरटंचाईची समस्या तीव्र होत चाललेली. अशावेळी अवजारांची गरज तीव्र होऊ लागली. गरजेनुसार त्यांची संख्या वाढवत नेली. आजघडीला दोन मोठे व एक छोटा ट्रॅक्‍टर, ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टरचलित ट्रेलर, पलटी नांगर, बहुविध पेरणी व बहुविध मळणी यंत्र, रोटाव्हेटर, पॉवर टीलर, चारा कुट्टी करण्यासाठी चाफकटर अशी यंत्रसामग्री त्यांच्याकडे आहे. अन्य यंत्रांची जोड शेतीकामासाठी लागणाऱ्या यंत्रांचा फौजफाटा दारासिंग यांच्याकडे आहेच. शिवाय अन्य कामांसाठीची यंत्रेही त्यांच्याकडे आहेत. उदाहरण द्यायचे ठरवले तर काही वेळा कूपनलिकेतील पंपात किंवा केबलसंबंधी बिघाड होऊ शकतो. अशावेळी त्यासंबंधीची यंत्रणा भाडेतत्वावर आणल्यास दोनशे फूट खोलीवरील पंप काढण्यासाठी व पुन्हा पंप खाली सोडायला किमान तीन हजार रुपये लागतात. त्यासाठी दारासिंग यांच्याकडील कूपनलिकेचा पंप वर काढण्यासंबंधीची यंत्रणा उपयोगात येते. त्यांच्याकडे सहा कूपनलिका आहेत. रब्बी हंगाम व पुढे उन्हाळ्यात पंपात बिघाड होण्याचे प्रकार होतात. अशावेळी यंत्राच्या वापरातून पैशांची व वेळेची बचत ते करून घेतात. वीजभारनियमनावर मात करण्यासाठी इंधनचलित जनित्र असून कूपनलिका त्याद्वारे सुरू करून घेता येते. मधुमक्षिकापालन व शेती दारासिंग यांची पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी मधमाशांची साथ घेतली आहे. त्यासाठी तीन मधुमक्षिका पेट्या शेतात ठेवल्या आहेत. म्हणजेच परागीभवनाबरोबर साधारण प्रतिहंगामात दीड किलोपर्यंत मधही उपलब्ध होतो. आंतरपिकांच्या शेतीतही दारासिंग यांचा हातखंडा असून हळदीत मूग, उसात बटाटा आदी पिके त्यांनी घेतली आहेत. कलिंगडाचे एकरी २५ टनांपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे. चार एकर शेती पूर्णतः सेंद्रीय पद्धतीने ते करू लागले आहेत. त्यात जीवामृत, गोमूत्राचा वापर होतो. कारखान्याला भाडेतत्वावर ट्रॅक्टर पानसेमल (मध्य प्रदेश) येथील साखर कारखान्याला ते ऊस देतात. याच कारखान्याला ट्रॅक्टर व ट्रॉली ऊस वाहतुकीला त्यांनी भाडेतत्त्वावर देण्यास सुरवात केली आहे. साधारण १३० रुपये प्रतिटन असे भाडेशुल्क कारखान्याकडून मिळते. डिसेंबरपासून ऊस वाहतूक सुरू होते. पुढे सुमारे चार महिने ती सुरू असते. दररोज १४ टन उसाची वाहतूक या ट्रॅक्‍टरद्वारे होते. मळणीयंत्राचा वापर व दर आकारणी आपल्याकडील मका व कडधान्य पिकांची मळणी खरिपात व रब्बीमध्ये आपल्याकडील यंत्रांद्वारे दारासिंग करतातच. शिवाय आपले काम आटोपले की मळणीचे यंत्र भाडेतत्वावर देतात. विविध पिकांच्या मळणीचे दर जवळपास सारखेच अहेत. सोयाबीन, गहू, मका, ज्वारी, हरभरा मळणीसाठी ८०० रुपये प्रतितास असा दर ते आकारतात. पेरणीसाठी एकरी ८०० रुपये, रोटाव्हेटरसाठी १२०० रुपये, पल्टी नांगरसाठी १८०० रुपये असा दर ते आकारतात. इंधनावरील खर्च कमी करून दरवर्षी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत नफा ते मिळवितात. मशागत, आंतरमशागत, मळणी यांवरील जवळपास दोन ते सव्वादोन लाख रुपये खर्चही ते दरवर्षी वाचवितात. कुशल मजुरांची साथ आपल्या गावातीलच युवकांना रोजगार दिला आहे. पाच सालगडी आहेत. बहुतेक सर्वांना ट्रॅक्‍टर चालविण्यासह मशागत, मळणीसंबंधीची यंत्रे हाताळता येतात. दोन सालगडींना दुचाकी घेऊन दिल्या आहेत. बैलजोडीचलित ३० ते ३५ वर्षे जुनी लाकडी अवजारे आहेत. त्यांचा उत्तमरित्या सांभाळ केला असून दादर ज्वारी, गहू आदी पिकांसाठी तसेच पेरणी, आंतरमशागत, मशागतीची कामांसाठी या अवजारांचा उपयोग होतो. पुरस्काराने सन्मान दिल्ली येथे फेब्रुवारीत आयोजित उत्तर क्षेत्रिय कृषी मेळाव्यात दारासिंग यांनी सहभाग घेतला. त्यात त्यांचा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते सत्कार झाला. दारासिंग यांची पत्नी सौ. स्मिता यांनाही जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. थोरला मुलगा योगेश कृषी विषयातील पदविकाधारक असून लहान मुलगा ऋषीकेश धुळे येथे कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहे. योगेशदेखील ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर यंत्रे चालवण्यात कुशल आहे. शेती व्यवस्थापनाची जबाबदारी तो सांभाळू लागला आहे. कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ आर. एम. पाटील, पद्माकर कुंदे, कृषी विभागातील बी. एस. पाटील यांचे मार्गदर्शन दारासिंग यांना मिळते. संपर्क- दारासिंग रावताळे - ९९२१७४४८९१ योगेश रावताळे - ८८८८४७८१६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com