महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे

महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे
महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे

रोटरी टोकण यंत्र

  • हे उभ्याने ढकला पद्धतीने चालणारे टोकण यंत्र आहे.
  • यंत्राच्या सहाय्याने मका, सोयाबीन आणि तूर यांसारखे मध्यम आकाराचे बी पेरता येते. यंत्राच्या सहाय्याने एका ओळीतील दोन बियांतील अंतरही ठरविता राखता येते.
  • एक महिला एका तासात ०.०५ हेक्टर जागेत टोकण करु शकते. यंत्राचे वजन २२ किलो आहे.
  • कोळपणी यंत्र

  • जमिनीवर बसून खुरपणी केल्यामुळे गुडघे दुखतात. सुधारित हात कोळपी वापरून हे काम उभ्याने करता येते.
  • यंत्राचा उपयोग केल्यास मजुरांची संख्या कमी करुन अधिक चांगले काम होऊ शकते.
  • त्रिफाळी

  • हाताने आंतरमशागत करण्यासाठी त्रिफाळी वापरण्यात येते.
  • यंत्र वजनाने हलके असून त्याला तीन फाळ बसविलेले आहेत. त्याच फाळांना तीन रुंद पास आहेत.
  • हॅंन्डलने त्रिफाळी ओढली असता जमिनीत पास घुसून ती भुसभुशीत होते. जमिनीतील खोलवरचे तण उपटले जाते.
  • चाकाचे त्रिफाळी कोळपे / सायकल कोळपे

  • यंत्रामध्ये लोखंडी सांगाड्याला एक चाक व त्याच्या पाठीमागे पास बसविलेले असतात. ते वर-खाली करता येतात.
  • तण काढण्यासाठी तीन व्ही आकाराचे पास आणि ढकलण्यासाठी चाक आहे.
  • यंत्राच्या सहाय्याने एक महिला ०.०४ हेक्टर प्रतितास कोळपणी करू शकते.
  • मकृवि विळा-खुरपे

  • याचे वैशिष्ट्ये म्हणजे हे पारंपरिक विळा व खुरपी यांच्या सारखे असल्यामुळे मजुरांना काम करताना त्रास होत नाही.
  • कापणी करण्यासाठी आतून धार लावलेले पाते असून त्याची रुंदी १५० मि.मी. आहे तर बाहेरील बाजूस असलेली धार ही ६३ मि.मी. आहे. ती खुरपणीसाठी वापरही जाते.
  • विळा खुरपीचे वजन हे इतर विळ्यापेक्षा कमी असून ते स्प्रींग स्टीलपासून बनविले असल्यामुळे नेहमी धार लावावी लागत नाही.
  • एक महिला मजूर साधारणत: एका दिवसात ०.१७० हेक्टर एवढे कापणीचे काम करू शकते.   कापूस सड उपटणी चिमटा
  •   कापसाचे सड उपटण्यासाठी व्यक्तीला खाली वाकून जोर लावून ते उपटावे लागतात. त्यामुळे हात, पाठ व कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासाठी चिमट्याचा वापर करणे फायद्याचे आहे.
  • यात एक चिमटा असतो, त्यामध्ये सड पकडून लिव्हरच्या सहाय्याने ते पकडावे लागते. यांचे हॅंडल उंच असल्याने खाली न वाकताच सहजपणे सड उपटले जाते.
  • चिमट्याचे वजन ५.२५ किलो आहे. एक महिला एका तासामध्ये ५० वर्ग मिटर एवढ्या क्षेत्रावरील सड काढू शकते.
  • मका सोलणी यंत्र

  •  कणसापासून दाणे वेगळे करण्यासाठी पारंपरिक पद्धतीत ती काठीने बडविली जातात. त्यामुळे हाताला इजा होते, बियांची अंकुरण क्षमता कमी होते. हे टाळण्यासाठी मका सोलणी यंत्र वापरले जाते.
  •  हे यंत्र म्हणजे ६.४ सेंमी लांब व ७.२ सें.मी. व्यासाचा एक पाईप तुकडा असून त्याला आतल्या बाजूने दातेरी पट्ट्या बसविलेल्या असतात.
  •  एका हातात यंत्र पकडून दुसऱ्या हाताने कणीस घालून पुढे-मागे फिरविल्यास प्रति तास २२-२५ किलो दाणे मिळतात. हेच यंत्र अष्टकोनी आकारात मिळते.
  •  हॅंन्डलच्या सहाय्याने चालणारे रोटरी मका सोलणी यंत्र उपलब्ध आहे. रोटरी डीक्सवरील दात्यामुळे फिरतेवेळेस कणसापासून दाणे वेगळे करते. यात मक्याची कणसे हॉपरमध्ये टाकावी लागतात. यामध्ये बसून व उभे राहून काम करता येते. यंत्राच्या सहाय्याने एका तासात ३० ते ८० किलो दाणे प्रती तास वेगळे होतात.
  • पदचलित मका सोलणी यंत्र

  •  मका सोलणीसाठी हाताने सोलणी यंत्र किंवा पारंपरिक पद्धतीने करतात. या पद्धतीमध्ये होणारा श्रम व वेळ वाचवण्याच्या उद्देशाने पदचलित मका सोलणी यंत्र विकसित करण्यात आले आहे.
  •  यंत्राचा सोलणीचा दर ८०-८५ किलो प्रतितास इतका असून त्याची सरासरी सोलणी क्षमता ९७.७४ टक्के इतकी आहे.
  • धसकटे गोळा करण्याचे यंत्र

  •  पीक काढणीनंतर व वखरणीनंतर धसकटे व काड्या गोळा करणे हे वेळखाऊ व श्रमिक काम असते.
  •  साधारणत: एका हेक्टरवरील धसकटे गोळा करण्यासाठी १२ ते १५ महिला मजूर लागतात. त्याएवजी धसकटे गोळा करण्याचे यंत्र वापरणे सोयीचे होते. हे यंत्र वजनाने हलके असल्याने एका महिलेस वापरण्यास सोपे आहे.
  •  हे यंत्र म्हणजे दीड ते सव्वादोन फूट लोखंडी अॅंगलला दर अर्धा इंच अंतरावर ३ इंच असलेली लोखंडी सळी लावलेली आहे. सळईचे जमिनीतले टोक अणकूचीदार असते. याला ५ फूट लांबीचे बांबू किंवा हलक्या पाईपचे हॅंडल बसविलेले असते. त्यामुळे न वाकता काम सोपे होते.
  •  दोन महिला मजूर एका दिवसात एका हेक्टरवरील धसकटे गोळा करू शकतात.
  •  ः एस. एन. सोलंकी, ८००७७५२५२६

    (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com