पुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या निचऱ्यासह भूजलात सुधारणा

पुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या निचऱ्यासह भूजलात सुधारणा
पुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या निचऱ्यासह भूजलात सुधारणा

हरियाना येथील कैठाल जिल्ह्यातील मुंद्री, गियोंग, कठवार, संपली खेरी आणि भैनी माजरा या पाच गावांमध्ये क्षारांमुळे बाधित झालेल्या जमिनी आणि भूजलाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी फार्मर फर्स्ट हा प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल येथील सेंट्रल सॉईल सलायनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने राबवण्यात आला होता. हरियाना राज्यातील कैठाल जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भूजलाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. त्यातही मुंद्री, गियोंग, कठवार, संपली खेरी आणि भैनी माजरा या पाच गावांमध्ये प्रतिलिटर आरएससी २.५ पेक्षा अधिक आणि सामू ८.२ पेक्षा अधिक पोचला आहे. यामुळे मातीतील निचरा होण्याचा दर कमी झाला असून, पाणथळ जागा तयार होत आहेत. परिणामी पावसाळ्यामध्ये अधिक पावसाच्या काळात पाण्यामध्ये पिके बुडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. येथील खोलगट भागामध्ये साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा आणि सुयोग्य विल्हेवाट लावण्यासाठी कॅव्हिटी टाइप भूजल पुनर्भरण संरचना बसवण्यात आली. अशी आहे यंत्रणा ः पारंपरिक विंधन विहिरीसोबत वाळूंच्या साह्याने बनवलेली गाळण यंत्रणा बसवलेली असते. त्यासाठी जमिनीच्या चिकनमातीच्या थराखालील वाळूच्या थरांपर्यंत बोअरवेल खोदली जाते. त्यांमध्ये उच्चदाब क्षमतेचा (१० किलो प्रति वर्गमीटर) पीव्हीसी पाइप (व्यास ९ इंच) टाकला जातो. या गावांमध्ये चिकणमातीनंतर वाळूचा थर २१० फूट खोलीवर असल्याने तिथपर्यंत बोअर वेल खोदण्यात आली. तेथील वाळू पम्पिंगच्या साह्याने खेचून अर्धगोलाकार स्थिर पोकळी तयार करण्यात आली. याद्वारे पावसाचे पाणी गाळून भूजलामध्ये सोडले जाते. यामुळे एकाच वेळी शेतातील पाण्याचा निचरा आणि विहिरीचे पुनर्भरण साध्य होते. प्रकल्पाचा शेतकऱ्यांना झाला फायदा ः दर काही टप्प्याने पाण्याच्या पातळीमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करण्यात आले आहे. १. पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर २०१७ या काळात भूजल पातळी १ मीटरपर्यंत आली. २. सिंचनाच्या पाण्याची अल्कता कमी झाली. (RSC: १.५-२.५ meq/l). भूजलाच्या दर्जामध्ये सुधारणा झाली. ३. मुख्य युनिटपासून १०, ३० आणि ५० मीटर अंतरावर पियझोमीटर बसवण्यात आले होते. त्याद्वारे पाण्याच्या दर्जातील सुधारणा जाणून घेण्यात आली. ४. भाताच्या पुनर्लागवडीनंतर जून २०१७ मध्ये अखेरच्या आठवड्यामध्ये मोठा मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले. (चित्र १ अ) मात्र, बसवलेल्या संरचनेमुळे पाण्याचा निचरा वेगाने झाला. परिणामी अत्यंत खोलगट ५ हेक्टर क्षेत्रातील पीक वाचवणे शक्य झाले. (चित्र १ ब). अन्य भागांत कमी ते मध्यम प्रमाणामध्ये नुकसानीचा सामना करावा लागला. अर्थशास्त्र ः या ठिकाणी जागेनुसार संरचना उभारण्याचा एकूण खर्च २.५ लाख रुपये झाला. साधारणपणे १२०० रुपये प्रतिफूट हा स्थाननिहाय भिन्न असू शकतो. मात्र, पूरस्थितीमुळे पीक नष्ट झाल्यास भात पुनर्लागवडीचा खर्च (५ हेक्टर क्षेत्रासाठी) आणि उशिरा झालेल्या लागवडीमुळे भाताच्या उत्पादनामध्ये होणारी संभाव्य घट (१५ ते २५ टक्के) वाचू शकते. त्याचा आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास रोपवाटिका आणि मजुरीचा खर्च ३० ते ३५ हजार रुपये आणि उत्पादन घटीचे मूल्य ८० ते ९० हजार रुपये इतके होते. म्हणजेच एकाच वर्षामध्ये १.१० ते १.२५ लाख रुपये वसूल झाले. एकूण प्रकल्पाचा खर्च पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये वसूल होईल. या प्रकल्पाचा नफा ः खर्च गुणोत्तर १.२५ इतका होतो. सध्या निचरा आणि पुनर्भरण संरचना प्रकल्पासाठी झालेल्या गुंतवणुकीवर अंतर्गत परतफेडीचा दर (आयआरआर) हा १९ टक्के होतो. याचा सर्वाधिक फायदा अतिरिक्त झालेल्या पावसाच्या पाण्याचे भूजलामध्ये पुनर्भरण केले जाते. त्यामुळे भूजलातील पाण्याची अल्कता कमी होते. प्रातिनिधिक शेतकरी -

हरियाना येथील काठवार (जि. कैठाल) येथील शेतकरी चंदी राम आशू राम यांचे वय ५८ वर्षे असून, शेती ३.५ हेक्टर आहे. जमीन पाणथळ असल्याने भात पीक घेतात. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा सामना त्यांना करावा लागत असे. त्यांच्या जनावरांची संख्या १० असून, त्यातील ३ दुधावर आहेत. येथील भूजलाची अल्कता जास्त असल्याने पाण्याची समस्या तीव्र बनत चालली होती. यावर मार्ग काढण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांना फार्मर फर्स्ट या प्रकल्पाचा फायदा झाला. संपर्क ः चंदी राम आशू राम, ०९४१६८२२०४१  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com