योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर

योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर

पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू अवस्थेत आहे, याची खात्री करूनच चालू करावा म्हणजे अपघात होणार नाही. प्रत्येक नांगरट किंवा इतर काम झाल्यानंतर चेस, गिअरबॉक्स, रोटोव्हेटर यांचे नटबोल्ट घट्ट करावेत. नांगरटीच्या वेळी खोली नियंत्रित करणारे चाक जुळवून योग्य खोली नियंत्रित करावी. कोरड्या नांगरणीपासून चिखलणीपर्यंत, मशागत व अंतर्गत मशागत, पाण्याचा पंप चालवण्यापासून ते कीडनाशक फवारणीपर्यंत, दळण यंत्रणा, भात भरडणी, उसाचे चरक चालवणे ही सर्व कामे पॉवर टिलरद्वारे होतात. इंजिन, शक्ती संचारण यंत्रणा, ब्रेक आणि स्टिअरिंग प्रणाली, गती नियंत्रणाची व्यवस्था ट्रॅक्शनची चाके हे पॉवर टिलरचे मुख्य भाग आहेत. १) रोटोव्हेटर हे पॉवर टिलरचे मुख्य अवजार आहे. नांगरट, ढेकळे बारीक करणे, जुन्या पिकांचे अवशेष काढणे, चिखलणी करणे, यासाठी रोटोव्हेटरचा वापर केला जातो. याला १२ ते २२ या संख्येत फाळ जोडण्याची सोय केलेली असते. यामध्ये अर्ध गोलाकार कुदळीसारखे असणारे फाळ हे कोरडी नांगरट, तणनियंत्रण, खोली नांगरट यासाठी वापरतात. तर विळ्याच्या आकाराचे फाळ, तोंडाला वक्रता असणारे चपटे फाळ चिखलणीसाठी वापरले जातात. २) कल्टीव्हेटर ही यंत्रणा फळबाग, वनशेतीमधील मशागतीसाठी उपयुक्त ठरते. पॉवर टिलरमुळे आंतरमशागतीची कामे वेळेत पूर्ण होतात. पॉवर टिलरचे व्यवस्थापन १) इंजिन व एअर क्‍लिनरमधील तेलाची पातळी तपासावी, ती कमी असल्यास बरोबर करून घ्यावी.  २) इंजिन फाउंडेशन व चॅसीचे नट-बोल्ट घट्ट बसवावेत. चाकाचे व दातांचे नट बोल्ट ढिले झाले असल्यास ते घट्ट बसवावेत.  ३) चाकामधील हवेचा दाब तपासावा. शिफारशीत दाबाइतकी हवा चाकामध्ये भरावी.  ४) पॉवर लिटरच्या व्ही बेल्टचा ताण तपासून घ्यावा. बेल्टच्या मध्यभागी दाबल्यानंतर १२ मि.मी. पेक्षा जास्त दाबला जाणार नाही, अशाप्रकारे बेल्ट घट्ट करावा.  ५) गिअर बॉक्‍स, रोटरी चेनमधील तेलाची पातळी तपासावी, तसेच नियमितपणे शिफारशीनुसार ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर आणि इंजिन ऑइल बदलावे.  ६) इंजिनमध्ये थंडीच्या दिवसांत एस. ए. ई. ३० आणि उन्हाळ्यात एस. ए. ई. ४० या प्रतीचे वंगण तेल वापरावे.  ७) गिअर बॉक्‍समध्ये एस. ए. ई. ९० प्रतीचे तेल वापरावे. हे तेल १५० तासानंतर बदलावे.  ८) वेळोवेळी क्‍लच-शाफ्ट, क्‍लच रॉड, टेलव्हिल बुश, ऍक्‍सिलेटर केबल यांना तेल लावावे. ९) रोटाव्हेटर शाफ्टच्या ग्रीस कपमधील ग्रीस दर २५ तासांच्या कामानंतर बदलावे. पॉवर टिलर चालवताना घ्यावयाची काळजी १) पॉवर टिलर विकत घेतल्यानंतर सोबत मिळणारी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून सर्व भागांची व प्रणालींची माहिती करून घ्यावी. २) पॉवर टिलर शेतात वापरण्यापूर्वी मशिनचे काही भाग ढिले झाले असतील, तर ते घट्ट आवळावेत, तसेच झिजलेले, तुटलेले भाग बदलावेत. ३) पॉवर टिलर चालविण्यापूर्वी सर्व शील्ड व गार्ड नीटपणे बसविल्याची खात्री करावी. ४) शेतात वापरापूर्वी पॉवर टिलरच्या टाकीमध्ये इंधन भरावे. पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू अवस्थेत आहे, याची खात्री करूनच चालू करावा म्हणजे अपघात होणार नाही. ५) पॉवर टिलर चालविताना फिरणाऱ्या भागांपासून हात व पाय यांचा बचाव करावा. विशेषतः रोटाव्हेटर जोडला असताना पाय रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यांमध्ये अडकणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ६) जमीन ओली असेल, तर पॉवर टिलर चालवू नये. काम करीत असताना मध्येच अडथळा आल्यास पॉवर टिलर त्वरित बंद करावा. ७) पॉवर टिलर चालू स्थितीत ठेवून सोडून जाऊ नये. पॉवर टिलर वळविताना किंवा वाहतूक करताना ट्रान्समिशनमुक्त करावे. ८) पॉवर टिलरसोबत काम करीत असताना अंगावर सैल कपडे वापरू नयेत, तोंडावर व डोक्‍यावर चांगल्या कपड्याने गुंडाळून घ्यावे. ९) प्रत्येक नांगरट किंवा इतर काम झाल्यानंतर चेस, गिअरबॉक्स, रोटोव्हेटर यांचे नटबोल्ट घट्ट करून घ्यावेत. नांगरटीच्या वेळी खोली नियंत्रित करणारे चाक जुळवून योग्य खोली नियंत्रित करावी. नांगरणीसाठी रोटोव्हेटर वापरताना पुरेशी खबरदारी न घेतल्यास अपघाताची शक्यता असते. १०) पॉवर टिलर वापरण्यापूर्वी या यंत्राची संपूर्ण माहिती करून घ्यावी. गिअरबॉक्समधील ऑइलची पातळी योग्य ती ठेवावी. व्ही बेल्टचा ताण योग्य ठेवावा. हाताने मध्यभागी दाबल्यानंतर दोन-चार सें.मी. दाबला जावा इतक्या स्वरूपात घट्ट करावा. ११) बांधावरून किंवा घसरत्या शेतात चढ-उतार करताना रोटोव्हेटर बंद करावा. १२) रोटोव्हेटरमधील गवत, कचरा, पिकांचे राहिलेले अवशेष काढताना पॉवर टिलरचे इंजिन पूर्णपणे बंद ठेवावे. पॉवर टिलरचा उपयोग ः १) पॉवर टिलरला रोटाव्हेटर जोडून जमीन भुसभुशीत करता येते. एकाचवेळी नांगरणी आणि ढेकळे फोडणे ही दोन्ही कामे होतात, त्यामुळे ढेकळे फोडण्यासाठी जमिनीला स्वतंत्रपणे कुळवाच्या पाळ्या घालण्याची आवश्‍यकता राहत नाही. २) फळबागांमध्ये आंतरमशागत करतेवेळी दहा ते १५ सें.मी. खोलीपर्यंत तण समूळ काढले जाते. ९५ टक्के क्षेत्रातील तणनिर्मूलन करता येते; तसेच फळझाडांच्या खालून व्यवस्थितपणे काम करता येत असल्याने झाडांच्या फांद्या मोडत नाहीत.  ३) फळझाडाभोवती रोटाव्हेटरला पॉवर टिलर उलट्या दिशेने चालवून आळे तयार करण्यासाठी कमी कष्टात, कमी खर्चात व कमी वेळेत वापर करता येतो. ४) भातशेतीमध्ये रोटाव्हेटरच्या साह्याने चिखलणीचे काम सुलभरीत्या व प्रभावीपणे करता येते.  ५) पॉवर टिलरचलित बहुपीक टोकण यंत्राचा वापर करून भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, तूर, हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी पिकांची टोकण करता येते.  ६) वनशेतीमध्ये झाडे लावण्यासाठी तसेच फळझाडांच्या लावणीसाठी खड्डे घेण्याचे काम पॉवर टिलरने करता येते. हे खड्डे खोदण्याचे यंत्र पॉवर टिलरच्या पुढील बाजूस जोडता येते. या यंत्राद्वारे ३० सें.मी. व्यासाचे व ४५ सें.मी. खोलीचे खड्डे खोदता येतात.  ७) ट्रॅक्‍टरप्रमाणे पॉवर टिलरला ट्रॉली जोडून शेतीमालाची वाहतूक करता येते.  ८) पॉवर टिलरच्या मागील बाजूस जोडून भात मळणीयंत्र वापरता येते. हे मळणीयंत्र हवे त्या ठिकाणी नेण्यासाठी यंत्रास दोन रबरी चाके लावलेली असतात. ९) फळबागांमध्ये, तसेच वनशेतीमध्ये आंतरमशागतीसाठी पाच दातांचा कल्टिव्हेटर उपलब्ध आहे. कल्टिव्हेटरच्या साह्याने १५ सें.मी. खोलीपर्यंत मशागतीची खोली कमी-जास्त करता येते. एका दिवसात १ ते १.२५ हेक्‍टर क्षेत्रावर आंतरमशागत शक्‍य होते.  १०) पाणी उपसण्याचा पंप, कडबा कटर, पिठाची गिरणी, गवत कापण्याचे यंत्र, जनरेटर इ. वापरता पॉवर टिलरच्या साह्याने करता येतो. संपर्क ः वैभव सुर्यवंशी- ९७३०६९६५५४ (विषय विशेषज्ञ(कृषि शक्ती आणि अवजारे), कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com