ड्रॅगन फ्रूटपासून आरोग्यवर्धक जेली, जॅम, प्युरी

ड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रियायुक्त उत्पादने
ड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रियायुक्त उत्पादने

कमी शर्करा असलेल्या फळांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे महत्त्वाचे फळ आहे. भारतीय ग्राहकांची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने या फळांची आयात होत असे. मात्र, अलीकडे या फळाची लागवडही वाढू लागली आहे. या फळांपासून प्रक्रिया पदार्थाची निर्मिती केल्यास मागणी वाढू शकेल. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वनस्पती असून, ती वेगवेगळ्या हवामानामध्ये येते. अत्यंत काटक असलेल्या या वनस्पतीची लागवड आपल्याकडेही कमी- अधिक क्षेत्रावर होऊ लागली आहे. लागवडीनंतर सुमारे १५ महिन्यांनी उत्पादनाला सुरवात होत असली तरी पूर्ण क्षमतेने उत्पादन हाती येण्यासाठी तीन वर्षांचा काळ लागतो. काढणीचा काळ साधारणतः मे ते सप्टेंबर या दरम्यान असतो. एकरी सरासरी सुमारे पाच टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते.

ड्रॅगन फ्रूट ः हे फळ मूळ मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील आहे. या फळामध्ये मलईदार गर असून, त्याला विशिष्ट असा सुगंध असतो. फळ कापल्यानंतर गर सहजतेने काढता येतो. त्यात असलेल्या काळ्या छोट्या बियांमुळे खाताना त्याचा पोत एकाच वेळी मलईदार आणि कुरकुरीत लागतो.

  • गर कच्चा खाताना किचिंत गोड लागतो. त्याला कॅलरीचे प्रमाण कमी आहे. त्यातील बिया खाता येतात. बियांना किचिंत मातकट बदामासारखी चव लागते. या फळामध्ये भरपूर पाणी, खनिजे आणि पोषक घटक असतात.
  • गुलाबी गर असलेल्या फळाला अधिक मागणी असली तरी अन्य पांढऱ्या गराचा विशेष चाहता वर्ग आहे.
  • या फळांना ताज्या स्वरूपामध्ये मोठी मागणी असते.
  • त्याचप्रमाणे मूल्यवर्धित पदार्थाच्या निर्मितीलाही वाव आहे. या फळापासून फ्रूट बार, आइस्क्रीम, जेली, मार्मालेड, रस, पेस्ट्री, गर आणि गोड दही (योगर्ट) तयार करता येते.
  • या पिकाच्या शेतीचा अंतर्भाव कृषी पर्यटनामध्ये करता येईल. नव्या पिकाच्या आकर्षणाने शहरी लोक व ग्राहक नक्कीच जोडले जातील.
  • आरोग्यपूर्ण गुणधर्मामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असते. भारतामध्ये हे फळ तुलनेने नवीन असल्याने ग्राहकांची मागणी व अन्य बाबींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. परदेशातून आयात फळांच्या तुलनेत भारतीय फळांना अधिक गोडी असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी प्रक्रियायुक्त पदार्थांची जोड उपयुक्त ठरू शकते.
  • आरोग्यासाठी फायदे ः

  • उच्च प्रतीची अॅण्टिऑक्सिडंट्स.
  • क जीवनसत्त्वाने परिपूर्ण असून, प्रतिकारकक्षमता वाढवते.
  • याच्या गरामध्ये उत्तम बहू असंपृक्त मेदाम्ले असतात. त्यात फॅट्स मेंदूसाठी फायद्याचे असून, शरीराचे वजन कमी करण्यासाठी साह्य करते.
  • ब जीवनसत्त्व भरपूर असतात.
  • कॅल्शिअमचे प्रमाण उच्च असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरतात.
  • कॅरोटिन असून, बियांतील ओमेगा ३ मेदाम्ले डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतात. डोळ्यांची दृष्टी सुधारते.
  • कोलेस्टेरॉल कमी करणे, पोटाच्या विकारावर, रक्तातील शर्करा कमी करणे या प्रकारे उपयुक्त.
  • हिमोग्लोबिन कमी होण्याचा धोका टाळता येतो.
  • हृदयाचे आरोग्य सुधारते.
  • शरीराचे वजन व्यवस्थापनात फायदेशीर.
  • कर्करोग व जन्मजात काचबिंदू (कॉन्जिनीटाल ग्लुकोमा) रोखण्यास मदत करते.
  • प्रतिकारकशक्ती वाढवते.
  • संधिवातातील वेदना कमी करते.
  • दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त.
  • शरीरातील पेशीच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त.
  • डेंग्यू रुग्णासाठी उपकारक.
  • मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर.
  • हे कमी कॅलरीयुक्त अन्न आहे. काही अभ्यासामध्ये यामध्ये रक्तातील शर्करा कमी करण्याची क्षमता असल्याचे पुढे आले आहे.
  • मर्यादा ः या फळामध्ये तंतूमय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी आहे, त्यामुळे त्यातील उच्च फ्रुक्टोज सावकाश कमी होते. हे शर्करा असलेल्या लोकांसाठी फारसे योग्य मानले जात नाही.
  • फळाची काढणी ः ड्रॅगन फ्रूटची आकर्षक फुले मे - जून या कालावधीत येतात, तर फळे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र होऊ शकतात. साधारण एक वर्षानंतर फलधारणेला प्रारंभ होतो. फुलोऱ्यानंतर एक महिन्याने फळ काढणीसाठी तयार होते. कच्च्या फळाचा रंग तेजस्वी हिरवा असतो. काही दिवसांत तो हळूहळू गडद लाल होतो. फळाच्या सालीचा रंग बदलण्यास सुरवात झाल्यानंतर तीन ते चार दिवसांत फळाची काढणी करावी. हा काळ उत्तम असतो. फळाची काढणी करण्यासाठी कोयत्याचा वापर करावा. एकरी पाच ते सहा टन ड्रॅगन फ्रूट मिळू शकतात.

    ड्रॅगन फ्रूट उत्पादने ः ड्रगन फळांचा गर काढणे ः फळाचा गर काढणे अत्यंत सोपे आहे. दोन भागांत तुकडे करून, चमच्याच्या साह्याने गर सहजतेने काढता येतो. नुसत्या गराची विक्री प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांपर्यंत होऊ शकते.

    गरयुक्त रस - पूर्णपणे पिकलेली फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. चाकूने त्यावरील साल काढून त्यातील बिया वेगळ्या करून घ्याव्यात. ब्लेंडिंग यंत्राच्या साह्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा. हा रस गोठवून ठेवल्यास दीर्घकाळपर्यंत वापरता येतो.

    जेली एक किलो जेली बनवण्यासाठी ४५० ग्रॅम गाळलेला ड्रॅगन फ्रूटचा रस घ्यावा. त्यात ५५० ग्रॅम साखर, ५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावा. यामध्ये ५, १० आणि १५ ग्रॅम पेक्टीन मिसळून आवश्यकतेनुसार वेगवेगळी फॉर्म्युलेशन्स तयार करता येतात. त्यासाठी एका स्टेनलेस स्टिलच्या भांड्यामध्ये पेक्टीन इतक्या प्रमाणामध्ये साखर घेऊन चांगले मिसळून घ्यावे. उर्वरित साखर ही ड्रॅगन फ्रूटच्या रसामध्ये मिसळावी. त्याला उष्णता द्यावी. या द्रावणाचा टीएसएस ५५० ब्रिक्स होईपर्यंत साखर मिसळावी. त्यानंतर पेक्टीन व साखरेचे मिश्रण त्यात मिसळावे. साधारणपणे टीएसएस ५८० ब्रिक्स येईपर्यंत उष्णता देणे सुरू ठेवावे. या वेळी त्यात सायट्रिक अॅसिड मिसळावे. जेलीचा टीएसएस ६७० ब्रिक्स झाल्यानंतर त्यात केएमएस मिसळावे. हे मिश्रण निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावे. झाकण लावून पॅराफिनच्या साह्याने हवाबंद करावे. व्यवस्थित साठवण केल्यास साठवणीच्या विविध अभ्यासामध्ये या जेलीतील रंग, चव, पोत, टीएसएस आणि सामू अशा निकषांमध्ये चार महिन्यांमध्ये कोणताही बदल होत नसल्याचे दिसून आले आहे.

    जॅम ड्रॅगन फ्रूटचा गर २८ टक्के, पाणी १६.५ टक्के, पांढरी साखर ५० टक्के, पेक्टीन भुकटी ५ टक्के, सायट्रिक अॅसिड ०.५ टक्के, सोबिक अॅसिड ०.०५ टक्के (परिरक्षक -प्रीझर्वेटिव्ह)

    तयार करण्याची पद्धत ः

    1. पक्व फळे स्वच्छ धुऊन, त्यांची साल काढून घ्यावी. त्यांचा गर काढावा. त्यात वरील प्रमाणात पाणी मिसळून सावकाश मिसळून घ्यावे. गर रगडून, ब्लेंड करून पाणी मिसळत जावे.
    2. पांढरी साखर, पेक्टीन, सायट्रिक अॅसिड मोजून योग्य प्रमाणात तयार ठेवावे. त्याचप्रमाणे काचेच्या बाटल्या उकळत्या पाण्यामध्ये (१०० अंश सेल्सिअस) पाच मिनिटे ठेवून निर्जंतूक करून ठेवाव्यात.
    3. एका भांड्यात ब्लेंडिंग केलेला गर आणि थोडेसे पाणी घेऊन चांगला शिजवावा. त्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात पांढरी साखर, पेक्टिन पावडर, सायट्रिक अॅसिड, परिरक्षक मिसळून विरघळेपर्यंत सावकाश हलवावे. त्यानंतर आणखी १० ते १५ मिनिटे शिजू द्यावे.
    4. मिश्रणाचे जेलमध्ये रूपांतर होऊ लागताच, उष्णता देणे बंद करावे. चमच्याने जेलीचे काही ठिपके थंड पाण्यात टाकून चाचणी घ्यावी. जर पाण्यातही जेली एकत्र व घट्ट राहत असल्यास जेली तयार झाल्याचे मानावे. थर्मामीटर उपलब्ध असेल, तर मिश्रणामध्ये बुडवून तापमान १०४ अंश सेल्सिअस असल्याची खात्री करावी.
    5. काचेच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ७५ टक्के अल्कोहोल द्रावणाचा वापर करावा. अशा निर्जंतूक बाटल्यांमध्ये जेली भरून त्याला झाकणाच्या साह्याने हवाबंद करावे.
    6. या बाटल्या उलट्या ठेवाव्यात. म्हणजे त्यातून उत्सर्जित होणारा वायू आतमध्ये राहील. त्यानंतर एक रात्रभर सामान्य तापमानापर्यंत थंड होऊ द्याव्यात.

    प्युरी ड्रॅगन फ्रूट प्युरी ही लाल जांभळ्या रंगाची असते. त्यात साखरेचे प्रमाण १२.६ अंश ब्रिक्स असते. ड्रॅगन फ्रूटचा रस हा सामान्यतः पारदर्शक लाल रंगाचा असतो. त्याचे पॅकिंग करावे. उभ्या राहू शकणाऱ्या पॅकिंग पाऊचचा साठवण कालावधी १२ महिने, तर काचेच्या बाटल्यांमध्ये केलेल्या पॅकिंगचा साठवण कालावधी ५ महिने राहू शकतो.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com