धान्य साठवणीतील कीड नियंत्रण सापळ्याचा वापर

धान्य साठवणीतील कीड नियंत्रण सापळ्याचा वापर
धान्य साठवणीतील कीड नियंत्रण सापळ्याचा वापर

सध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी झाल्याने साठवणीतील अनेक किडींची क्रियाशीलता वाढते. नवीन हंगामाची गडबड सुरू असली तरी मागील हंगामातील उत्पादनांची साठवण अधिक काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होऊ शकते. प्रादुर्भाव होण्याची प्रमुख कारणे

  • धान्याचे तापमान : धान्यातील कीटक २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या कक्षेतच क्रियाशील राहू शकतात.
  • धान्यातील ओलावा : ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • शेतातील प्रादुर्भाव : काही कीटक शेतातच पक्व अवस्थेतील दाण्यांवर अंडी घालतात. अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळताच अळी बाहेर येते. धान्य खाण्यास सुरवात करते.
  • साठवणीच्या कोठ्या किंवा पोती यांची अस्वच्छता : दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या पोत्यांमध्ये कीटक व त्यांची अंडी तशीच राहून प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • साठवणीच्या जागी भेगा व छिद्रे : यामध्ये किडींना लपण्यासाठी, सुप्तावस्थेसाठी जागा मिळते. तसेच त्यात अडकवलेले धान्य खाद्य म्हणून उपलब्ध होते.
  • असे होते धान्याचे किडीमुळे नुकसान किडीमुळे वजनात घट, प्रत खालावणे याबरोबरच कमी तापमान व आर्द्रतेतील वाढीमुळे धान्यावर बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. धान्याची उगवण क्षमता कमी होऊन, बियाणे म्हणून वापरता येत नाही. धान्याचे नुकसान कशामुळे होते?

  • दाण्यातील ओलावा व कुबट वास : २ ते ३ टक्के
  • बियाण्यातील विविध किडी : २.५ टक्के
  • उंदीर : २.५ टक्के
  • बुरशीजन्य रोग : २ ते ३ टक्के
  • धान्य साठवणुकीच्या पद्धती ः

    1. पक्की सिमेंट व पत्र्याची बांधलेली कोठी : बियाणे व बाहेरील हवामान यांचा संपर्क कमी येतो. बियाणे ठेवण्यास आणि काढण्यास अत्यंत सोपे जाते. अशा कोठ्यांमध्ये किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. त्यामुळे खर्चात बचत होते.
    2. कच्च्या मातीची कोठी किंवा मातीची वाडगी : ग्रामीण व आदिवासी भागामध्ये मातीची वाडगी किंवा कोठ्यांचा वापर बियाणे साठवणुकीसाठी प्रामुख्याने केला जातो. मात्र, पावसाळ्यात मातीची वाडगी ओलावा धरून ठेवतात. परिणामी कीड व बुरशीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.
    3. बांबूची शेणाने सारवलेली कणगी : आदिवासी भागामध्ये बांबूच्या कणग्यांचाही वापर धान्य साठवणीसाठी होतो. यात पावसाळ्यात किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.
    4. तागाची पोती वापरणे : धान्य, बियाणे साठवणीसाठी तागाची पोती किंवा गोण्याचा वापर प्रामुख्याने होतो. यातही पावसाळ्यात किडीचा प्रादुर्भाव होतो.
    5. खास धान्य साठवणीच्या प्लॅस्टिक पिशव्या : कटक (ओडिशा) येथील राष्ट्रीय भात संशोधन संस्थेने तयार केलेल्या खास साठवण पिशव्यांमध्ये ५० किलोपर्यंत बियाणे साठवता येते. या प्रकारात किडींचा प्रादुर्भाव होत नाही.
    6.  प्लॅस्टिक धाग्यापासून तयार केलेली पोती : सध्या उपलब्धता व स्वस्त असल्याने अशा पिशव्यांचा वापर वाढला आहे. मात्र, यात बियाणे जास्त काळासाठी साठवता येत नाही. अशा पिशव्यांमध्ये किडींचा व उंदरांचा प्रादुर्भाव जास्त होतो.

    कीड नियंत्रण व्यवस्थापन : १] प्रतिबंधात्मक उपाय : अ] स्वच्छता राखणे :

  • मळणीपूर्वी धान्य स्वच्छ करून घ्यावे. धान्य मळणी करण्याची जागा स्वच्छ, किडींपासून मुक्त असावी. ती शक्यतो लोकवस्ती व धान्य साठवणीपासून दूर असावी.
  • मळणी केल्यानंतर दाणे चांगले वाळवावेत. धान्यात १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा नसावा.
  • कोठ्या सूर्यप्रकाशात ठेवून स्वच्छ करून वापराव्यात.
  • धान्य साठवणीमध्ये धान्याची पोती जमिनीवर साठवू नयेत. धान्यास ओलावा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • पावसाळ्यात धान्य हवाबंद ठेवावे.
  • साठवणुकीसाठी आधुनिक आणि सुधारित कोठ्या वापराव्यात.
  • ब] निर्जंतुकीकरण

  • दरवर्षी साठवण जागेतील छिद्रे चुन्याने बुजवून घ्यावीत.
  • धान्य साठवणीची जागा व आजूबाजूचा परिसर झाडून, धुवून स्वछ करावा. सर्व काडीकचरा जाळून नष्ट करावा.
  • सर्व छिद्रे व बिळे काचेचा चुरा भरून नंतर सिमेंटने बंद करावीत.
  • २] नियंत्रणात्मक उपाय : अ] अरासायनिक उपाय :

  • धान्य वाळवणे : धान्य कडक उन्हात वाळवून, धान्याचे तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करावे.
  • पोती साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी.
  • धान्यातील आर्द्रता : धान्यातील आर्द्रता १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याची खात्री करूनच साठवण करावी.
  • उधळणी किंवा चाळणी करणे : साठवणीपूर्वी व साठवणीच्या काळात शक्य तितक्या वेळेस किडलेले खराब दाणे चाळणी व उधळणीद्वारे वेगळे करून घ्यावे.
  • हवाबंद जागेमध्ये बियाणे साठवणूक केल्यास त्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कीड लागत नाही.
  • धान्य साठवताना कडूलिंबाच्या किवा सीताफळाच्या पानांचा २ ते ३ ठिकाणी ५ ते ७ से.मी.चा थर द्यावा.
  • बियाण्यासाठी १ ते २ टक्के कडूनिंब बियाची पावडर मिसळावी.
  • पुदिन्याच्या पानाची भुकटी, राख ०.५ टक्के मिसळल्यास किडीपासून संरक्षण होते. धान्यात राख मिसळल्यास किडींच्या श्वसनामध्ये बाधा येऊन, किडी गुदमरून मरतात.
  • भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी मीठ मिसळून किवा कांदे ठेवून साठवण करावी.
  • धान्याच्या कोठीत साबण वडी ठेवावी.
  • धान्याला १ चमचा प्रति किलो या प्रमाणात गोडतेल चोळावे. १ क्विंटल धान्यासाठी ५०० ते ७५० मिलि तेल वापरावे. त्यासाठी एरंडी, भुईमूग, खोबरेल किंवा मोहरी तेल वापरावे. तेलामुळे किडीची अंडी उबण्यास प्रतिबंध होतो.
  • कीड नियंत्रणासाठी सापळा सापळ्याची संकल्पना ः कोणत्याही सजीवास जगण्यासाठी हवेची आवश्‍यकता असते. ही हवा मिळवण्यासाठी किडी सापळ्याकडे आकर्षित होतात आणि अडकतात. सापळ्याचे घटक -

  • मुख्य नळी - स्टीलची एका बाजूला झाकण असलेली तीन सें.मी. व्यासाची पोकळ नळी आहे. या नळीवर दोन मि.मी. आकाराची छिद्रे आहेत. हा सापळा धान्यात ठेवल्यावर या छिद्राद्वारा किडी सापळ्यात अडकतात.
  • कीटक अडकणारी नळी - मुख्य नळीच्या एका बाजूला जोडण्यात आलेली प्लॅस्टिकची ही एक नळी आहे. या नळीला नरसाळ्याचा आकार देण्यात आलेला आहे. मोठा गोलाकार भाग मुख्य नळीला जोडला आहे. लहान गोलाकार भाग खालच्या दिशेने करण्यात आलेला आहे.
  • या नळीला लहान गोलाकार भागात गुळगुळीत बाजू असलेला प्लॅस्टिकचा शंकू बसवला आहे. धान्यातील कीड मुख्य नळीच्या छिद्रामधून आत आल्यानंतर ती कीड अडकण्याच्या नळीमधून थेट शंकूमध्ये जमा होईल. या शंकूला आटे असून, किडी अडकण्याच्या नळीवर सहजपणे लावता व काढता येतो. गुळगुळीत बाजूने किडींना बाहेर पडता येत नाही.
  • धान्यात असा ठेवा सापळा

    1. हा सापळा धान्यामध्ये पांढरा शंकू खाली येईल अशा पद्धतीने उभा ठेवावा.
    2. वरचे हिरव्या रंगाचे झाकण हे धान्याच्या पातळीशी समान ठेवावे.
    3. आठवड्यातून एकदा या सापळ्याचा शंकू काढून जमलेल्या किडी नष्ट कराव्यात. पुन्हा सापळा याच पद्धतीने धान्यात ठेवावा.

    सापळ्याची वैशिष्ट्ये

  • वापरण्यास सुलभ, आर्थिकदृष्ट्या परवडतो.
  • देखभालीचा खर्च नाही, वर्षानुवर्षे वापरता येतो.
  • कुठल्याही रासायनिक घटकांचा वापर नाही.
  • कीड नियंत्रण सापळ्याचे निष्कर्ष कीड सापळा वापरलेल्या धान्यामध्ये किडींची संख्या तीन पट कमी आणि किडलेल्या दाण्यांची संख्या २.४ पटीने कमी दिसली. उलट सापळा न वापरलेल्या धान्यामध्ये प्रति किलो वजनामध्ये कीड सापळा वापरलेल्या धान्याच्या वजनापेक्षा ३.३ पट घट झाल्याचे प्रयोगात आढळले. माणिक पांडुरंग लाखे, ९४२३००६६०७ (कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com