पशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील मिथेन उत्सर्जन ८० टक्क्यांनी कमी

पशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील मिथेन उत्सर्जन ८० टक्क्यांनी कमी
पशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील मिथेन उत्सर्जन ८० टक्क्यांनी कमी

पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यामध्ये पशुखाद्यामध्ये सागरी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरू शकत असल्याचे पेन राज्य विद्यापीठातील संशोधकांनी मांडले आहे. मात्र, याचा व्यावहारिकदृष्ट्या सागरी वनस्पती वापराचे धोरण वातावरण बदलांविरुद्धच्या लढाईमध्ये कितपत उपयोगी ठरेल, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पशुपालनातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंची समस्या कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत विविध प्रयोग केले जात आहेत. असाच एक प्रयोग पेन राज्य विद्यापीठातील डेअरी पोषकता विभागातील प्रा. अॅलेक्झांडर ह्रिस्टोव्ह यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. या प्राथमिक प्रयोगाचे निष्कर्ष आशादायक असून, त्याविषयी माहिती देताना ह्रिस्टोव्ह म्हणाले, की उष्ण कटिबंधीय सागरामध्ये वाढणारी अॅस्पॅरागोप्सिस टॅक्सिफॉर्मिस नावाची लाल रंगाची सागरी वनस्पती पशुखाद्यामध्ये पूरक म्हणून वापरणे शक्य असल्याचे प्राथमिक अभ्यासातून दिसून आले आहे. दुधाळ जनावरांद्वारे होणारे मिथेनचे उत्सर्जन दूध उत्पादनावर कोणताही परिणाम न होता सुमारे ८० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य आहे. हा वापर एकूण कोरड्या आहार वजनाच्या ०.५ टक्के इतका कमी आहे. हे आश्वासक दिसत असले तरी आम्ही यावर अधिक अभ्यास करत आहोत.

  • जागतिक पातळीवर सागरी वनस्पतींचा वापर पशुखाद्यामध्ये केल्यास खर्च वाचण्यासोबत चारापिकाखालील जमिनीचे प्रमाण कमी करणे शक्य होईल. मात्र, सध्या जागतिक पातळीवर दुधाळ गायींचे प्रमाण सुमारे १.५ अब्ज इतके आहे. इतक्या जनावरांच्या आहारामध्ये ०.५ टक्के प्रमाणात सागरी वनस्पती पूरक म्हणून देण्याचे नियोजन करावे लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सागरी वनस्पती सागरातून काढणे हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य वाटते. एकट्या अमेरिकेमध्ये ९४ दशलक्ष जनावरे असून, त्यांच्यासाठीही पूरक आहार म्हणून या वनस्पती मिळवणे अवघड ठरणार असल्याचे मत ह्रिस्टोव्ह यांनी व्यक्त केले.
  • इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सागरी वनस्पती मिळविण्यासाठी पुन्हा कृत्रिमरीत्या त्यांची वाढ करावी लागेल. कारण, केवळ सागरातून या वनस्पती काढून घेतल्यास सागरी पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • अॅस्पॅरागोप्सिस टॅक्सिफॉर्मिसच्या मिथेन उत्सर्जन कमी करण्याच्या क्षमतेमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. कमी कालावधीसाठी ते कार्यक्षम असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र, त्यांचा दीर्घकालीन कार्यक्षमता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गायीच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीव या नव्या बदलाला सरावल्यानंतर ही कार्यक्षमता टिकणार का, हा प्रश्न उभा राहतो. जर सागरी वनस्पतीतील संयुगे उदा. ब्रोमोफॉर्म्स पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांच्या मिथेननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा तयार करू शकले तर उत्तमच राहील. मात्र ही संयुगे उष्णता आणि सूर्यप्रकाशासाठी संवेदनशील आहेत. त्यांची मिथेन कमी करण्याची क्षमता प्रक्रिया आणि साठवणीदरम्यान कमी होऊ शकते.
  • सागरी वनस्पतींची चव जनावरांना फारशी आवडत नसल्याचे दिसून आले. जेव्हा आहारामध्ये अॅस्पॅरॅगसचे मिश्रण ०.७५ टक्क्यांपर्यंत केले जाईल, तेव्हा जनावरांकडून आहार कमी घेण्याची समस्या उद्भवू शकते.
  • जनावरांच्या आरोग्यावर आणि पुनरुत्पादन क्षमतेवरील परिणामांचाही दीर्घकालीन अभ्यास केला पाहिजे. कारण, त्यावरच दूध आणि मांसाच्या दर्जा ठरणार आहे. या अभ्यासासोबत दुधाच्या चवीमध्ये काही फरक पडतो का, हे तपासण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
  • सरासरी दुधाळ गायीद्वारे ३८० पौंड हरितगृह वायू प्रतिवर्ष उत्सर्जन करते. अमेरिकेत पशुपालनातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृहाचे प्रमाण केवळ ५ टक्के आहे. त्यापेक्षा कितीतरी अधिक पट हरितगृह वायू उत्सर्जन हे ऊर्जा आणि वाहतूक उद्योगातून होते.
  • तरीही दूध आणि आरोग्यावर कोणताही परिणाम न होता मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
  • प्रयोगासाठी सागरी वनस्पती मिळविताना...

  • या अभ्यासासाठी सागरी वनस्पती अॅझोरेस येथील अॅटलांटिक महासागरातून आणि पोर्तुगाल येथून गोठवलेल्या स्वरूपामध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर फ्रिज ड्रायिंग पद्धतीने वाळवल्यानंतर बारीक केल्या. प्रयोगासाठी चार टन सागरी वनस्पती मिळवणे, आणणे आणि प्रक्रिया यासाठी संशोधकांना खूप कष्ट पडल्याचे ह्रिस्टोव्ह यांनी सांगितले.
  • त्यासाठी पेन राज्य विद्यापीठातील संशोधन तंत्रज्ञ मॉली यंग आणि प्राणीशास्त्र विभागातील पदवी व सहायक विद्यार्थी ऑडिओ मेलगर मोरेनो आणि सुझॅना राईसाईनेन यासोबत ब्राझील येथील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ मिनास गेराईस येथील कॅमिला लेज यांनी प्रकल्पामध्ये काम केले. या संशोधनासाठी अमेरिकी कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्था आणि जेरेमी आणि हॅन्नेलोअर ग्रॅन्थम एन्व्हायर्नमेंट ट्रस्ट द्वारे अर्थसाह्य करण्यात आले.
  • प्रा. ह्रिस्टोव्ह यांचे विद्यार्थी हॅनाह स्टेफेनोनी हे आपले संशोधन सिनसिनाटी (ओहिओ) येथील `अमेरिकन डेअरी सायन्स असोसिएशन’ च्या २३ जून रोजी होणाऱ्या वार्षिक बैठकीमध्ये मांडणार आहेत. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्स ऑफ दी २०१९ अमेरिकन डेअरी सायन्स असोसिएशन’ च्या अहवालामध्ये ऑनलाइन प्रकाशित केले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com