कंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले प्रारूप

कंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले प्रारूप
कंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले प्रारूप

 स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न टाकता त्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीकडे बऱ्याच जणांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकातील ओला कचरा (भाज्यांचा वाया जाणारा भाग, फळांची साले) हा कंपोस्ट खड्डा किंवा गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरला जातो, परंतु शहरी भागात जागेची उपलब्धता पहाता ओला कचरा जिरवण्याची समस्या दिसून येते. शहरी लोकांची गरज लक्षात घेऊन आयआयटी, मुंबईमधील आयडीसी स्कूल आॅफ डिझाईनची पदवीधर एेश्वर्या सूर्यकांत माने हिने स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करणाऱ्या यंत्राचे प्रारूप तयार केले आहे. या प्रारूपाबाबत एेश्वर्या माने म्हणाली, की शहरामध्ये ओला कचरा नगरपालिकेच्या कुंडीत न टाकता तो घरच्या घरी जिरवावा, यासाठी जनजागृती होत आहे. या कचऱ्यापासून चांगले कंपोस्ट खत तयार करून परसबागेतील फुले, झाडांना वापरता येते. परंतु, पारंपरिक पद्धतीने खड्डा किंवा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये कंपोस्ट खत तयार करताना काही जणांना अडचणी येतात. हे लक्षात घेऊन या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मी या यंत्राचे प्रारूप तयार केले. यासाठी पहिल्यांदा विविध कुटुंबांकडून ओल्‍या कचऱ्याची समस्या जाणून घेतली. त्यापासून कंपोस्ट खत कशा पद्धतीने तयार केले जाते, त्यातील अडचणी समजावून घेतल्या. कंपोस्टिंगच्या विविध पद्धतींचाही अभ्यास केला. शहरी भागातील एका कुटुंबात सरासरी चार माणसांच्या स्वयंपाकातून रोज तयार होणारा ओला कचरा ग्राह्य धरून मी कंपोस्‍टिंग यंत्राचे प्रारूप तयार केले. यामध्ये यंत्राचा सुटसुटीत रचनेला प्राधान्य दिले. यंत्रामध्ये भाजीपाल्याची पाने, देठांचे तुकडे करण्यासाठी कटर आहे. चौकोनी आकार असणाऱ्या यंत्राच्या प्रारूपामध्ये कंपोस्‍टिंगसाठी कंपार्टमेंट आहेत. यामध्ये कंपोस्‍टिंगसाठी योग्य तापमान रहाण्यासाठी हिटर आणि सेन्सर बसविलेले आहेत. त्यानुसार यंत्रामध्ये योग्य तापमानात कंपोस्‍टिंगची प्रक्रिया होते. यंत्राला कंट्रोल पॅनेल असल्याने त्यातील उष्णतेनुसार किती प्रमाणात कंपोस्टिंग झाले आहे ते कळते. आठवड्याला चार जणांच्या कुटुंबात तयार होणारा ओला कचरा लक्षात घेऊन कंपोस्‍टिंग यंत्राची क्षमता सहा किलो ठेवली आहे. दहा दिवसांनंतर चार किलो ओल्या कचऱ्याचे अडीच किलो कंपोस्ट खत तयार होऊ शकेल, अशी माझ्या कंपोस्टिंग यंत्राच्या प्रारूपाची संकल्पना आहे. यातील तंत्रज्ञान विविध तज्ज्ञांशी संपर्क करून विकसित करत आहे, या प्रकल्पासाठी मला आयडीसी स्कूल आॅफ डिझाईनमधील प्रा. पूर्वा जोशी यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. मुंबईमध्ये नुकत्याच भरलेल्या ‘आयडीसी`च्या वार्षिक प्रदर्शनामध्ये एेश्वर्या माने हिने तयार केलेल्या कंपोस्टिंग यंत्राच्या प्रारूपाला ‘इंडस्र्टीयल डिझाईन बेस्ट स्टुडंट ॲवॉर्ड` ने गौरविण्यात आले. येत्या काळात या यंत्राच्या तंत्रज्ञानाचे पेंटट आणि उत्पादनासाठी स्टार्ट अप कंपनी सुरू करण्याचे तिने नियोजन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com