कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजी

कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजी
कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजी

शास्त्रीय नाव : Chlorophytum borivilianum Santapau & Fernandes कूळ : Liliaceae इतर स्थानिक नावे : सफेद मुसळी, कोळू, कोवळी भाजी इंग्रजी नाव : Chlorophytum, Indian Spider Plant, White Musli हिंदी नाव : मुसली, सफेद मुसली, ढोली मुसली संस्कृत नाव : मुसली, श्वेत मुसली आढळ : ही रोपवर्गीय वनस्पती सर्वत्र डोंगर उतारावर, उघड्या जागेवर किंवा मोठ्या झाडाच्या सावलीत वाढते. ही वनस्पती राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या जंगलात वाढलेली आढळते. महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळते. तसेच कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी काही प्रमाणावर शेतात लागवडीस सुरवात झाली आहे.

वनस्पतीचे वर्णन ः

  1. ही वनस्पती लीलियाशी या कुळातील अाहे. ही वार्षिक झुडूपवर्गीय औषधी वनस्पती असून, तिचा जमिनीत छोटासा गड्डा असतो. त्याला सभोवताली मुळे फुटलेली असतात. मुळे पांढरी, लांबट दंडगोलाकार असतात. त्यांची संख्या १० ते २० पर्यंत असू शकते.
  2. झुडपाची उंची ३० ते ४० सें.मी. पर्यंत असते. गड्डावर ६ ते १२ पर्यंत पाने असून ती पातळ, लांबट, टोकदार असतात. त्यांची लांबी १३ ते १५ से. मी. पर्यंत असते. फुलाचा देठ ०.६ ते ०.८ से. मी. लांबट, गोलाकार व फुले मऊ असतात. बिया नियमित, गोलाकार व काळ्या रंगाच्या असतात.
  3. फुले जुलै-ऑगस्टमध्ये येतात, तर फळे सप्टेंबरपर्यंत तयार होतात.
  4. वनस्पतीचे सुप्त गड्डे जमिनीत असतात. २ ते ३ पावसानंतर अशा गड्यांना नवीन कोंब फुटतात. वनस्पती वाढीला सुरवात होते. ५) ही वनस्पती डोंगर उतारावर, माळरानावर गवताळ भागात मोठ्या झाडाच्या सावलीत वाढते. जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता व हवामानानुसार त्याच्या पानाची वाढ होते. साधारण जुलैपर्यंत वाढ होऊन फुले येतात. अशा फुलापासून सप्टेंबरपर्यंत फळे तयार होतात. त्यानंतर हिवाळ्यात पाने हळूहळू सुकायला लागतात. जानेवारी ते फेबृवारीपर्यंत झाडे पूर्ण सुकतात. त्यानंतर पावसाळ्यापर्यंत त्याचे खोड व मुळे सुप्तावस्थेत जमिनीतच राहतात.

औषधी उपयोग ः

  • मुसळीमध्ये सॅपोजिनाईन (०.५ ते १.२ टक्के ) उत्तेज्जक घटक आहे. याचा उपयोग शक्तिवर्धक टॅनिक म्हणून केला जातो.
  • मूळयाचा उपयोग लघवीची जळजळ, अधिक मासिकस्राव, दमा, मूळव्याध, कावीळ, अतिसार, पोटदुखी इ. आजारांसाठी होतो. हिच्यामुळे शुक्र जंतू व शुक्रोत्पादनास चांगली मदत होते. तसेच लहान मुलांना दूध पाजणाऱ्या मातांना दूध वाढवण्यास उपयोगी आहे. हिच्यामध्ये चरबीचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेहींना उपयोगी आहे.
  • विशेष महिती ः पालघर, नाशिक, नगर आणि ठाणे या जिल्ह्यांतील आदिवासी लोक कोवळी भाजी हा सण प्रामुख्याने साजरा करतात. “नवीन पाण्याचा नवीन मोड” आणि पावसाळ्याची सुरवात याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आदिवासी लोक भात लागवडीच्या आधीचा एक दिवस ठरवून हा सण साजरा करतात. गावातील ग्रामदेवता, वाघ्या देव, मरीआई, फिरेस्ता, गावमुंढा, मखरी, चेडा इत्यादी; तसेच गावाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेले सर्व ग्रामदैवत यांची अगदी साग्रसंगीत उपासना केली जाते. मुख्यत: भात लागवडीच्या आधीचा मंगळवार म्हणजेच “मोडा” या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. सोमवारी सकाळी किवा दिवसभरात महिला वर्गाकडून जंगलातून ही भाजी आणली जाते. ती वेगवेगळ्या प्रकारे शिजवली जाते, जसे तुरीच्या डाळीत किवा मेथीच्या भाजीप्रमाणे शिजवली जाते. सर्व ग्रामदेवी, देवतांना या भाजीचा नैवेद्य दाखविला जातो. भात, नाचणी, वरई, उडीद, तूर या पिकांवर ज्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याची प्रतिकृती बनवली जाते. साग्रसंगीत पूजा करून दुसऱ्या दिवशी दुपारी या प्रतिकृती पाण्यात नेऊन सोडल्या जातात. पहिल्या पावसाच्या सुरवातीला जे उगवते व जे प्रथम खाण्यास उपलब्ध होते, अशी ही कोवळी भाजी निसर्गाने दिलेले वरदानच आहे आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा उसत्व साजरा करतात. इतर कुठल्याही दिवशी ही भाजी खाल्ल्यास ती कडू लागते, असा या लोकांचा समज आहे. पाककृती ः पातळ भाजी

  • साहित्य:- कोवळी भाजी, तूर/मूग/मसूर डाळ ० .५ ते १ वाटी, २-३ उभे पातळ चिरलेले कांदे, ३-५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, कोंथिबीर, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी.
  • कृती : प्रथम कोवळी भाजीची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेऊन देठे काढून टाकून मंजिऱ्या काढून घ्याव्या. एका पातेल्यात थोडेसे पाणी (पाने बुडेपर्यंत) गरम करून त्यात वरीलपैकी एक डाळ व तोडून बारीक केलेली पाने एकत्रित शिजवून घ्यावे. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी मिसळून उभा चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या हळद व लाल मिरची पावडर मिसळून परतून घ्यावा. वरील शिजवलेले मिश्रण घालून चांगले शिजवून घ्यावे. नंतर चवीप्रमाणे मीठ मिसळावे. भाजी शिजल्यानंतर वरून कोेथिंबीर घालावी.
  • पानाची सुकी भाजी

  • साहित्य- कोवळी भाजी, २-३ उभे पातळ चिरलेले कांदे, ३-५ बारीक चिरलेल्या लसून पाकळ्या, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी
  • कृती :- प्रथम कोवळी भाजीची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन व बारीक कापून घ्यावीत. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून उभा चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिसळून परतून घ्यावा. बारीक चिरलेली कोवळी भाजीची पाने मिसळून चांगले शिजवून घ्यावे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालावे.
  • संपर्क ः अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६ (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com