शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
मसाला पिके
हळद पिकातील कीड नियंत्रण
सध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. या काळात कोल्हापूर, सातारा भागातील हळद उत्पादक पट्ट्यामध्ये खालील किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यांचे नियंत्रण वेळीच केल्यास भविष्यातील नुकसान टाळता येते.
सध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. या काळात कोल्हापूर, सातारा भागातील हळद उत्पादक पट्ट्यामध्ये खालील किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यांचे नियंत्रण वेळीच केल्यास भविष्यातील नुकसान टाळता येते.
१) कंदमाशी ः
लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. ५ ते ७ दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या नवजात अळ्या बाहेर पडून कंदामध्ये शिरतात. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तिथे रोगकारक बुरशी तसेच सुत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरू होतो. कंद मऊ होतात, त्यांना पाणी सुटून ते कुजू लागतात.
नियंत्रण ः
- कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच शिफारशीत किटकनाशकांचा वापर करावा.
- जुलै ते सप्टेंबर दरम्यान क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मि.ली. किंवा डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मि.ली. प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी पुढील फवारणी घ्यावी.
- उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.
- हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.
- हेक्टरी सहा मातीची अथवा प्लॅस्टिकच्या पसरट भांडी घ्यावीत. त्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम अधिक १.५ लिटर पाणी मिसळून शेतात ठेवावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात. कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाश्या मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.
२) खोडकिडा ः
खोडकिडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असून, दोन्ही पंखांवर काळ्या रंगांचे ठिपके असतात. अळी लालसर रंगाची असून, अंगभर काळे ठिपके असतात. अळी खोड व हळदीचे कंद पोखरते. खोडाला छिद्र करून आत शिरते. आतील भाग खाऊन टाकते. पानांवर एका ओळीत छिद्र पडलेली दिसतात.
नियंत्रण ः
- प्रादुर्भावित झाडे नष्ट करावीत.
- निंबोळी तेल ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
- प्रकाश सापळ्याचा एकरी एक या प्रमाणात वापर करावा. सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवावा. यामध्ये या किडीचे प्रौढ आकर्षित होतात, त्यांना नष्ट करावे.
३) पाने गुंडाळणारी अळी ः
या कीडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो व नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसून येतो. पतंग काळसर व पांढऱ्या रंगाचा असतो. हिरव्या रंगाच्या अळ्या पाने गुंडाळून त्यात लपतात. आत राहूनच पाने खातात. पूर्ण वाढ झालेली अळी पानाच्या गुंडाळीतच कोषावस्थेत जाते.
नियंत्रण ः
- गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावीत.
- डायमेथोएट १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
४) सूत्रकृत्री ः
ही मुळावरील कीड अतिशय सूक्ष्म असून, डोळ्यांना दिसत नाही. ती हळदीच्या मुळांवर गाठी तयार करते. जमिनीत पिकांच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषून घेते. पिकांची वाढ खुंटते. प्रथम पिकाचा शेंडा मलूल होवून पिके पिवळी पडून झाड मरते. कालांतराने हळदीच्या कंदामध्ये प्रवेश करते. परिणामी कंद सडू लागतो.
नियंत्रण ः
- सूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस भुकटी २ किलो प्रति एकरी २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावी. अथवा
- शिफारशीत कीटकनाशकाचा जमिनीत योग्य प्रमाणात वापर करावा.
- भरणी करताना निंबोळी पेंड ८ क्विंटल प्रति एकरी या प्रमाणात वापरावी.
- हळद पिकांत झेंडू सूत्रकृमींसाठी सापळा पीक म्हणून लावावे.
५) हुमणी ः
या कीडीची अळी नुकसानकारक असून, सुरवातीचे काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर उपजीवीका करते. पुढे मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरतडल्याचे दिसून येते. मुळे कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडते. रोपे वाळू लागतात. उपटल्यास ती सहज उपटून येतात.
नियंत्रण ः
- हळद लागवडीनंतर हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास, क्लोरपायरीफॉस ४ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.
- आळवणी शक्य नसल्यास जमिनीमध्ये शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
- जैविक नियंत्रणासाठी मेटॅरायझिम ॲनासोप्ली ही परोपजीवी बुरशी हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी.
६) पाने खाणारी अळी ः
पावसाळा सुरू झाल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढताच या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. पाने सुरळी किंवा पोंगा अवस्थेत असताना ही अळी पानावर उपजीविका करते. पान खाऊन सुरळीमध्ये छिद्र करते. सुरळीतील पान ज्या वेळी पूर्णपणे उघडते, त्या वेळी एका सरळ रेषेमध्ये पानावरती छिद्रे आढळून येतात.
नियंत्रण ः
- गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावीत.
- डायमिथोएट १ मिली प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
संपर्क ः डॉ. मनोज माळी
(प्रभारी अधिकारी), ९४०३७७३६१४
ः डॉ. रवींद्र जाधव (कीटकशास्त्रज्ञ), ९७६४२३४६३४
(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज जि. सांगली.)
फोटो गॅलरी
- 1 of 4
- ››