यांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेती

यांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेती
यांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेती

भाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिली. मात्र चांदखेड (जि. पुणे) येथील रूपाली व नितीन गायकवाड या दांपत्याने योग्य पाणी व्यवस्थापन, यांत्रिकीकरणातून  भाताचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले आहे.  याद्वारे श्रम आणि मजुरी यात बचत केलीच. तसेच ‍उत्पादन खर्चही वाचवला. उत्पादित भाताला चांगली चव असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील नितीन गायकवाड यांनी भातशेतीतील यांत्रिकीकरणावर भर दिला. यात पाॅवर टीलर, कोनोविडर, रिपर, भात झोडणी आदी अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला.  जमिनीत नत्र वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांसह भातामध्ये ॲझोलाची वाढ केली जाते. चारसूत्री पद्धतीने भात लागवड, जिवामृत, स्लरीवर विशेष भर दिला. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखेत, गांडूळखत, शेणखताचा वापर वाढविला. यामुळे खतांच्या खर्चामध्ये ७० टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे. यंदा पावसाने मोठी ओढ दिली. भात पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाटाने पाणी देत ताण बसू दिला नाही. या प्रयोगाद्वारे श्रम आणि मजुरी तर वाचलीच. शिवाय  उत्पादन खर्च कमी झाला. हेक्टरी १४१ क्विंटल उत्पादन घेण्यात मिळविलेल्या यशामुळे पुणे जिल्हा परिषदेने त्यांचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने नुकताच गौरवही केला आहे. सेंद्रिय खतांचा भरपूर वापर असलेल्या इंद्रायणी आणि फुले समृद्धी या भाताला चांगली चव, गुणवत्ता असल्याने घरगुती ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. गायकवाड यांच्या शेतीत यांत्रिकीकरणावर पहा... (video)

  • जिवामृत व स्लरीच्या वापराने इतरही पिकांच्या गुणवत्तेतही वाढ झाली आहे. रासायनिक अंश कमी असलेला भाजीपाला त्यांना बाजारात पाठविण्याची गरज भासत नाही. ते गावापासून जवळ असलेल्या हिंजवडी आयटीपार्कमधील काही कॅँटीन्सला गेले काही वर्षे भाजीपाला पुरवठा करतात. तसेच पाच हजार लोकसंख्या असलेल्या चांदखेड गावातच ते ७०० ते ८०० गोणी कांद्याची विक्री करतात. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांवर पोसलेला हा कांदा आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकत असल्याचे  गायकवाड सांगतात.
  • भात हेच त्यांचे मुख्य पीक असून, त्याच्या जोडीला ऊस, सोयाबीन, कडधान्य ही पिके घेतली जातात. भात काढणीनंतर त्या क्षेत्रामध्ये कांदा, गहू, बाजरी ही पिके तर ऊस तोडणी झाल्यानंतर त्या क्षेत्रात भाजीपाल्याचे अांतरपीक घेतले जाते. यंदा खडकाळ माळरानावर ठिबक सिंचन पद्धतीवर आंबा आणि पेरूच्या लागवडीचे नियोजन केले आहे. मेथी, शेपू, आंबाडी, राजगिरा, करडई आदी पिके घेतली जातात. उन्हाळ्यात पाण्याअभावी क्षेत्र रिकामे ठेवावे लागते. या काळात भाताचे क्षेत्र उन्हात तापण्यासाठी सोडले जाते. घरी देशी व जर्सी जातीच्या चार गाई असून, २० लीटर दूध मिळते. गीर गाईच्या दुधाची ६० रुपये प्रति लिटर, तर जर्सी गायीचे दूध ३० रुपये प्रति लिटर विक्री होते. तसेच गीर गायीच्या शेण आणि गोमुत्रापासून जिवामृत तयार करतात. तर उर्वरीत शेण आणि गोमुत्रापासून गोवऱ्या, धूप, गोमूत्र अर्क आदी विविध उत्पादने तयार करत आहेत.
  •     भात शेतीत यंत्रांचा वापर

  • भात शेती करताना बैलांच्या औताने चिखलणी करताना खूप वेळ लागायचा. त्यात बदल करून ट्रॅक्टरचा वापर सुरू केला. मात्र ट्रॅक्टरच्या अतिवजनामुळे ठराविक खोलीवरील जमीन आवळली जाऊ लागली. त्यामुळे ट्रॅक्टरऐवजी पाॅवरटिलरचा वापर सुरू केला. आता जमीन कमी दबून, जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत झाली.
  •     भातमध्ये तण काढणीसाठी पुरेसा मजूर मिळत नाही. त्यासाठी ‘कोनोविडर’ या यंत्राचा वापर सुरु केला. चारसूत्री पद्धतीने १५ सेंमी आणि २५ सेंमी अंतरावर भात लावला जातो, त्यामुळे कोनोविडर यंत्र चालविणे शक्य होते. हे यंत्र जमिनीत घुसून तण काढण्याबरोबरच खालील थरातील अन्नद्रव्य वर आणण्यास मदत होते. ओढण्यास हलके असलेल्या या यंत्राने एक मजूर दिवसभरात एक एकर क्षेत्रातील तण काढू शकतो.
  •     भात कापणीच्या वेळी मजूर टंचाई अधिक जाणवते. त्यावर उपाय म्हणून ‘रिपर’च्या माध्यमातून भात काढणी केली जाते. रिपर ठराविक पट्ट्यातील भात कापून तो एका बाजूला टाकत जातो. एका दोन मजुरांच्या मदतीने या भाताची बांधणी करणे सोपे जाते.
  •     भाताची पारंपरिक पद्धतीने झोडणी जास्त श्रम करावे लागतात. यासाठी भात झोडणी यंत्राचा वापर केला जातो. त्यावर भाताची पेंढी पकडल्यांनंतर दातऱ्यांच्या मदतीने भाताची साळ जागेवर गळून पडते. अगदी महिलाही कमी श्रमात भाताची झोडणी करू शकतात. एक मजूर ताशी ४०० किलोपर्यंत भात झोडू शकतो.
  •   अत्याधुनिक पद्धतीने भात व इतर पिकांचे उत्पादन घेताना ‘ॲग्रोवन’ नेहमीच सोबती राहिला आहे. तसेच पंचायत समितीचे अधिकारी, कृषी संशोधन केंद्राच्या डॉ. काशीद यांच्यासारख्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळते. जिल्हा परिषदेमार्फत सेंद्रिय शेतकरी म्हणून निवड केली असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र घेऊन सेंद्रिय उत्पादनाचा ब्रॅंड तयार करण्याचा मानस आहे.       नितीन गायकवाड,  ७५८८२४९७०९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com