agricultural stories in Marathi, agrowon, wide study of Glyphosate issue should be done | Agrowon

ग्लायफोसेट वापराचा व्हावा सर्वांगाने अभ्यास
प्र. र. चिपळूणकर
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

अमेरिकेतील एका न्यायालयीन खटल्यामध्ये ग्लायफोसेट या तणनाशकामुळे कर्करोग झाल्याचा दावा मान्य केला गेला. त्यासाठी उत्पादकांना जबर नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. ही बातमी जगभरच्या शेतकरी व पर्यावरणीय जगतात प्रचंड खळबळ उडवणारी ठरली. त्यावर दोन्ही बाजूने बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. बऱ्याच वर्षांपासून तणनाशकांचा शास्त्रीय अभ्यास व वापर करीत असल्याने मलाही विचारणा झाली. वृत्त खळबळजनक असून, या विषयाचा अनेक अंगांनी अभ्यास होणे गरजेचे वाटते.

अमेरिकेतील एका न्यायालयीन खटल्यामध्ये ग्लायफोसेट या तणनाशकामुळे कर्करोग झाल्याचा दावा मान्य केला गेला. त्यासाठी उत्पादकांना जबर नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. ही बातमी जगभरच्या शेतकरी व पर्यावरणीय जगतात प्रचंड खळबळ उडवणारी ठरली. त्यावर दोन्ही बाजूने बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. बऱ्याच वर्षांपासून तणनाशकांचा शास्त्रीय अभ्यास व वापर करीत असल्याने मलाही विचारणा झाली. वृत्त खळबळजनक असून, या विषयाचा अनेक अंगांनी अभ्यास होणे गरजेचे वाटते.

थोडा पूर्वेतिहास...
साधारण ३५ वर्षांपूर्वी भारतात ग्लायफोसेटचे आगमन झाले. कोल्हापुरातील एका कृषिसेवा केंद्रात प्रथम ५ लिटरचा एक कॅन नजरेस पडला. लहान पॅकिंग उपलब्ध नव्हते. किंमत सुमारे २२२५ रुपये. अन्य तणनाशकांच्या किमती १०० ते १५० रु. किलो/ लिटर या दरम्यान होत्या. या तणनाशकाविषयी फारशी माहिती नसल्याने घरातील ‘वीड ॲँड वीड सायन्स’ या ग्रंथामध्ये धांडोळा घेतला. त्यात लव्हाळा व हरळी या बहुवार्षिक तणासाठी सर्वांत उत्तम काम करणारे एकमेव तणनाशक असा संदर्भ सापडला. एकदम पाच लिटर तणनाशकाची खरेदी व त्यासाठी इतकी रक्कम मोजणे हे त्या काळी मोठे धाडसच. पण पीककर्जातून रकमेची सोय करून खरेदी केली. पुढे १-२ वर्षे गरजेनुसार वापरला. संदर्भाप्रमाणे लव्हाळा हरळी या तणांच्या नियंत्रणासाठी उत्तम उपयोग झाला.
मात्र, अनिवडक गटातील तणनाशक वगैरे व्यवस्थित अभ्यास त्या वेळी नसल्याने हरळी लव्हाळ्यालगतची उसाची रोपेही चुकून मेली. अर्थात, तो अपघात होता. त्यातून पूर्ण अभ्यासाला चालना मिळाली. ५०० रु. प्रति लिटर किंमत आणि त्याचे १० लिटर पाण्यात किमान १०० मिलि हे प्रमाण दोन्ही बाबी विचार करावयास लावणाऱ्याच होत्या. पुढे कालांतराने २-३ उत्पादकांनी ग्लायफोसेट बाजारात आणले. त्याचा दर ३०० रुपये प्रति लिटरच्या आसपास स्थिर राहिला. अर्थात, तरीही महाग असल्याने अनेक वर्षे सामान्य शेतकरी त्याचा अजिबात वापर करत नसत.

माझ्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासानुसार मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष, हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत या तत्त्वाचा वापर सुरू केला. उसाचे जमिनीखालील अवशेषांची फेरपालट करण्यासाठी तणनाशकांचा वापर सुरू केला. त्याचप्रमाणे ग्लायफोसेट या तणनाशकाने तण मारून शून्य मशागतीवर पुढील भाताचे पीक घेण्याचे तंत्र मी विकसित केले. उसाचे जमिनीखालील अवशेष मारणे केवळ ग्लायफोसेट या तणनाशकामुळेच शक्‍य झाले. अवशेष मृत झाल्यानंतर जागेवरच दीर्घकाळ कुजत रहातात. त्यातून जमिनीची सुपीकता वाढते. आजपर्यंत जमिनीखालील अवशेषांचा वापर सेंद्रिय खतनिर्मितीसाठी कधीही झालेला नव्हता. जमिनीवरील अवशेष हलक्‍या दर्जाचे, तर जमिनीखालील अवशेषातून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत जमिनीला मिळते. यातून शेणखत कंपोस्टच्या तुलनेत जमिनी जलद सुपीक होतात. उत्पादकता एकाच वर्षात वाढते, याचा अंदाज आला. हा बदल शेतीत क्रांती करू शकतो. सुपीकता कशी टिकवायची किंवा वाढवायची हा आज जगभरच्या शेतकरी, शास्त्रज्ञांपुढील महत्त्वाचा ज्वलंत प्रश्‍न आहे. तो या तंत्राने सहज सुटू शकेल असे मला वाटते.

ग्लायफोसेटसारख्या तणनाशकाच्या वापरातून जमिनीखालील अवशेषांच्या जोडीला रानात उगविणाऱ्या तणापासूनही सेंद्रिय खत करण्याचे तंत्र विकसित केले. मानवी भांगलणी अगर निंदणी बंद करून तणनाशकांकडूनच भांगलणीचे काम सुरू केले. यातून उत्पादकतेत वाढ झाली. वर्षानुवर्षे जमिनीची सुपीकता वाढत गेली. पुढे हे तंत्र इतर सर्व पिकांत वापरण्यासाठी चिंतन सुरू केले. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे तंत्र विकसित केले. त्याचा प्रसार सुरू केल्यानंतर काही शेतकऱ्यांकडून तणनाशकाच्या वापरामुळे जमिनीतील जिवाणू मरून जातील अशी शंका प्रदर्शित झाली.
भू-सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासामुळे एक मूलभूत बाब माहीत होती. पिकाची वाढ केवळ सूक्ष्मजीवांच्या सहयोगानेच होते. तणनाशकाच्या वापरामुळे सूक्ष्मजीवच मरून गेले तर पिकाची वाढ थांबू शकते आणि असे असते तर ही रसायने बाजारात विक्रीला आलीच नसती. गेल्या ४०-४५ वर्षांतील तणनाशकाच्या वापराचा असा परिणाम कोणत्याच शेतकऱ्याने अनुभवलेला नाही. गेल्या ३०-३५ वर्षे मी स्वतः ग्लायफोसेट व अन्य तणनाशके, कीडनाशकांच्या संपर्कात आहे. अर्थात फवारणी करताना जी काळजी घेणे अपेक्षित आहे, त्याला पर्याय नाही. ग्लायफोसेट हे अनिवडक गटातील एकमेव तणनाशक असून, आंतरप्रवाही काम करून पिकाच्या मुळापर्यंत पोचून तणाचा समूळ नाश करते. या गुणधर्मामुळे या तणनाशकाचा जगभरात भरपूर वापर होतो.

शेतकऱ्यांचाही विचार होणे आवश्यक
संवर्धित शेती म्हणजे संसाधनांचा कमीत कमी वापर करून केलेली शेती.
या पद्धतीतील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नांगरणीविना अगर शून्य मशागत शेती. जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांत १० कोटी हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर या तंत्राने शेती केली जाते. शून्य मशागतीची शेती वास्तवात उतरण्यासाठी दोन प्रमुख कारणे दिली जातात.
१) शून्य मशागतीवर पेरणी करणाऱ्या यंत्राचा शोध,
२) तणनाशकाचा शोध.
शून्य मशागत शेती पद्धतीत मागील पिकाच्या कापणीनंतर जे तणांचे अवशेष शिल्लक राहतात, ते पुढील पीक पेरणीपूर्वी मारावे लागतात. या कामासाठी आज तणनाशक फवारणी हाच पर्याय आहे. इथे जुनी, मोठी झालेली तणे ग्लायफोसेटचा वापर करूनच मारावी लागतात. यासाठी या तणनाशकाचा वापर सर्वत्र केला जातो. बांध, पाण्याचे पाट यांतील बहुवार्षिक तणे या तणनाशकानेच मारणे शक्‍य आहे. या तणनाशकाचा मातीशी संपर्क आल्यानंतर ते निष्क्रिय होत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले गेले. यामुळे कर्करोग झाल्याचा दावा अमेरिकेत ग्राह्य धरून दंड ठोठावल्याची बातमी जाहीर होताच, या तणनाशकावर बंदीची जगभर चर्चा होत आहे. भारतात तर शेतकरी पाठीवर पंप घेऊन त्याची फवारणी फक्त तणावर करतो. पिकावर पडल्यास पीक मरते, जमिनीवर पडल्यास तणनाशक फुकट जाते, यामुळे अधिक काळजी घेतली जाते. अमेरिकेत एक कुटुंब हजारो एकर शेतीचे व्यवस्थापन करीत असते. हेलिकॉप्टरद्वारे फवारणी केली जाते. येथे मनुष्यबळाची समस्या आहे. परिणामी अशा रसायने व यंत्रांचा वापर शेतीमध्ये करणे क्रमप्राप्त ठरते. अशी रसायने नसल्यास शेती शेतकऱ्यांसाठी परवडण्याच्या बाहेर जाण्याची शक्यता अधिक आहे. अन्यथा अन्य एखादा सुरक्षित पर्याय शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे.

विचारवंताचे दोन गट
कोणतेही कृषिविषयक रसायन शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचते याची माहिती बहुतांश सर्वसामान्य शेतकरी, ग्राहकांना असत नाही. ती थेट बाजारात विकता येत नाहीत. एखादा शोध लागल्यानंतर रसायन बाजारात येण्यापर्यंत अनेक अडथळ्यांची शर्यत असते. यासंबंधी अधिक माहिती "सायलेंट स्प्रिंग'' व "सेव्ह दि अर्थ वुईथ पेस्टिसाईड अँड प्लॅस्टिक'' या दोन पुस्तकांतून मिळू शकते. पहिले पुस्तक रसायनांच्या वापराच्या दुष्परिणामावर असून, त्याने अमेरिकेप्रमाणेच जगभर मोठी खळबळ उडवली होती. पीक संरक्षण रसायन कारखान्यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून डेनिस आयव्हरी यांनी दुसरे पुस्तक लिहिले आहे. त्यातील सायलेंट स्प्रिंग हे अत्यंत लोकप्रिय असल्याने अनेकांना माहीत आहे. दुसरे पुस्तक कृषी रसायने व प्लॅस्टिकचे समर्थन करणारे असून, तेही तितकेच वाचले जाते. (माझ्याकडे दोन्ही पुस्तकांची १४ वी आवृत्ती आहे.) याचा अर्थ विचारवंताचे रसायनांच्या बाजूने व विरुद्ध असे दोन गट असून, त्यांचे वैचारिक युद्धे चालूच असतात. शेतकरी मात्र या लढाईत कोठेच नसतो.

- प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८
(लेखक प्रयोगशील शेतकरी आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...