agricultural stories in Marathi, agrowon,blower manifacturing unit in kadvanchi | Page 2 ||| Agrowon

कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवात

संतोष मुंढे
रविवार, 21 एप्रिल 2019

कडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या मित्रांनी कल्पकता आणि शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांतून गावामध्येच ब्लोअरनिर्मितीला सुरवात केली. ब्लोअरचे स्वतःच्या बागेत प्रयोग घेतले, सुधारणा केल्या. या ब्लोअरला बागायतदारांकडून मागणी वाढली. कल्पकतेतून त्यांनी ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र आणि शेणखत वाहतुकीची ट्रॉलीदेखील तयार केली आहे.

कडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या मित्रांनी कल्पकता आणि शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांतून गावामध्येच ब्लोअरनिर्मितीला सुरवात केली. ब्लोअरचे स्वतःच्या बागेत प्रयोग घेतले, सुधारणा केल्या. या ब्लोअरला बागायतदारांकडून मागणी वाढली. कल्पकतेतून त्यांनी ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र आणि शेणखत वाहतुकीची ट्रॉलीदेखील तयार केली आहे.

‘ए कतरी अंगी असू दे कला... नाही तर काय फूका जन्मला...’ या ओळी तंतोतंत लागू पडतात कडवंचीमधील कृष्णा आणि सुनील या शेतकरी मित्रांना. या दोघांनी द्राक्ष आणि इतर फळबागांमध्ये फवारणीसाठी ट्रॅक्टरचलित ब्लोअरनिर्मिती उद्योगाला सुरवात केली. यंत्राची गरज आणि शेतकऱ्याच्या अपेक्षित बदलासाठी कल्पकतेची जोड दिली. शेतकऱ्यांच्या गरजेतून विस्तारत असलेला हा उद्योग उभा राहण्यामागची कहाणी मोठी रंजक आहे.

कडवंची गावात कृष्णा भानुदास क्षीरसागर यांची सत्तर एकर शेती. द्राक्ष वीस एकर, पेरू ५ एकर, सीताफळ ३ एकर. उर्वरित शेतीमध्ये खरिपात सोयाबीन, तूर आणि रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन. सुनिल अंबादास जोशी यांच्याकडे ३५ एकर शेती. त्यामध्ये ५ एकर द्राक्ष आणि ३ एकर पेरूबाग. उर्वरित क्षेत्रावर तूर, मका लागवड. कडवंची गावात गेल्या दहा वर्षांत १५०० एकरांहून जास्त द्राक्ष लागवड विस्तारलेली. द्राक्षबाग म्हटलं, की हवामानबदलानुसार फवारणी आलीच. या फवारणीसाठी लागणारे ब्लोअर विकत घेण्यासाठी कडवंची आणि परिसरातील द्राक्ष बागायतदारांना २४० किलोमीटरवरील पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथे जाण्याशिवाय पर्याय नसायचा आणि खर्चदेखील वाढायचा.

अडचणीतून काढला मार्ग
झाले असे की, २००६ मध्ये कृष्णा आणि सुनील द्राक्षबागेत फवारणीसाठी ब्लोअर विकत घेण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे गेले. विविध कंपन्यांचे ब्लोअर पाहून उपयुक्त असा ट्रॅक्‍टरचलित ब्लोअर निवडला. फळबागेत ब्लोअरच्या साह्याने फवारण्या सुरू झाल्या. मात्र, काही वर्षांनंतर फवारणीदरम्यान ब्लोअरमधील अडचणी दिसू लागल्या. पाण्याची नळी फुटणे, वारंवार करावी लागणारी देखभाल, बेअरिंगचा प्रश्न... यासारख्या तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्याने खर्च वाढला आणि फवारणीच्या कामातही खोळंबा. या अडचणींची सोडवणूक करायची म्हटले तर पिंपळगाव बसवंत येथील ब्लोअरनिर्मिती करणाऱ्यांशी संवाद साधल्याशिवाय पर्याय नव्हता, हे अंतर २४० किलोमीटर. त्यामुळे छोट्या दुरुस्तीसाठी पिंपळगाव बसवंतला ब्लोअर नेणेही शक्य नव्हते. नादुरुस्त पार्ट मिळेल त्या किमतीत बदलून ब्लोअर चालविण्याशिवाय पर्याय नव्हता. या यंत्रातील नेमकी अडचण आपणच समजून घेऊन सोडविली आणि गरजेनुसार अपेक्षित बदल ब्लोअरमध्ये केला, तर नेमका काय परिणाम दिसून येतो, याचा विचार कृष्णा आणि सुनील यांनी केला. दोघे दहावी पास. ब्लोअरसंबंधी फारशी तांत्रिक माहिती नाही, फारसे शिक्षण नसलेल्या कृष्णा आणि सुनील यांना तांत्रिक बदल करणे, ही सोप्पी गोष्ट नव्हती. पण, कोणतेही काम सांगा, ते शिकतो आणि नवीन काहीतरी बनवून अडचणींवर मात करण्याची वृत्ती असलेल्या दोघांनी ब्लोअरमधील तांत्रिक ज्ञान आत्मसात करायचे ठरविले आणि ते कामाला लागले. ब्लोअर खोलला तसाच परत जोडला, गरजेचे पार्टही बदलून फवारणी सुरू केली. स्वतः शिकत हळूहळू तंत्रज्ञान समजावून घेतले.  

घरातच उभी राहिली कार्यशाळा  
ब्लोअर वापरातील समस्या शोधण्यासाठी कृष्णा आणि सुनील यांनी कल्पकतेला वाव दिला. याबाबत कृष्णा क्षीरसागर म्हणाले की, माझ्या घरातच छोटेखानी यंत्रनिर्मिती कार्यशाळा उभी केली. आम्ही दोघे ब्लोअरला दुरुस्तीसाठी लागणारे पार्ट आणून अपेक्षित बदल करायचो.  वेगवेगळ्या कंपनीचे पार्ट आणून एक नवीन ब्लोअर तयार केला. सातत्याने अभ्यास आणि स्वतःच्या द्राक्षबागेत स्वतः तयार केलेल्या ब्लोअरचा वापर करीत बदल सुरू झाले. टप्प्याटप्प्याने अडचणींवर मात करण्यात यश मिळाले.
चांगल्या दर्जाचे साहित्य, ट्युबलेस टायर, टाकीची चांगली जाडी, उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलचा वापर, ब्लोअरच्या नळ्या जेसीबीच्या साह्याने बसविल्याने अडचणी दूर झाल्या. गरजेनुसार विविध बदल झालेल्या ब्लोअरवापराचे चांगले परिणाम फवारणीत दिसू लागले. दुरुस्तीच्या खर्चातही साठ टक्के बचत झाली. ही बाब आम्ही परिसरातील द्राक्ष बागायतदारांना सांगितली.

उभा राहिला उद्योग
कृष्णा आणि सुनील यांच्या द्राक्षबागेत जाऊन प्रत्यक्ष ब्लोअरमधील बदल तसेच फवारणीच्या कार्यक्षेमतेत झालेली वाढ याचा प्रत्यक्ष अनुभव बागायतदारांनी घेतला. गावातील बागायतदार कृष्णा आणि सुनीलकडून त्यांच्याकडील ब्लोअरमध्ये अपेक्षीत बदल करून घेण्यासाठी पुढे येवू लागले. ब्लोअरमधील अडचणीची सोडवणूक करण्यासाठी परगावातील गॅरेजमध्ये जावे लागू नये, वेळ आणि पैसे वाचावेत या शेतकऱ्यांच्या भावनेनेही कल्पक कृष्णा आणि सुनिल जोशी यांना ब्लोअर निर्मिती उद्योग सुरू करण्याला चालना मिळाली. प्रत्यक्ष अनुभव, चिकाटी आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने ऑगस्ट, २०१७ मध्ये कडवंची गावात  कृष्णा, सुनीलने ट्रॅक्‍टरचलीत ब्लोअर निर्मितीचा उद्योग सुरू केला. या उद्योगामुळे बागायतदारांचा वेळ, पैसा वाचला, यंत्राची गुणवत्ता वाढली. फवारणीतील अडचणी दूर झाल्या. या उद्योगातून वर्षभर आठ लोकांना काम मिळाले. त्यापैकी सहा जण कडवंचीमधीलच आहेत. या कारागिरांना १,७५० रूपये नगाप्रमाणे दिले जातात. ऑगस्ट २०१७ पासून आत्तापर्यंत गाव शिवार तसेच परिसरातील बागायतदारांनी २४० ट्रॅक्‍टरचलीत ब्लोअर खरेदी केले आहेत. बागायतदारांच्या मागणीनुसार २०० लिटर, ४०० लिटर, ६०० लिटर क्षमतेच्या ब्लोअरची निर्मिती केली जाते.क्षमतेनुसार ५५ हजार ते ६७ हजार ६०० रूपयांपर्यतच्या किमती आहेत.

असा झाला फायदा  

  • चांगल्या दर्जाच्या स्पेअर पार्टसचा वापर.
  • गावामध्येच ब्लोअरची उपलब्धता.
  • सुधारली फवारणीची गुणवत्ता. व्यवस्थापन खर्चात ६० टक्के बचत.
  • किमान पाच वर्ष दुरूस्ती निघणार नाही याची दक्षता.
  • ओळखीच्या शेतकऱ्यांना सुरूवातीला ब्लोअरचे पैसे भरण्यात दिली सवलत.
  • सवलतीचा झाला उद्योगवाढीसाठी फायदा.

शेणखतासाठी ट्रॉली, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र  
केवळ ब्लोअर बनविण्यापुरतेच मर्यादीत न राहता कृष्णा व सुनील या जोडीने द्राक्ष बागेत शेणखत टाकण्यासाठी ४ बाय ६ फुटांची हायड्रॉलीक ट्रॉली देखील बनविली. या ट्रॉलीला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. याचबरोबरीने एक प्रयोग म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील  एका शेतकऱ्याला पिकांवर फवारणीसाठी ट्रॅक्‍टरचलीत यंत्र तयार करून दिले. हे यंत्र ३० ओळींमध्ये फवारणी करते. त्यामुळे जेथे फवारणीसाठी सहा मजूर लागायचे तेथे एका मजुरात काम भागते.

संपर्क : कृष्णा क्षिरसागर ९५४५०१८७६९, सुनील जोशी ९०४९३९४१६८
 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...