समजून घ्या पाण्याचे महत्त्व

समजून घ्या पाण्याचे महत्त्व
समजून घ्या पाण्याचे महत्त्व

पाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी योग्य काम करण्याची गरज आहे. हे समजून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. हा गोंधळ दूर व्हावा, वास्तवाबद्दल योग्य जाणीव व्हावी, समस्येचे योग्य, दूरगामी फायदा देणारे शाश्वत उपाय योजले जावेत, यासाठी विचार आणि कृती करायला प्रवृत्त करणे, हा लेखमालेचा उद्देश आहे. या लेखमालेमध्ये आपण टप्याटप्याने जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत माहिती घेणार आहोत. गेली कित्येक वर्ष आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचतो किंवा पाहतो, अनेक लोक सांगतात की, पाणी वाचवा, पाणी जपून वापरा. आपण ते वाचतो, ऐकतो आणि बरेचदा सोडूनही देतो. जोपर्यंत आपल्या घरी नळाला पाणी येत असते, तोपर्यंत आपण निर्धास्त असतो. हे विशेषतः शहरांत दिसतं. पण एक दिवस पाणी पुरवठा बंद झाला की, आपल्यापैकी बरेच जण लगेच अस्वस्थ होतात? सरकारच्या नावाने खडे फोडतात. साधा पाइपलाइनमध्ये बिघाड असला तरी आधी नळ आणि लगेच लोकांच्या तोंडचे पाणी पळते. पण तेही तात्पुरतं. पुरवठा परत सुरू झाला की आपण पाणीटंचाई लगेच विसरूनही जातो. हे एवढं सार्वत्रिक आणि जुनं आहे की “तहान लागली की विहीर खणणे” ही म्हण देखील माणसाच्या याच प्रवृत्तीवर तयार झाली असणार. वाढता पाणी प्रश्न ः सध्याच्या काळात कुठेही पाहिलं तरी पाणीटंचाई दिसते. मग ते शहर असो की खेडं. पाण्याचा प्रश्न सगळीकडेच आहे. शहरात तो पटकन दिसतो, कारण लोकसंख्या एका जागी केंद्रित झाली आहे. पाण्याची गरज आणि आवश्यकता रोज जाणवत असल्याने तो सर्वत्र जिव्हाळ्याचा विषय होतो. त्यामुळे अनेकदा, बहुसंख्य लोकांमध्ये बुद्धीपेक्षा भावना जास्त प्रबळ ठरते आणि आणखी गोंधळ निर्माण होतो. आणखी एक गोंधळ निर्माण करणारी बाब म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये असलेले गैरसमज. क्रिकेट, राजकारण, पाणी, पर्यावरण आणि शेती या विषयांमध्ये सगळ्यांना सगळं कळतं, या गैरसमजामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि आहेत त्या क्लिष्ट झाल्या आहेत. पाण्याचे जैव विविधतेच्यादृष्टीने महत्त्व ः १) जगातील सर्वात मौल्यवान पदार्थ म्हणजे पाणी. पृथ्वीवर जीवन सुरू झालं ते पाण्यापासूनच, मग ते प्राणी असोत किंवा वनस्पती. पाणी हा जीवनासाठी आवश्यक घटक. २) पृथ्वीवर पाणी आणि तेही गोड पाणी नसतं तर जीवसृष्टी अस्तित्त्वात आली नसती. पृथ्वीच्या साधारण ७२ टक्के भागात पाणी आहे. मानवी शरीराच्या दृष्टीने, अन्नपचन आणि इतर सर्वच शारीरिक चयापचय क्रियांमध्ये पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. सर्व पेशी आणि अवयवांचं कार्य नीट चालू राहावं यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणे अत्यावश्यक बाब आहे. ३) पाणी हे जसं शरीराला आवश्यक गोष्टी वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोचवायला आवश्यक असते. तसंच ते शरीरातील टाकाऊ गोष्टी बाहेर टाकण्यासाठीही खूप आवश्यक असते. त्यामुळे, पाण्याची कमतरता किंवा अनुपलब्धता कोणत्याही जीवाला हानिकारक असते. म्हणून पाण्याला जीवन म्हटले जाते. ४) पाणी हा पृथ्वीवरचा असा एकमेव पदार्थ आहे की, जो सगळीकडे सर्वसाधारणपणे नेहमीच्या तापमानात द्रव स्थितीत मिळतो. पाणी हे उत्तम द्रावक आहे. त्यामुळे जीवनाला आवश्यक बरीचशी द्रव्ये त्यात विरघळतात. पृथ्वीवरील सर्वच जीवांना जगण्यासाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. वनस्पती आणि प्राणीसृष्टी या दोन्ही वर्गांना पाणी अनिवार्य आहे. ५) आपल्या आजूबाजूचा परिसर आणि सर्व सृष्टी हिरवीगार ठेवण्यासाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. पाणी नसेल किंवा कमी असेल तर या हिरवाईवर वाईट परिणाम होतो आणि प्रदूषण वाढून त्याचा सर्व जीवसृष्टीला धोका तयार होतो. ६) जीवसृष्टीचा एक मोठा घटक समुद्राच्या पाण्यात आहे. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी केवळ समुद्राच्या पाण्यात अंदाजे २,२०,००० जीव शोधून काढलेत. यामध्ये समुद्रातील वनस्पतीसृष्टी धरलेली नाही. अजूनही सुमारे ९० लाख सजीव समुद्रात आहेत ज्यांची ओळख अजून पटलेली नाही. ७) पाणी आहे म्हणून शेती आहे, जंगल आहे. ते आहे म्हणून मनुष्यप्राणी आणि इतर प्राणी यांना अन्न आहे, पाणी आहे, दूध आणि इतर पदार्थ आहेत, मासे आणि इतर गोष्टी आहेत. पाण्याचे स्राेत, उपलब्धता आणि वास्तव ः जगात आढळणारे पाणी हे तीन रूपात आढळते. वायू ः ढग, धुके आणि वाफ. द्रव ः पाऊस, झरे, ओढे, नद्या, तलाव, धरण, पाणथळ जागा, खाडी, समुद्र. घन ः हिमवृष्टी, हिमनग, गोठलेले पाणी. पाण्याचे स्राेत ः झरे ः हे सर्वात जुने स्राेत आहेत. पूर्वी माणूस फक्त हाच स्राेत वापरत असे. तलाव ः हे बहुतांश मानवनिर्मित असतात. पावसाचे पाणी साठवून ते वर्षभर वापरता यावे म्हणून मानवाने तलावांची निर्मिती केली. नद्या ः माती संपृक्त झाल्यामुळे किंवा खाली कठीण दगड असल्यामुळे पाणी जमिनीत न मुरता, पृष्ठभागावरून उताराच्या दिशेने वहायला लागते तेव्हा ओढा, नाला, नदी यांची निर्मिती होते. हे पाणी वाहते असेल आणि माणसाने प्रदूषित केलं नसेल तर पिण्यायोग्य असते. जिथे पाणी मुबलक होते तेथे मानवी संस्कृती समृद्ध झाली. म्हणूनच, नद्यांच्या खोऱ्यांमध्ये संस्कृती फुलल्या. समुद्र आणि महासागर ः जरी हे पाण्याचे मोठे स्राेत असले तरी क्षारयुक्त पाण्यामुळे याचा आपल्याला थेट उपयोग होत नाही. परंतु, पृथ्वीवरील जलचक्र सुरळीत राहण्यासाठी यांचा चांगला उपयोग होतो. तसंच, पृथ्वीचं तापमान कायम राखण्यासाठीही समुद्र, महासागर उपयुक्त आहेत. संपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० ( लेखक जल-मृद संधारणातील अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com