शेतकऱ्यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान देण्याचे लक्ष्य

विदर्भातील ११ जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठाने येथील भौगोलिकतेनुसार संशोधन केले आहे. आतापर्यंत १३७१ सुधारीत पीक उत्पादन तंत्रे, १५ संकरीत वाणांसह १६९ जाती विकसित केल्या आहेत.
संपादकीय
संपादकीय

शेतकऱ्यांसाठी चालविलेले शेतकऱ्यांचे एक स्वंयपूर्ण व स्वतंत्र कृषी विद्यापीठ विदर्भात स्थापन व्हावे, हे कृषी क्रांतीचे प्रणेते, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे स्वप्न होते. वैदर्भीय शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न करण्यासाठी स्थापन होणारे हे विद्यापीठ विदर्भाबाहेर नेण्याच्या प्रयत्नाला विदर्भातील जनतेकडून कडाडून विरोध झाला. कृषी विद्यापीठाचा ध्यास घेतलेल्या आंदोलकांनी भाऊसाहेबांचे हे स्वप्न साकारण्याच्या ध्यासाने स्वार्थरहित लढा दिला. या आंदोलनात एकूण आठ जण शहीद झाले. आंदोलनातील शहिदांच्या बलिदानातून अखेर २० ऑक्टोबर १९६९ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. आजवरच्या काळात यशस्वी व दैदीप्यमान घौडदौड करणाऱ्या या विद्यापीठाच्या स्थापनेला ५० वर्षे अाज पूर्ण होत अाहेत. मागील पाच दशकात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे शेतकरीभिमुख आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे. कृषी शिक्षण, संशोधन, कृषी विस्तार आणि बीजोत्पादन अादी कार्यात लक्षणीय कामगिरी करत केवळ देशांतर्गतच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पटलावरसुद्धा आपले अस्तित्व सिद्ध केले. जागतिक पटलावर सर्वाधिक लोकसंख्याक होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील जनतेला दोन वेळचे सकस अन्न पुरविणे शक्य व्हावे, या उद्देशाने कृषी शिक्षणाला प्राधान्य देत ग्रामीण तरुणाईला कौशल्य पारंगत होण्याकडे अग्रेसित करणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने स्थापित या विद्यापीठांतर्गत आठ शासकीय, संलग्नित दोन व २७ खासगी विना अनुदानित तत्त्वावर कार्यरत कृषी महाविद्यालयांच्या शृंखलेद्वारे कृषी पदविका ते आचार्य पदवी अभ्यासक्रमांची उपलब्धता करण्यात अालेली आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर या विद्यापीठाने आजपावेतो साठ हजारांवर कृषी पदविकाधारक, ३३ हजार ९२१ पदवीधारक (पशुवैद्यक शास्त्रासहित),९ हजार ९९३ पदव्युत्तर (पशुवैद्यक शास्त्रासहित) तसेच ६५५ आचार्य पदवीधारक निर्माण केले. यातील प्रत्येकजण अापल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत अाहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे २० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी याच विद्यापिठातून शिक्षण घेत विविध माध्यमातून देशांतर्गत शेती आणि शेतकरी हित जोपासण्यास प्राधान्यसुद्धा दिले अाहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे विदर्भातील ११ जिल्हयांचे अाहे. या विभागातील हवामान, भौगोलिकता डोळ्यांसमोर ठेवून मुख्य उद्दिष्ठांना अनुसरून विद्यापीठ संशोधनाचा कार्यक्रम निश्चित केला जातो. विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केले असून, आतापर्यंत विद्यापीठाने एकूण १३७१ सुधारित पीक उत्पादन तंत्रे, १५ संकरित वाणासह विविध पिकांच्या १६९ जाती, तसेच २३ कृषिविषयक यंत्रे व अवजारे प्रसारित केली आहेत. विद्यापीठाचे हे संशोधन कार्य १९ कृषी संशोधन केंद्रे, १७ कृषी व कृषी अभियांत्रिकी  विभाग आणि २५ कृषी संशोधन केंद्रांच्या माध्यमातून सुरू आहे. कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तीन महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी कृषी विस्तार शिक्षण हे एक महत्त्वाचे अंग आहे. विद्यापीठद्वारा निर्मित पीक वाण व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचविण्यासाठी राज्य शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग यांसह इतर शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था कार्यरत आहेत. त्यांना तांत्रिक बाबी विद्यापीठाद्वारे विविध माध्यमांतून पुरविण्यात येतात. परंतु काळाची गरज ओळखत विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे विद्यापीठनिर्मित तंत्रज्ञान जलद गतीने व प्रभावीपणे पोचविण्याकरिता विविध नावीन्यपूर्ण विस्तार शिक्षण पद्धत्ती विकसित केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी दिलासा अभियान, कीर्तनकार मेळावा, सरपंच मेळावा, कृषक विज्ञान मंच, महिला सक्षमीकरण मेळावा, शिवार फेरी, खरीप पूर्व मेळावा, कृषिदूत प्रशिक्षणे, आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद, राज्य स्तरीय वार्षिक कृषी प्रदर्शनी (अग्रोटेक) आदी कार्यक्रमांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यासोबतच विद्यापीठनिर्मित पीक वाणांना राष्ट्रीय स्तरावर मिळणारा प्रतिसाद व प्रसार बीजोत्पादन कार्यक्रमाला पोषक ठरत अाहे. महाबीजच्या माध्यमातून विद्यापीठ संशोधित पीकवाणांची गाव पातळीवर सहजतेने उपलब्धता झाली हे त्याचेच द्योतक मानता येईल. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासह कीड व रोग नियंत्रणाचा व्यापक अवलंब, जमिनीच्या पोतापासून तर गाव पातळीवरील प्रक्रिया उद्योगांपर्यंत, शेतीतील बदलते अर्थशास्त्र, पूरक व्यवसायांची उपलब्ध संसाधनांवर आधारित साखळीची कृतिशील प्रशिक्षणे विद्यापीठाला अधिकच लोकाभिमुख करीत आहेत. अाज काळ बदलला. हवामानात बदल झाले. त्याला अनुसरून संशोधनाची दिशा अाम्ही निश्चीत करीत अाहोत. शेतकऱ्यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान देण्यासाठी प्रयत्न सुरु अाहेत. देशाच्या पंतप्रधानांनी दुप्पट उत्पन्नाचा नारा दिला अाहे. तो प्रत्यक्षात अाणण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती व तंत्रज्ञानाचे पाठबळ दिले जात अाहे. विदर्भात सर्वाधिक लागवड होणाऱ्या कपाशीवर गेल्या हंगामात अचानक बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. यातून धडा घेत अामच्या शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास करून उपाययोजनांवर सातत्याने काम केले. चालू हंगामात सुरवातीपासूनच खबरदारी घेतली. विविध प्रशिक्षणांमधून अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, शेतकऱ्यांना अवगत केले. अत्यंत कमी खर्चाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात मोठे यश अाले. यामुळे चांगला फायदा झाल्याचे सर्वत्र बघायला मिळते अाहे. कृषी विद्यापीठ, कृषी खाते, शेतकरी यांनी सामूहीकपणे एकत्र येत यावर यश मिळवले. फेरोमोन ट्रॅप, ट्रायकोडर्मा, ट्रायकोकार्ड, एकात्मिक किड व्यवस्थापन यासारख्या साध्या उपायांमधून बोंड अळीवर मात देता अाली. उत्पन्न वाढीसोबतच काळानुरूप पीक पद्धतीत बदल, फळबागांकडे वळणे, शेतकऱ्याने पीक उत्पादन करतानाच त्यावर प्रक्रीयाकरून मूल्यवर्धनासाठी पुढाकार घेणे, प्रतवारी करणे अशा विविध बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे धोरण राबविले जाईल.   विद्यापीठाचे पहिले अाणि शेवटचे उद्दिष्ट हा शेतकरी अाहे. त्याच्या भल्यासाठी, विकासासाठी या ठिकाणी सातत्याने काम सुरू अाहे. ५० वर्षांचा एक मोठा पल्ला या विद्यापीठाने पूर्ण केला. त्यामुळे हे वर्ष अाम्ही विविध शेतकरीभिमुख उपक्रमांनी साजरे करणार अाहोत. यात राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय पातळीवरील सेमिनार, क्रीडा स्पर्धा घेत अाहोत.

(लेखक अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.) (शब्दांकन : गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com