सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली फायद्यात

सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली फायद्यात
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली फायद्यात

पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या समस्येवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पारगाव (सालूमालू) (ता. दौंड) येथील वाघ बंधूनी सेंद्रिय शेती सुरू केली. कमी पाण्यात शाश्वत उत्पादनासाठी फळबाग, ठिबक सिंचन याचाही अवलंब केला. शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन सुरू केले आहे. देशी तुपाच्या थेट विक्रीही ते करतात. अशा उपायांद्वारे शेती व्यवसाय फायद्यात आणला आहे. दौंडपासून ३५ किलोमीटर अंतरावर पारगाव (सालूमालू) हे बागायती गाव आहे. ऊस, भाजीपाला, चारा ही प्रमुख पिके. अधिक उत्पादनाचे आशेने शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर वाढविला. उत्पादनात वाढ झाली तरी खर्चही तितकाच वाढला. पुढे त्याचा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाल्याने उत्पादन कमी होऊ लागले. यावर मात करण्यासाठी गावातील ईश्वर अनिल वाघ व महेंद्र अनिल वाघ या दोघा बंधूंनी आपल्या १६ एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेतला. सेंद्रिय शेतीकडे वाटचाल ः पदवीनंतर २००५ मध्ये शेतीला सुरवात केल्यानंतर दहा वर्षांतच रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा कस हळूहळू कमी होत चालल्याचे श्री. वाघ यांच्या लक्षात आले. रासायनिक खते, कीटकनाशकांचा खर्च जवळपास २० -२५ हजार रुपयांच्या घरात पोचला. खर्च कमी करण्यासाठी शोध करताना सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेती पद्धतीची माहिती झाली. त्यांच्या गोमुत्र, जीवामृत, स्लरी अशा विविध बाबी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. शेताला आरोही नॅचरल फार्म हे नाव दिले. सेंद्रिय पद्धतीसाठी गावातील प्रगतिशील शेतकरी रामदास ताकवणे, बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ मिलिंद जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले. आत्माअंतर्गत सेंद्रिय शेती प्रशिक्षणही घेतले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, कृषी विभागाचे डी. जी. आहेरकर, कांतिलाल राऊत, अंबादास झगडे, नंदन जरांडे (पंचायत समिती) अशा अधिकाऱ्यांच्या संपर्कातून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुकर झाली. कोणत्याही एका पिकावर अवलंबून राहण्याऐवजी ऊस, कांदा, फ्लॅावर आणि भुईमूग या पिकांची निवड केली. मुक्त संचार गोठा पद्धती ः सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक म्हणून प्रथम चौफुला येथील बोरमलनाथ गोशाळेतून खिलार गाय सांभाळण्यासाठी आणली. पुढे राजकोट येथून तीन गीर गाई विकत आणल्या. पुणे जिल्हा परिषदेकडील नैसर्गिक शेती योजनेतून एक गीर गाय अनुदानामध्ये मिळाली. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत त्यांच्याकडे ८ गीर गाई, चार वासरे गोठ्यात आहे. तीन लाख रुपये पीककर्ज व मित्राकडून हातउसने ३ लाख घेत मुक्त संचार गोठ्याची उभारणी केली. गोपालनाच्या खर्चात बचत होण्यासोबत दूध उत्पादनामध्ये वाढ मिळाली. सध्या त्यांनी मुक्त संचार गोठ्यामध्ये तीस देशी कोंबड्या पाळल्या आहेत. त्यांच्यामुळे गोठ्यातील गोचिडे, किडी यांचे प्रमाण कमी झाले. अंड्यातून अतिरीक्त उत्पन्न मिळत आहे. खर्च वाचवण्यासाठी धडपड सुरू ः

  • २०१६ पासून शेतीचा खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी घरगुती जीवामृत व दशपर्णी अर्क करत आहेत. यामुळे उपयुक्त जिवाणू, बुरशी, गांडुळे व अन्य सूक्ष्मजीवांची शेतीमध्ये वाढ होत आहे. दहा गायींचे शेण, गोमूत्र, वडाखालील माती, बेसन, नैसर्गिक गूळ, ताक यांच्या साह्याने संपूर्ण शेतीसाठी जीवामृत बनवले जाते. यामुळे एकरी १२ ते १३ हजार रुपयांची बचत झाली आहे.
  • जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ताग व धैंचा हिरवळीच्या पिकांची पेरणी करून एक ते दीड महिन्यात गाडतात.
  • दरवर्षी पाणीटंचाई भासू लागली आहे. त्यावर मात करण्यासाठी संपूर्ण १६ एकर क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन केले आहे. सेंद्रिय घटकही शेतीला देण्यासाठी सुसज्ज यंत्रणा बसवली आहे. यामुळे मजूर खर्चात बचतही होत आहे. शेतीमालाच्या प्रत व दर्जा वाढून उत्पादनात वाढ झाली. उसाचे उत्पादन एकरी ४० ते ५० टन पासून वाढून ८० - ८५ टनापर्यंत पोचले आहे. याशिवाय भुईमूग, कोबी, भाजीपाला यातूनही चांगले उत्पन्न मिळू लागले.
  • फळबाग लागवडीवर भर ः शेती अधिक शाश्वत करण्यासाठी फळबाग करण्याचा विचार केला. फेब्रुवारी २०१९ मध्ये पेरू दोन एकर, सीताफळ दोन एकर यासोबत बांधावर १२० नारळ लावले आहेत. या बागेतून पुढील दोन वर्षांत उत्पादन सुरू होईल. अपेडाअंतर्गत सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. सध्या प्रमाणीकरणाचे दुसरे वर्ष असून, तीन वर्षांचा एकूण खर्च ६० हजार रुपयांपर्यंत येणार आहे. मात्र, त्याचा विक्रीसाठी फायदा होईल. दुग्धव्यवसायात प्रक्रियेवर दिला भर ः

  • गोपालनासाठी मुक्त संचार गोठ्याचा अवलंब केला. चाऱ्यामध्ये बचत साधण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राचा वापर करतात. तसेच एक लाख रुपये खर्चून दूध काढणी यंत्र घेतले आहे.
  • सध्या दुधावर तीन गायी असून, प्रति दिन २५ लिटर दूध उत्पादन मिळते. त्यापैकी वीस लिटर दुधाचे घरगुती पद्धतीने तूप तयार करतात. पुणे येथील उच्चभ्रू सोसायट्यामध्ये देशी तूपाची प्रति किलो तीन हजार रुपये दराने थेट विक्री करतात. गेल्या सहा महिन्यांपासून विक्री करत असून, हळूहळू मागणीमध्ये वाढ होत आहे. आजवर तुपासाठी ५० ग्राहक थेट जोडले आहेत. दरमहा सुमारे १५ ते २० किलो तूप विक्री होते. त्यातून सुमारे २५ ते ३० हजार रुपये निव्वळ नफा मिळत आहे. तूप निर्मिती व विक्रीसाठी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र नुकतेच मिळाले आहे. या तुपाची ‘आरोही नॅचरल’ या ब्रॅण्डनावाने विक्री करण्याचा मानस आहे. त्यासाठी लोगो, नांव ट्रेडमार्क केले असून, या नावाने वेबसाईटही तयार केली आहे.
  • कांदा साठवणुकीवर भर ः विविध बागांमध्ये आंतरपीक म्हणून ४ ते ५ एकर कांद्याची लागवड असते. एकरी १७ -१८ टन उत्पादन मिळते. मात्र, कांद्याच्या काढणी हंगामात मार्च ते मे या महिन्यात बाजारातील दर घसरतात. त्यावर मात करण्यासाठी कांद्याची ९५ टन साठवणक्षमतेची अत्याधुनिक साठवण चाळ उभी केली आहे. त्यासाठी १२ लाख रुपये खर्च आला. ऊस आणि फ्लॅावर या पिकांतील उत्पन्नातून ही रक्कम उभारली. कांद्याची साठवणूक करून योग्य दर येताच ग्रेडिंग व पॅकिंग करून थेट विक्री करतात. प्रचलित दरापेक्षा चार ते पाच रुपये प्रति किलो अधिक मिळतात. एकरी सव्वा ते दीड लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे. मागील पाच वर्षांतील खर्च आणि उत्पादन ः पिके ः ऊस, कांदा, फ्लॉवर. क्षेत्र ः १६ एकर पिकांचा उत्पादन खर्च किमान पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न असतो. संपूर्ण १६ एकर क्षेत्रातील उत्पादन खर्च चार ते सहा लाख इतकाच असतो. वर्ष -- उत्पन्न (रुपये) -- खर्च (रुपये) -- निव्वळ नफा (रुपये) २०१४-१५ -- २४ लाख -- पाच लाख -- १९ लाख २०१५-१६ -- २१ लाख -- साडे चार लाख -- १६.५० लाख २०१६-१७ -- २९ लाख -- सहा लाख -- २३ लाख २०१७-१८ -- २२ लाख -- चार लाख -- १८ लाख २०१८-१९ -- १८ लाख -- चार लाख -- १४ लाख प्रत्येकाचा विमा घेतलाय ः सध्या कुटुंबामध्ये सात व्यक्ती असून, सर्वांचा वैद्यकीय विमा घेतला आहे. त्याचा प्रति वर्ष २२ हजार हप्ता भरतात. घर खर्चासाठी दरमहा सुमारे १५ हजार रु., शिक्षणासाठी दहा ते पंधरा हजार रु. खर्च होतो. संपर्क ः ईश्वर वाघ, ७०२०२२६५८८, ९६२३४५८०१८ महेंद्र वाघ, ९६२३४५८०१९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com