चारा मक्यावरील लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण
चारा मक्यावरील लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण

चारा मक्यावरील लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण

चारा मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म) प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांनी सतर्क होऊन, सर्वेक्षण करून वेळीच उपाययोजना करून या अळीचे नियंत्रण करावे.

चारा मका हे पशुधन आणि कुक्कुटपालन खाद्य उद्योगातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. अलीकडील काळात या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म- स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) प्रादुर्भाव वाढत चालल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम पशुधन आणि कुक्कुटपालन खाद्य उद्योगावर होत आहे.  नुकसानीच्या अवस्था

  • सुरुवातीची अवस्था कोवळ्या पानांवर पूर्ण होते. त्यानंतर पोंग्यात छिद्र पडून आत शिरून आतील भाग खाते. पानांचा हिरवा पापुद्रा खात असल्याने वरच्या भागावर पांढरे चट्टे पडतात. 
  • दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत अळ्या पानाच्या कडांपासून आतल्या भागापर्यंत खात जातात. एका झाडावर एक ते दोन अळ्या राहतात. कारण संख्या जास्त असल्यास त्या एकमेकांना खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने फाटल्यासारखी दिसतात. सुरवातीच्या पोंगा धरण्याच्या अवस्थेत कमी प्रमाणात नुकसान होते. मध्यम पोंगे धरण्याच्या अवस्थेत झाड जास्त बळी पडते. उशिरा पोंगे अवस्थेत सर्वात जास्त नुकसान होते. काही वेळा अळी कणसावरील केस आणि कणीसही खाते. 
  • किडीविषयी महत्त्वाचे 

  •  मका, ऊस, ज्वारी, कपाशी तसेच भाजीपाला  पिकांवर उपजीविका करते.
  •     अळी अवस्था ३० ते ३५ दिवसांची.
  •     पतंग जास्त वेगाने उडणारे असतात. 
  •     उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात अंतर कापून स्थलांतर करतात. 
  •     पाने बाहेरून आतल्या बाजूस कुरतडून खाते. 
  •     वाढीच्या शेवटच्या टप्प्यात अंगावरील गडद ठिपके स्पष्ट दिसतात. 
  •     डोक्यावर पांढऱ्या रंगाचा उलटा इंग्रजी  Y आकार स्पष्ट दिसतो. 
  •     वाढीला उष्ण व दमट वातावरण पोषक.  
  • सर्वेक्षण  यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीला औरंगाबाद विभागातील काही गावांत आम्ही सर्वेक्षण केले. त्यातून लक्षात आले की उन्हाळ्यात चारा मका लागवडीचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी मक्याचा उपयोग मुरघासासाठी करीत आहेत. याच मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर गरजेपेक्षा जास्त किंवा असंतुलित झाल्यास जनावरांसाठी तो हानिकारक ठरू शकतो. त्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. दुधातही कीटकनाशकांचे अंश येण्याचे शक्यता असते.   नियंत्रण 

  • रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना शेवटची फवारणी ते कापणी यातील अंतर किमान ३० दिवसांचे असणे गरजेचे. त्यानंतरच चारा कापणे अथवा मुरघास बनवणे योग्य राहील. 
  •  बल क्लेम असलेल्या कीटकनाशकांचाच वापर गरजेचा आहे.
  •   आठवड्यातून दोन ते तीन वेळा सर्वेक्षण करावे. शेतातील पाच ठिकाणची मक्याची २० झाडे किंवा दहा ठिकाणी दहा झाडे शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी निवडावीत. 
  •  हंगाम संपल्यानंतर पीक अवशेषांची विल्हेवाट लावावी. पुढील लागवडीआधी जमिनीची खोलगट नांगरणी खूप गरजेची आहे. अळीची कोषावस्था जमिनीत असते. नांगरणीमुळे ती वरती येऊन सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात नष्ट होते. 
  •  खरिपात या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आतापासूनच दक्ष राहावे.  
  • फवारणी केव्हा करावी?

  • रोपे व सुरवातीची पोंगे अवस्था (उगवणीनंतर ३ ते ४ आठवडे)- सर्वेक्षणानंतर पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास.
  • मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था (उगवणीनंतर ५ ते ७ आठवडे)- सर्वेक्षणानंतर मध्यम पोंगे अवस्थेत १० टक्के प्रादुर्भाव व उशिरा पोंगे अवस्थेत २० टक्के प्रादुर्भाव आढळल्यास. 
  • गोंडा ते रेशीम अवस्था (उगवणीनंतर ८ आठवडे)- या अवस्थेत फवारणीची जास्त आवश्यकता नसते. तरीही जास्त प्रमाण आढळल्यास निर्णय घ्यावा. 
  • पहिल्या तीन अवस्थांमध्ये उपाययोजना केल्यास नियंत्रण सोपे होते.  
  • सुरवातीच्या अवस्थेत पानांवरील समूहात दिलेली अंडी किंवा अळ्यांचा समूह असलेली पांढरे चट्टे पडलेली पाने नष्ट करावीत.
  • सुरुवातीस एकरी २० याप्रमाणे पक्षी थांबे उभारावेत. 
  • मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
  • नराला आकर्षित करून नष्ट करण्यासाठी एकरी ५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
  • प्रकाश सापळे लावावेत. 
  • जैविक नियंत्रण

  • शेतात नैसर्गिकरीत्या उपलब्ध मित्रकीटकाचे संगोपन करावे.
  • टेलोनेमस किव्हा ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांचे एकरी ५०, ००० अंडी या प्रमाणे प्रसारण. 
  • निंबोळी अर्क (५ टक्के) ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी. 
  • नोमुरिया रिलाई किवा मेटॅरायझियम ॲनीसोप्ली या जैविक कीटकनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे संध्याकाळच्या वेळी फवारणी.
  • बॅसिलस थुरिनजेन्सिस- २ ग्रॅम प्रति लिटर पाणी.
  •     रासायनिक नियंत्रण      (प्रति लिटर पाणी)     क्लोरअँट्रानिलीप्रोल(१८.५ % एससी)- ०.४ मिली       इमामेक्टिन बेंझोएट (५ % एसजी)- ०.४ ग्रॅम      स्पिनोटोरम (११.७ % एससी)-       ०.५ मिली 

    संस्थेचे कार्य  लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र ही संस्था डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यासोबत कार्यरत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत लष्करी अळी व्यवस्थापना विषयी प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेने घेतले आहेत. कामगंध सापळे सुरक्षा किटचेही वितरण केले आहे.   - डॉ. संदीप आगळे,  ८२०८९४३४५९ (लेखक साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर या संस्थेत संशोधक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com