पानवेल, लवंग, जायफळ, काजू लागवड कशी करावी?

प्रश्न उत्तरे
प्रश्न उत्तरे

पानवेल लागवड कशी करावी? - व्ही. के. देवकर, निंभोरा, जि. जळगाव

  • पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून पुरेसे चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
  • पानमळा लागवडीच्या क्षेत्राचे नियोजन करून पानवेलीच्या सावली आणि आधारासाठी शेवरी, शेवगा, हादगा यांची लागवड जून, जुलै महिन्यांत पहिल्या आठवड्यात करावी.
  • राज्यात बहुतेक ठिकाणी कपुरी जातीची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने `कृष्णा पान'' ही जात विकसित केली आहे. या जातीची पाने आकाराने जाड व मोठी, पानांचा टिकाऊपणा चांगला, पानांचा आकार लंबगोलाकार असतो. याशिवाय कालीपत्ती, मीठा पान, मघई, बनारसी, देशावरी या जातींची लागवड काही भागांत केली जाते.
  • पानवेलीची लागवड बेण्यापासून केली जाते. साधारणपणे चार वर्षे वयाच्या वेलीच्या शेंड्याकडील ४५ सें. मी. लांबीचे चार पेरांचे व पाच पाने असलेले रसरशीत फाटेदार जोमदार बेणे निवडावे. आधारासाठी लावलेल्या शेवगा, हादगा या झाडांची उंची दोन ते अडीच फूट झाल्यानंतर पावसाची रिमझिम चालू असताना ऑगस्ट महिन्यात वेलीची लागवड करावी.
  • शेवरीच्या बुंध्याशी वाफ्याच्या बाजूस २५ ते ३० सें. मी. लांब आठ ते १० सें. मी. रुंद आणि दहा सें. मी. खोल चर तयार करावा. यात शेणखत मिसळावे. बेण्याचा शेंडा वर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त भाग चरात ठेवून व माती घालून पायाने दाबावे. दोन वेलींतील अंतर ६० सें. मी. ठेवावे. कांड्यावरील मुळे जमिनीकडील बाजूस येतील, याची काळजी घ्यावी.
  • पानमळ्याच्या चारही बाजूंस ताट्या बांधून निवारा करावा. पानवेलींना बांधणी, आंतरमशागत, मातीची भर देणे आवश्‍यक आहे.
  •  ः०२४२६- २४३८६१ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

    लवंग, जायफळाची लागवड कशी करावी? - पी. एस. सामंत, देवरूख, जि. रत्नागिरी

  • लवंग लागवड ही नारळाच्या बागेत करायची झाल्यास नारळाच्या चार झाडांच्या मध्यभागी (चौफुलीवर) दीड ते दोन वर्षांचे रोप लावावे. लागवडीसाठी ७५ x ७५ x ७५ सें.मी. आकाराचे खड्डे खणून, त्यामध्ये दोन टोपली शेणखत, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून खड्डे भरून रोप लावावे. लवंग झाडांना मातीमधील ओलावा मानवतो; परंतु दलदल किंवा कोरडी जमीन ठेवू नये. झाडांना आवश्‍यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी.
  • जायफळाची लागवड ५० टक्के सावली राहील, अशा ठिकाणी करावी. नारळ, सुपारीच्या बागांमध्ये ६ x ६ किंवा ७.५ x ७.५ मीटर अंतरावर ९० x ९० x ९० सें. मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्डे भरताना वरच्या थरात सुपीक माती आणि दोन घमेले शेणखत, एक किलो नीमकेक, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरावे. लागवडीसाठी कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती या जाती निवडाव्यात.
  • जून महिन्याच्या सुरवातीस एक वर्ष वयाचे कलम खड्ड्याच्या मधोमध लावावे. मादी कलमांची लागवड केली असल्यास पाच ते सहा टक्के नर कलमे किंवा दहा रोपे परागीकरणासाठी व फळधारणेसाठी बागेत लावावीत.
  • कलमांची लागवड केल्यानंतर कलमाच्या जोडाखालील येणारी फूट सतत काढावी. कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे.
  •  ः ०२३५८- २८०५५८ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

    काजू लागवड कशी करावी? -  मंगेश खाडे, नांदगाव, जि. रायगड

  • पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनीत, जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते. लागवडीसाठी वेंगुर्ला- १, वेंगुर्ला- ४, वेंगुर्ला- ६, वेंगुर्ला- ७, वेंगुर्ला- ८ या जातींची कलमे निवडावीत. लागवड करण्यासाठी एप्रिल - मे महिन्यात ७ मीटर बाय ७ मीटर किंवा ८ मीटर बाय ८ मीटर अंतर ठेवून ६० बाय ६० बाय ६० सें. मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यात दोन घमेली शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. कलमांची लागवड पाऊस स्थिरावल्यानंतर करावी.
  •      कलमे लावताना कलमांची हंडी फुटणार नाही, याची काळजी घ्यावी. कलमाला काठीचा आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. कलमांच्या जोडावरील प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. आळ्यात गवताचे आच्छादन करावे. उन्हाळ्यात गरजेनुसार कलमांना पाणी द्यावे.
  •  ः ०२३६६-२६२२३४ प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com