agricultural stories in Marathi, arthkatha, Ashok Methe farming story | Page 2 ||| Agrowon

बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्र

राजकुमार चौगुले
सोमवार, 26 जुलै 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता.कागल) येथील अशोक मेथे यांनी एकाच पिकाची शेती करण्यापेक्षा आंतरपिके, कमी क्षेत्रात अधिक भाजीपाला पिके यातून शेतीत विविधता आणली आहे. स्थिर उत्पन्नांसाठी ऊस आणि चल उत्पन्नांसाठी अन्य पिके हंगामी पिके असे सूत्र सांभाळत त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील अशोक शिवाजी मेथे हे शेतात एकात्मिक शेती पद्धतीसोबतच नवीन तंत्रज्ञानाचा शेतात वापर करणारे शेतकरी आहेत. पूर्वी पारंपरिक शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने चार साखर कारखान्यामध्ये सुमारे १७ वर्षे हेल्पर, फिटर (ए) म्हणूनही काम केले. अन्य लोकांनी शेतीतून मिळवलेले उत्पन्न, नावीन्यपूर्ण गोष्टी यामुळे स्वतःच्या शेतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने २००२ मध्ये त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर पूर्णवेळ शेती करू लागले. तेव्हापासून आजतागायत थोरले बंधू अरुण यांचे मार्गदर्शन शेतीमध्ये मिळत असते. कुटुंबीयांची शेतीकामात मोठी मदत होते.

पीक पद्धतीचे विवरण
मेथे यांची एकत्रित साडे चार एकर शेती आहे. सोबतच अन्य शेतकऱ्याची २.५ एकर शेती कसण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. त्यासाठी प्रति एकर प्रति वर्ष ३५ हजार रुपये देतात. गेल्या वर्षी या शेतात संपूर्ण ऊस होता. आता ७३ गुंठे खोडवा आणि २० गुंठे सोयाबीन आहे. स्वतःच्या शेतात १.५ एकर ऊस लागवड असून, १.२५ एकर सोयाबीन आहे. उर्वरित क्षेत्रात टोमॅटो (१० गुंठे), कारले (१० गुंठे), हिरवी मिरची (५ गुंठे), दोडके (७ गुंठे) अशी भाजीपाला पिके आहे.

आंतरपिकातून खर्च वसूल ः
ऊस शेतीमध्ये हरभरा, भुईमूग अशी आंतरपिके घेतात. आंतरपिकातून एकरी साधारणतः तीस ते चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न ते मिळवतात. यातून ऊस लागवड आणि देखभालीचा खर्च मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सिंचनासाठी स्वतःचे पाणी असेल तर अडीच एकर ऊस शेतीही फायदेशीर ठरू शकते, असे त्यांचे मत आहे.
गेल्या वर्षी मेथे यांच्या शेतावर २.५ एकर क्षेत्रामध्ये को-८६०३२ या ऊस जातीची लागवड केली. त्यात सोयाबीनच्या फुले संगम (केडीएस-७२६) वाणाचे आंतरपीक घेतले. त्यासाठीचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मार्फत राबविण्यात आले. त्यातून त्यांना एकरी उच्च प्रतीचे १३ क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले. सोयाबीनसाठी त्यांनी वाटेकऱ्याची मदत घेतली. त्यामुळे उत्पादनातील निम्मे सोयाबीन त्याला दिले. त्यांच्या वाट्याला आलेल्या साडेपाच क्विंटल सोयाबीनची विक्री व्यापाऱ्यांना करण्याऐवजी बियाणे म्हणून करण्याचा निर्णय घेतला.. जर सोयाबीन व्यापाऱ्यांना दिले असते तर केवळ १२ ते १३ हजार रुपये मिळाले असते. मात्र बियाणे म्हणून १०० रुपये किलो या दराने शेतकऱ्यांना विक्री केली. खर्च वजा जाता सोयाबीन विक्रीतून त्यांना ३५ हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळाला. त्यांचे उसाचे सरासरी उत्पादन एकरी ८० टन इतके आहे. त्यातून त्यांना एकरी अडीच लाखाचे उत्पन्न मिळते. वरील ५० हजार रुपये खर्च वजा केल्यास निव्वळ उत्पादन दोन लाखांपर्यंत मिळते.

भात शेतीतून उत्पन्न
खरीप २०२० मध्ये ‘फुले समृद्धी’ या नवीन भात वाणाचे प्रात्यक्षिक त्यांच्या १ एकर क्षेत्रावर घेण्यात आले. त्यातून ३२ क्विंटल भात उत्पादन मिळाले. यंदा केवळ १० गुंठे भाडेतत्त्वावरील संपूर्ण क्षेत्रावर को-८६०३२ या वाणाची पूर्वहंगामी लागवड २०१९ मध्ये केली होती. यात ठिबक सिंचन, विभागून खते देणे इ. सुधारित तंत्राचा वापर केला. त्यामुळे उसाचे एकरी ८० टन उत्पादन मिळाले आहे. याच क्षेत्रावरील खोडवा पिकात पाचटाची कुट्टी करून गाडल्याने उत्तम उत्पादन मिळाले. खोडव्यामध्ये उन्हाळी भुईमूग हे आंतरपीक घेतले.

नवा व्यवसाय अजमावतोय...
कोंबडीच्या ब्लॅक ऑस्ट्रेलॉर्प या नव्या जातीचे ७० पक्षी मेथे यांनी पाळले आहे. हे पक्षी कृषी विज्ञान केंद्राकडून मिळाले आहेत. या पक्ष्यापासून प्रति पक्षी प्रति वर्ष २२५ ते २५० अंडी मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत एकूण ४०० अंडी मिळाली. प्रति अंडे सात रुपये दर मिळाला. पोल्ट्री फीडसाठी १२०० रुपये प्रति महिना खर्च होतो. सुरुवातीला पक्षी लहान असताना सातव्या दिवशी व तेराव्या दिवशी दोन लस दिल्या.

घरगुती पोषणासाठी फळझाडे...
आपल्या क्षेत्रामध्ये केवळ पिके घेतानाही बांधासह विविध ठिकाणी आंबा (१७), चिकू (५), नारळ (२५), फणस (१), लिंबू (१), पेरू (२), शेवगा (२) अशी ५३ फळझाडे लावली आहे. यातून जैव विविधता जोपासली जाते. त्याची फळे विकण्यापेक्षा घरगुती वापरावर भर असतो.

पुरस्काराने गौरव
कणेरी येथील कृषी विज्ञान केंद्राने शेंडूर हे गाव दत्तक घेतले आहे. केंद्राच्या वतीने गावात विविध कार्यक्रम घेतले जातात. अशा सर्व शेतीविषयक कामांमध्ये मेथे सहभाग घेतात. केंद्रातील तज्ज्ञांच्या ते नेहमी संपर्कात असतात. केंद्रामार्फत मेथे यांना चौधरी चरणसिंह प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

वाण बदल ः
पूर्वी मेथे यांच्याकडे एकच सोयाबीन वाण पेरत. मात्र रोग व किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी मिळू लागले. गेल्या वर्षी त्यांनी वाणात बदल करत तांबेरा व करपा रोगाला प्रतिकारक असलेले फुले संगम (केडीएस ७२६) हे वाण वापरले. वाण. टोकण पद्धतीतही बदल करत पूर्वीप्रमाणे आठ ते नऊ सोयाबीन दाण्यांऐवजी दोन ते तीन दाणे टोकण करू लागले. यामुळे बियाणे खर्चात बचत झाली. जैविक बीजप्रक्रियाही केली. योग्य व्यवस्थापनामुळे त्यांचे सोयाबीनचे उत्पादन (२७ गुंठ्यांत) १३ क्विंटलपर्यंत गेले आहे. पूर्वी त्यांना केवळ आठ ते नऊ क्विंटल उत्पादन मिळत असे.

बहुपीक पद्धतीतून मिळतो अधिक फायदा

  • केव्हीकेच्या ‘लखपती’ शेतीपासून प्रेरणा घेत मेथे यांनी कमी क्षेत्रात अधिक पिके घेण्यास गतवर्षापासून सुरुवात केली. भाजीपाला पिकामध्ये त्यांच्याकडे वांगी, मिरची, टोमॅटो, कारली, दोडका, कोथिंबीर, बटाटा, भेंडी, कोबी, फ्लॉवर अशी विविध पिके हंगामानुसार घेतली जातात. त्यासाठी १.२५ एकर क्षेत्र दरवर्षी ठेवले जाते.
  • भाजीपाल्याची शेती करताना एकापेक्षा अधिक भाज्यांची थोड्या थोड्या प्रमाणात लागवड केल्यास दरात चढ-उतार असले, तरी अंतिमतः ती फायद्याची ठरत असल्याचा अनुभव आहे. दरात घसरण किंवा कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले तरी फारसे होत नाही.
  • सप्टेंबर २०२० मध्ये ७ गुंठ्यांवर बेड, प्लॅस्टिक आच्छादन व ठिबक यांचा वापर करून संकरित वांग्याची लागवड केली होती. लागवड व अन्य खर्च सुमारे ६३ हजार रुपये आला. जानेवरी २०२१ पर्यंत चाललेल्या या प्लॉटमधून वांग्याचे एकूण ५.२ टन उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी लॉकडाउन असूनही वांग्यास किलोस ६० ते ७० रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता त्यांना १,५२,००० रुपये फायदा मिळाला. त्याच बेडवर कारल्याची ही रोपे लावली. कारल्याच्या उत्पादनातून त्यांना ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
  • रब्बी हंगामात बटाटा पिकाची (बेळगावी लोकल) लागवड ३५ गुंठ्यांमध्ये केली होती. त्यातून ६ टन उत्पादन मिळाले. उत्पादित बटाट्याचा आकार मोठा व चिप्ससाठी योग्य असल्याने गावातील महिला बचत गटांनी चिप्ससाठी १५ रुपये प्रति किलो दराने विकत घेतला.
  • सध्या त्यांच्याकडे कारले (७ गुंठे), मिरची (३ गुंठे), टोमॅटो (२ गुंठे), कोथिंबीर (२५ गुंठे) अशी भाजीपाला पिकांची लागवड केलेली आहे.

अशोक मेथे, ९१५८१२८४३९


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...