गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योग

गाव पातळीवर बांबू प्रक्रिया उद्योगांना चांगली संधी आहे.
गाव पातळीवर बांबू प्रक्रिया उद्योगांना चांगली संधी आहे.

आपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही तर बांबूचे बाजारातील दर पडण्याची शक्यता आहे. पुन्हा लागवड वाढवणे आणि असलेली लागवड नीट सांभाळणे याकडे शेतकरी दुर्लक्ष करतील. सध्याच्या काळात बाजारातील होणारा पुरवठा लक्षात घेता हा बांबू औद्योगिक कारणासाठी वापरला पाहिजे. लहान, मोठ्या भांडवलावर गावपातळीवर बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्याची गरज आहे.

बांबू लागवड व्हावी, त्याची नीट काळजी घेऊन उत्पादन वाढावे यासाठी सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. गेल्या सहा वर्षात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बांबू रोपवाटिकांना दिलेले प्रोत्साहन, वेगवेगळ्या खासगी आणि इतर रोपवाटिकांमधून विकली गेलेली बांबूची रोपे, बांबू सोसायटीच्या महाराष्ट्र चाप्टर आणि महाराष्ट्र बांबू बोर्डाने लागवड वाढीसाठी घेतलेले श्रम, सरकार दरबारी बांबू लागवडीसाठी केलेला प्रचार या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात किमान ४ ते ५ लाख रोपे विकली गेली आहेत. यातील ५० टक्के तरी रोपे जगली, असे गृहीत धरले तरी सुमारे ५० हजार एकरावर बांबू लागवड झाली आहे असे लक्षात येईल. याचा अर्थ येत्या वर्षापासून हा बांबू बाजारात यायला सुरुवात होईल. अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी आपण आज उपलब्ध असलेल्या माहितीवरून हा अंदाज बांधू शकतो. आपण औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही तर बांबूचे बाजारातील दर पडतील आणि पुन्हा लागवड वाढविणे आणि असलेली लागवड नीट सांभाळणे याकडे शेतकरी दुर्लक्ष करतील. हातात आलेली एक चांगली संधी आपण घालवून बसू. आजच्या घटकेला बाजारातील होणारा पुरवठा लक्षात घेता हा बांबू औद्योगिक कारणासाठी वापरावा. लहान, मोठ्या भांडवलावर गावपातळीवर बांबूवर आधारित उद्योगांची उभारणी करण्याची गरज आहे. नाहीतर इतर पिकांसारखी बांबूची अवस्था होईल.     

          नवीन पीक बाजारात आणताना त्याला आधारासाठी सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता त्या पिकाचा योग्य वापर होऊन, विनियोग कसा होईल, देशाच्या तिजोरीत भर कशी पडेल, ज्या शेतकऱ्याने हे पीक पिकवले आहे त्याचे संरक्षण कसे होईल हे पाहावे लागेल. यासाठी बांबू हे औद्योगिक पीक आहे याचे भान ठेवले पाहिजे. बांबूची लागवड आणि त्याआधारीत उद्योगांची तयारी या गोष्टी एकाच वेळी नियोजनपूर्वक होणे आवश्यक आहे. बांबूचा उद्योगामध्ये वापर होण्याच्या काही संधी आहेत याचा विचार करून नाबार्ड, बँका आणि इतर अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्था, सरकारमधील उद्योग विभाग, महाराष्ट्र बांबू बोर्ड आणि राष्ट्रीय बांबू मिशन, उद्योजक व बांबूवर काम करणाऱ्या बांबू सोसायटीसारख्या संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. अगदी सहज शक्य असलेले व किमान कौशल्य लागणारे बांबू आधारीत व्यवसाय गावपातळीवर करता येतात. यातील काही व्यवसाय सह्याद्री रांगांतील अनेक गावांत वर्षानुवर्षे अस्तित्वात आहेत. अनेक जण त्यावर आपला उदरनिर्वाह करत आहेत, हे सर्व व्यवसाय ऑक्टोबर ते मे या कालावधीत होऊ शकतात.

बांबूची तोड करून वाहतूक सह्याद्री पट्ट्यामध्ये हा व्यवस्थित स्थिरावलेला व्यवसाय आहे. नवीन लागवड होणाऱ्या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात हा व्यवसाय नव्याने सुरू होऊ शकतो. अनेक शेतकरी विचारतात की, आम्हाला बांबू विक्री करावयाची आहे, तो कोठे विकावा? यासाठी आजूबाजूच्या १०० ते २०० किमी क्षेत्रात असलेला जुना लावलेला व नवीन लागवड झालेला बांबू बघावा, शेतकऱ्यांना भेटा, ते कोठे विकतात किंवा कोठे विकणार आहेत हे विचारा. बांबू तोडण्यासाठी मजूर लागतील, तो वाहतूक करण्यासाठी वाहने लागतील आणि तो विकण्यासाठी बाजार लागेल. महाराष्ट्र आणि देशातील बांबू बाजारात कोणता बांबू कसा विकला जातो, मागणी कशाला आहे याचा अभ्यास करावा. पद्धतशीर गट करून आधुनिक यांत्रिक करवती वापरून बांबू तोडावा आणि त्याची विक्री करावी. रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात, आपण त्यांचा शोध घेतला पाहिजे. यापुढे नवीन शेती आधारीत उद्योग सुरू करावा. यासाठी काही लाख रुपये भांडवल लागेल, ते तुमच्या सोसायट्या, बँकांमधून उपलब्ध होईल. १० ते २० लोकांचा गट तयार करावा. प्रत्येक तालुक्यात दर ८ ते १० गावांमागे एक गट, त्याचे व्यवस्थापन करणारा आणि वाहतूक करणारा अशी रोजगार देण्याची क्षमता या व्यवस्थेत आहे.

बांबूवर प्रक्रिया हा व्यवसाय गावपातळीवर करणे शक्य आहे. बांबूची वर्गवारी करून त्यातील ठराविक जाडीचा व लांबीचा बांबू प्रक्रिया करून विकता येतो. यासाठी देशी, विदेशी बाजारपेठ उपलब्ध आहे. इंटरनेटवर ट्रीटेड बांबू हे शब्द टाकल्यावर आपणास जगभरात कोणत्या प्रकारचे ट्रीटेड बांबू लागतात याची कल्पना येते. त्यानुसार आपण बांबूवर प्रक्रिया करून ते उपलब्ध करून देऊ शकतो. यासाठी कॉम्प्युटरवर आधारीत नेट मार्केटिंग करू शकतो. आम्हाला शाळेत कॉम्प्युटर शिकवण्याचा उद्देश जगातील तंत्रज्ञान समजले पाहिजे व दैनंदिन व्यवहारात त्याचा वापर झाला पाहिजे हा आहे, ते तंत्र वापरून आपण बांबूची विक्री करू शकतो. यासाठी प्रक्रिया यंत्रणा उभी करणे, प्रक्रिया केलेला बांबू वाळवण्यासाठी तसेच वाळवलेले बांबू साठवण्यासाठी शेड उभी करणे आणि बांबू खरेदी करणे यासाठी लागणारे भांडवल गृहीत धरावे लागेल.

हिरवा बांबू गोळा करून वर्गवारीनुसार विक्री गावस्तरावर आपल्या ५ ते २५ कि.मी. परिसरातील बांबू एकत्र करून त्याची जाडी आणि उंची यानुसार वर्गवारी करावी. यासाठी लागणारी सामग्री फार नाही. बांबू एकत्र करण्यासाठी खेड्यात एक एकरापर्यंत जागा, एखादी शेड आणि एक किंवा दोन विजेवर चालणाऱ्या करवती आणि मजूर यांची गरज आहे. यासाठी काही लाखांत भांडवल लागेल. ते स्थानिक बँकांकडून उपलब्ध होऊ शकते. दैनंदिन व्यापारासाठी लागणारे भांडवल बँका देतात. ते घेऊन हा बांबू ठराविक दराने खरेदी करून त्याची जाडी आणि लांबी यानुसार वर्गवारी करावी.         बांबूचे वरील ८ ते १० फुटांचे शेंडे वेगळे करावेत. सरळ बांबूचे गठ्ठे बांधून विक्रीसाठी तयार ठेवावेत. उरलेल्या बांबूचे १५ किंवा २० फुटांचे तुकडे करून विक्रीसाठी तयार करावेत. एकसारखी जाडी आणि सरळ वाढलेला बांबू हा वेगवेगळ्या बाजारात हवा असतो हे लक्षात घ्यावे. यापूर्वीही सरळ वाढलेल्या बांबूचे महत्त्व सांगितले आहे. यातील वरील निमुळते तुकडे आणि १५ ते २० फुटांचे तुकडे हे भाजीपाला आणि फळबागा यांच्यासाठी आधार म्हणून लागतात. तसेच चांगले जाड बांबूचे २० फुटांचे तुकडे वेगवेगळ्या बाजारात खपतात. याचे मार्केट संपूर्ण भारतभर उपलब्ध आहे.  तरुण शेतकरी यामध्ये उतरल्यास रोजगार आणि व्यापाराची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा परिसरातील शेतकरी हा व्यवसाय अनेक वर्षे करतात. हे काम डेपो स्वरूपात असेल. येथे वर्गवारी, व्यवस्थापन आणि वाहतुकीसाठी माणसे लागतात.

भेटवस्तूंची निर्मिती ज्यांच्याकडे कलात्मक दृष्टी, बांबू वस्तू करण्याची क्षमता आणि इच्छा आहे, ते अनेक नवनवीन वस्तू करून विकू शकतात. कार्पोरेट जगतात आणि समाजातही आजकाल भेटवस्तू देण्याचा कल वाढतो आहे. अनेक वस्तू आपण करू शकतो. उदाहरणार्थ, ज्या ठिकाणी पर्यटनाची चलती आहे अशा ठिकाणी या वस्तूंना चांगली मागणी आहे. तुमच्याकडे वैविध्य असेल, कल्पकता असेल तर हे शक्य आहे.

-  डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५, (लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com