agricultural stories in Marathi, bamboo plantation & management | Agrowon

बांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधान

डॉ. हेमंत बेडेकर
रविवार, 14 एप्रिल 2019

बांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती, व्यवस्थापनाचे तांत्रिक ज्ञान याचबरोबरीने बाजारपेठेची मागणी याची माहिती असणे आवश्यक आहे. लेखमालेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बांबू लागवड आणि व्यवस्थापनाविषयी प्रश्न येत आहेत. बांबू पिकातील माझ्या अभ्यासानुसार काही प्रशांची उत्तरे आजच्या भागात देण्याचा प्रयत्न करत आहे.

बांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती, व्यवस्थापनाचे तांत्रिक ज्ञान याचबरोबरीने बाजारपेठेची मागणी याची माहिती असणे आवश्यक आहे. लेखमालेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बांबू लागवड आणि व्यवस्थापनाविषयी प्रश्न येत आहेत. बांबू पिकातील माझ्या अभ्यासानुसार काही प्रशांची उत्तरे आजच्या भागात देण्याचा प्रयत्न करत आहे.

गेल्या लेखात बांबू लागवड करताना एकरी ५ ते ७ टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन सुरवात करुया असे म्हटले होते. त्यावर काही जणांनी हे उत्पादनाचे फार कमी उद्दिष्ट आहे, त्यामुळे बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळणे शक्य होईल का? असे मत मांडले. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.  मी आधीच्या लेखात व्यवस्थापन पद्धती सांगितली होती. ती पाहता आणि त्यात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वसाधारण हवामानात चौथ्या वर्षापासून बांबू तोड सुरू होणार आहे. बांबू हे पीक नवीन असल्याने सर्व सामान्य शेतकऱ्यांनी दर बेटातून एक चांगला बांबू जर उत्पन्न केला तर त्याने यश मिळवले आहे असे होईल. अर्थात याचा अर्थ असा नाही की फक्त एकच बांबू मिळेल. शेतकरी जर व्यवस्थित देखभाल करणारा असेल तर त्याला एका बेटातून तीनपेक्षा जास्त बांबू पहिल्या तोडीपासून मिळू शकतात. फक्त पहिल्या दोन ते तीन तोडीतील बांबू हे लहान, कमी जाडीचे व वजनाला कमी आढळतील. हे साहजिक आहे.

  •     बांबूची वाढ ही जमिनीच्या आतील कंद कसा वाढतो त्यावर अवलंबून असते. तो जर नीट पोसला तरच बांबूची संख्या वाढते. म्हणून मी सुरवातीच्या वर्षी ५ ते ७ टन अपेक्षित उत्पादन धरले. त्यानंतरच्या वर्षी ८ ते ९ टन आणि आठव्या वर्षांनंतर पुढे बांबू उत्पादनाचे ध्येय हे एकरी १५ टन कोरडवाहू आणि बागायती असेल तर २५ टन असले पाहिजे. फक्त हे उत्पादन पहिल्या वर्षी मिळणार नाही. त्यासाठी किमान ती बेटे ७ ते ८ वर्षांची व्हावी लागतील. पहिली एक दोन वर्षे बांबू पीक समजण्यात जातील. अनुभवी शेतकरी हे समजून घेतील अशी अपेक्षा आहे. बाजारपेठेत काही जण एकरी १३० टनाचा दावा करीत आहेत. अशा लोकांकडून त्यांच्या कराराची वैधता तपासावी. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील नामांकित वकिलांना ही करारपत्रे सही करण्यापूर्वी व लागवडीपूर्वी दाखवावीत. फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.
  •     अनेक जणांना हवामानानुसार लागवड या विषयाबद्दल अधिक स्पष्टीकरण हवे आहे. त्याचबरोबर इतर जाती लावण्याबद्दल अनेकांना संभ्रम दिसतो. अनेकांनी असे म्हटले, की आम्ही पाणी देणार आहोत तेव्हा आम्हाला कोणत्याही हवामानात विशेषतः दमट हवामानातील जाती लावता येतील काय? काही ठिकाणी अशी लागवड आहे असेही सांगितले गेले. मी सर्व सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेऊन ही लेखमाला लिहिली आहे. त्यामुळे कमी पाणी असलेला, सर्व प्रकारच्या हवामानात शेती करणारा असा शेतकरी डोळ्यासमोर आहे. आधीच्या भागात नमूद केले आहे की शक्यतो ज्या जमिनीत इतर पिके चांगली येतात त्या जमिनीत बांबू लावू नये. बांबू हे सर्व हवामान सहन करणारे व दुष्काळातही जिवंत राहणारे असे मूलतः कोरडवाहू पीक आहे. कोरडवाहू असले तरी त्याला जर पाणी जास्त वेळ मिळाले तर ते अधिक उत्पादन देईलच. पण, जरी पाणी कमी असले तरी तग धरून राहील. ही गोष्ट प्रथम नीट समजून घ्या. सर्वच शेतकऱ्यांकडे पड, वरकस, खराबा अशा जमिनी असतात. या जमिनी आपण लागवडीखाली आणत आहोत. यामुळे इतर चांगल्या जमिनीबरोबर पडीक जमिनीतून आपण पीक घेऊ शकतो. ती जमीन वाया जाणार नाही हे लक्षात घेणे जरूरी आहे.

हवामानाचा अभ्यास करा

हवामान हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या हवामानात जेथे उन्हाळा तीव्र आहे, हवेत कोरडेपणा जास्त आहे त्याठिकाणी आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण दमटपणा निर्माण करू शकत नाही. उन्हाळातील ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाणारे तापमान कमी करू शकत नाही. या आपल्या मर्यादा आहेत. कोकणासारख्या प्रदेशात भरपूर दमट हवामान आहे, चार महिने पडणारा हुकमी पाऊस आहे. अशा वेगवेगळ्या हवामानात ज्या जाती सुलभतेने वाढतात हे वर्षानुवर्षे माहीत आहे त्याच जाती तेथे लावाव्यात, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ठोकताळा आहे. याचा अर्थ इतर जाती लावून बघू नयेत असा नाही. ५ ते १० रोपे वेगळ्या जातीची लावावीत. अनुभव घ्यावा. तो बांबू आपल्याला जमला, त्याची विक्री करता आली तर अवश्य लावावा. पण, हे सरसकट सांगता येत नाही. कारण, ते शास्त्राला धरून नाही. यासाठी एक पद्धती आहे. त्यामध्ये नवीन जात ही सर्व हवामानात अनेक ठिकाणी लावून बघावयाची असते. त्यांची निरीक्षणे नोंदवावी लागतात. यासाठी किती झाडांची निरीक्षणे नोंदवायची हेही ठरलेले असते. अशाप्रकारे आपल्याकडे  सर्व जातींचा विस्तृत अभ्यास झालेला नाही. तो झाल्यावर आणखी काही जातींची यात भर पडू शकते. म्हणून हवामानानुसार जातींची शिफारस केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मानवेल व कोरड्या प्रदेशात विक्रीची हमी असेल तर बल्कोवा लावता येईल. बल्कोवा सामान्य बाजारात कमी दरात खपतो हा अनुभव आहे. त्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्याला बाजारात कमी किंमत मिळते, त्यामुळे त्यासाठी कोणी कायदेशीर करार केला तरच लावावा. बाल्कोवा लावताना पूर्णपणे बागायती पद्धतीने लावावा. कोरडवाहू असेल किंवा पाण्याची खात्री नसेल तर लावू नये, नुकसान होईल.

रोपांची लागवड

  •     रोपे बियांपासून स्वतः तयार करावीत की रोपवाटिकेतून घ्यावीत याबद्दल शेतकरी थोडे संभ्रमात आहेत. शक्यतो रोपे घ्यावीत. एकतर आपल्याकडे होऊ शकणाऱ्या जातींपैकी फक्त मानवेल, काटेरी आणि तुलडा यांचे बी मिळते. माणगा, बाल्कोवा व व्हल्गारीस हिरवा याचे बी येत नाही. माणग्याला फुले येतात पण बिया धरत नाहीत. तेव्हा कोणी माणग्याचे बी देतो असे सांगितले तर ती फसवणूक आहे.
  •     बांबूचे बी झडू लागल्यावर लगेच त्याची उगवण क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे तुमच्या हातात आलेले बी चांगले उगवेल याची काहीही खात्री नाही. रोपवाटिकेतसुद्धा ही उगवण बऱ्याचदा ५० टक्क्यांपेक्षा कमी असते. आपल्याला रोप पूर्ण एक ते दीड वर्षांचे, २ ते ३ फुटवे फुटलेले हवे. तरच त्याचा कंद तयार झालेला असतो. त्यावरच आपले उत्पन्न सुरू होण्याची वेळ आणि उत्पन्न अवलंबून असते.
  •     बी पेरण्यासाठी व पूर्ण वाढ होण्यासाठी लागलेली मेहनत व वेळ लक्षात घेता त्या रोपांची किंमत रोपवाटिकेतील रोपांपेक्षा जास्त पडते. आपले एक ते दीड वर्ष वाया जाते. म्हणून रोपवाटिकेतून पूर्ण वाढलेले खात्रीचे रोप आपल्याला फायदेशीर पडते. जर समूहाने शेती करावयाची असेल तर बी वापरायला हरकत नाही. त्यासाठी रोपवाटिका उभी करावी लागेल. तो स्वतंत्र विषय आहे.

 गटातून बाजारपेठ तयार करा

कोणतेही पीक लागवड करताना त्याची कोठे विक्री व्यवस्था आहे याची सखोल चौकशी शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे. कोणीतरी सांगितले म्हणून लागवड केली आणि  शेवटी पस्तावायची वेळ आली ही स्थिती असता कामा नये. जेथे वर्षानुवर्षे लागवडीखाली बांबू होतो त्या सह्याद्रीच्या ८ ते १० जिल्ह्यात विक्री व्यवस्था काही प्रमाणात अस्तित्वात आहे. जेथे नवीन लागवडी होताहेत, जेथे आधी बांबू लावायला आणि तोडीला बंदी होती अशा मराठवाडा, विदर्भ व खानदेश या प्रदेशात खासगी जमिनीवर लागवड करताना हा प्रश्न निर्माण होणार अपेक्षित आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गवारी करून जर सह्याद्रीतल्या किंवा इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांना बोलवले तर लिलाव होऊ शकतात. मेंढा लेखामध्ये बांबू लिलाव  करायला व्यापारी येतात, तर तुमच्याकडे का येणार नाहीत ? यासाठी गट पद्धतीने तोड करणे, वर्गवारी करणे आणि लिलाव करणे ही पद्धत अवलंबावी लागेल.

 ः डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५,
(लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत.)


इतर वन शेती
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
पारंपरिक बांबू लागवडीचे व्यवस्थापनसहाव्या वर्षानंतर दरवर्षी बांबू बेटातून सरासरी १०...
वनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
बांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
बांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...
बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...
बांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...
वाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...
बांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
अशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
जमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...