विदर्भात बेरारी शेळीचे होतेय संवर्धन

विदर्भातील डोंगराळ भागात काटक अशी बेरारी शेळी आढळते. लोकसहभाग वाढवून या शेळीच्या संवर्धनासाठी व शेळी पालकांच्या संघटनासाठी ‘माफसू’ कडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
विदर्भात बेरारी शेळीचे होतेय संवर्धन
विदर्भात बेरारी शेळीचे होतेय संवर्धन

महाराष्ट्रात आढळणाऱ्या शेळीजातींपैकी बेरारी ही महत्त्वाची जात आहे. विदर्भातील एकूण शेळ्यापैकी १० टक्के शेळ्या बेरारी जातीच्या आहेत. या शेळीची रोगप्रतिकारक शक्ती व उष्ण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता चांगली असल्याने उपलब्ध परिस्थितीत अधिक उत्पादकता देते. ‘माफसू’ नागपूर अंतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पशुअनुवांशिक व प्रजनन शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शैलेंद्र कुरळकर यांनी १० वर्षांपूर्वी विदर्भातील ११ जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन तालुरे, त्या तालुक्यातील दोन गावांची निवड करत गडचिरोली ते बुलडाणा असा भाग पालथा घातला होता. त्यातून डोंगराळ भागात ही वेगळ्या रंगाची शेळी आढळून आली. या संशोधनात जनुकीय अभ्यासही करण्यात आला. बायफ संस्था भंडारा जिल्ह्यात या शेळीच्या वृद्धीसाठी विशेष कार्यक्रम राबवत आहे. अकोल्यात आजही या शेळीवर संशोधनात्मक कार्य सुरू आहे. अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने यांनी या शेळी पालकांचे संघटन करण्यासाठी पुढाकार घेतला. लोकसहभाग वाढवून शेळ्यांचे संवर्धन, संगोपनातून शेळ्यांची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बेरारी शेळी वैशिष्ट्ये 

  • ओळख ः बेरारी शेळीच्या चेहऱ्यावर शिंगापासून नाकपुड्यापर्यंत दोन्ही बाजूंनी फिक्कट ते गडद रंगाची किनार पाहायला मिळते. नर व मादी दोघांतही मानेपासून शेपटीपर्यंत पाठीवरून जाणारा काळापट्टा, तर फक्त नरामध्ये गळ्याभोवती काळ्या रंगाचा गोफ (वर्तुळ) ही बेरारीची ओळखीची मुख्य खूण म्हणावी लागेल.
  • मध्यम आकाराची असून प्रामुख्याने मांसासाठी पाळली जाते.
  • पूर्ण वाढ झालेल्या बेरारी बोकडाचे सरासरी वजन ३६ किलो, तर शेळीचे वजन ३० किलोपर्यंत मिळते.
  • एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे सरासरी वजन २३ किलो तर मादीचे सरासरी वजन २० किलो असते.
  • बेरारी शेळीचे प्रथम वयात येण्याचे वय २९२ दिवस, प्रथम गर्भधारणेचे वय ३१३ दिवस व प्रथम विण्याचे वय ४६० दिवस असते.
  • बेरारी शेळीच्या दोन वेतांतील अंतर २४० दिवस, तर व्याल्यानंतर पुन्हा गाभण राहण्याचा काळ ९१ दिवस असते.
  • प्रजननक्षमतेचा विचार केला असता बेरारी शेळी ही लवकर वयात येते व दोन वर्षांत तिन वेळा विते.
  • करडू (पिले) देण्याचे प्रमाण (अभ्यासानुसार) ः एक करडू वा पिलू देण्याचे प्रमाण ४१.५६ टक्के, जुळे देण्याचे प्रमाण ५६.४५ टक्के, तिळे देण्याचे प्रमाण १.८७, चार पिले देण्याचे प्रमाण ०.१२ टक्का.
  • दूध व उत्पादनक्षमता 

  • प्रति दिन सरासरी दूध उत्पादनक्षमता ५३३ ग्रॅम, तर एका वेतातील दूध उत्पादन ७८ किलो असते.
  • दूध उत्पादनाचा काळ १३३ दिवस व भाकड काळ ११० दिवसांचा असतो.
  • दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण ५.७२ टक्के तर दुधातील स्निग्धविरहीत घन प्रमाण ११.१५ टक्के आहे.
  • प्रतिक्रिया बेरारी शेळी जतन व संवधर्नासाठी प्रयत्न एकंदरीत विदर्भाच्या उष्ण वातावरणात तसेच पूर्व विदर्भातील अतिपावसाच्या भागात तग धरून राहण्याची क्षमता असणाऱ्या बेरारी शेळीस माफसूने राष्ट्रीय पातळीवर शेळीची २३ वी जात म्हणून सन २०१२ मध्ये मान्यता मिळवली. विद्यापीठ बेरारी शेळीचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. -डॉ. आशीष पातूरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर बेरारी शेळी पैदासकारांचे संघटन आवश्यक बेरारी जातीबद्दल विदर्भातील शेळीपालक अजूनही बऱ्यापैकी अनभिज्ञ असून, शेळीपालनासाठी अन्य भागातून शेळ्या आणतात. त्याऐवजी बेरारीचा प्रचार व प्रसार झाल्यास त्यांचा फायदा वाढू शकतो. बेरारी जतन व संवर्धनासाठी बेरारी शेळी पैदासकार संघटना स्थापन करण्याची गरज आहे. त्यातून शासनमान्यता मिळालेल्या या शेळीस लोकमान्यता मिळू शकेल. संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. - डॉ. अनिल भिकाने, सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला दर्जेदार शुद्ध वंशावळ जपण्यासाठी माफसूच्या बोरगावमंजू येथील बेरारी शेळी पैदास प्रक्षेत्रावर शुद्ध वंशावळीच्या बेरारी शेळ्यांचे जतन व संवर्धन केले जाते. प्रक्षेत्रावरून शुद्ध वंशावळीचे ९ ते १२ महिन्याचे २८ ते ३४ किलो वजनाचे बोकड शासकीय दराने शेळी पैदासकाराना उपलब्ध करून दिले जातात. - डॉ. हनुमंत कानडखेडकर, उपसंचालक. बेरारी शेळी संशोधन प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण केंद्र, बोरगाव मंजू, अकोला व्यासपीठ उभे राहील आम्ही बेरारी शेळीपालकांचे संघटन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आत्तापर्यंत गेल्या तीन महिन्यांत दोन ऑनलाइन बैठका घेतल्या. त्या माध्यमातून ५७ ते ५८ बेरारीपालक एकत्र आले आहेत. २१ जणांची समिती नोंदणी करण्याचा प्रयत्न आहे. समितीत प्राधान्याने शेतकरीच मुख्य राहतील. आम्ही फक्त मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावणार आहोत. सध्या प्राथमिक टप्प्यावर काम सुरु आहे. या संघटनेच्या माध्यमातून बेरारी शेळी पालकांसाठी व्यासपीठ उभे राहील अशी माहिती डॉ. अनिल भिकाने यांनी दिली. प्रतिक्रिया मी शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून सुमारे २० बेरारी जातीच्या शेळयांचे पालन करीत आहे. या शेळया अन्य शेळ्यांच्या तुलनेत आजाराळा बळी पडत नाहीत असा माझा अनुभव आहे. शेळीच्या रंगाला चकाकी असल्याने बाजारात चांगला उठाव व दर चांगला मिळतो. माझ्याकडे एक करडू चार किलो वजनाचे मिळाले आहे. दोन-अडीच महिन्यात वजन २२ किलो तर सहा ते सात महिन्यांत ३८ ते ४० किलोपर्यंत वजन मिळते. पैदाशीसाठी ४०० रुपये प्रति किलो दराने विक्री करीत आहे. या शेळीला सुका चारा तीन ते चार किलो व ओला चाराही एवढाच देतो. ४० किलो वजन असलेल्या शेळीला २५० ते ३०० ग्रॅमपर्यंत खुराक देतो. - राजरत्न गुलाबराव वानखेडे, बेरारी पालक, उमरी, अकोला सध्या माझ्याकडे २५ बेरारी शेळ्या आहेत. या शेळीमध्ये जुळे देण्याचे प्रमाण चांगले आढळून आले आहे. आतापर्यंत कुठल्याही रोगराईला ती बळी पडलेली नाही. शिवाय व्यापाऱ्यांकडून मागणी देखील चांगली आहे. - वैभव सुभाष मालोकार, बेरारी पालक, निंबी मालोकार, ता. जि. अकोला

    संपर्क-डॉ. शैलेंद्र कुरळकर-९८२२९२३९९७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com