शेतीपूरक, प्रक्रिया व्यवसायातून साधली प्रगती

शेतीपूरक, प्रक्रिया व्यवसायातून साधली प्रगती
शेतीपूरक, प्रक्रिया व्यवसायातून साधली प्रगती

लातूर जिल्ह्यातील (ता. उदगीर) भागवत केंद्रे या युवकाला अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले असले तरी शेती व शेतीपूरक व्यवसायात भक्कम प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन साध्य केले. उदगीर व लातूर येथे ‘माझा किसान’ नावाने स्वतःच्या ब्रँडअंतर्गत एकाच छताखाली रसवंती, भाजीपाला, फळे, धान्ये, दूध, गूळ, काकवी आदी बाबी उपलब्ध केल्या आहेत. स्वतःच्या शेतीमालासोबतच शेतकऱ्यांनाही योग्य दर व ग्राहकांचे घरपोच शेतीमाल पोचवत आहेत. यातून गावातील ३२ तरुणांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे. भागवत यांना प्रगतिशील शेतीचा वारसा वडील शिवाजी केंद्रे यांच्याकडून मिळाला आहे. मात्र, केवळ उत्पादन घेऊनच न थांबता शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था उभारत भागवत यांनी पुढील पाऊल टाकले आहे. त्यात स्वतःच्या शेतीमालासह गावातील अनेक शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून विक्रीची सोय केली. त्यांच्या उद्योजकतेचा श्रीगणेशा झाला रसवंतीगृहापासून. पुढे भाजीपाला व दूध विक्री सुरू केली. रसवंतीची सुरुवात भागवत केंद्रे यांच्या शेतात २० एकर ऊस लागवड असते. त्यापैकी चार एकर प्रयोग म्हणून नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला. यावर प्रक्रिया व विक्री म्हणून २०१४ मध्ये उदगीर येथील किसान नावाने रसवंतीगृह सुरू केले. नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या चार एकरपैकी तीन एकर ऊस रसवंतीसाठी वापरतात. सेंद्रिय उसापासून व बर्फविरहित चवदार रसामुळे किसान रसवंती लोकप्रिय झाली. मग हुरुप येऊन भागवत यांनी उदगीर येथे पाच व लातूर येथे एक अशी सहा रसवंतीगृहे सुरू केली. सहाही रसवंती गृहांवर ग्राहकांची दिवसभर गर्दी दिसते. रसवंतीचा ताळेबंद (प्रति महिना) ः रसवंतीसाठी को ९१०१० या वाणाच्या उसाची लागवड केली आहे. रोज पहाटे सहा रसवंतीसाठी सात ते आठ क्विंटल उसाची तोडणी करून वाहनाद्वारे सहाही रसवंतीगृहांवर पोचवला जातो. प्रत्येक रसवंतीवर गावातील तिघांना पगारावर नोकरीला ठेवले आहे.

  • वाहन स्वतःचे असून, डिझेलला प्रति माह आठ हजार रुपये खर्च होतो. ड्रायव्हरसह एकजण नोकरीवर आहे.
  • प्रति रसवंती दुकान भाडे व वीज खर्च ः सात हजार रु.
  • दुरुस्ती व देखभाल ः सुमारे ३० हजार रु.
  • ग्राहकांच्या गर्दीनुसार रसवंतीवर दररोज सरासरी दोन ते तीन हजार रुपयांची प्राप्ती.
  • डिसेंबर ते मे असे सहा महिने रसवंती गृह सुरू असते.
  • रसवंती गृहातच सेंद्रिय गूळ व काकवी विक्रीसाठी ठेवतात.
  • भाजीपाला विक्री व्यवसाय ः

  • भागवत केंद्रे यांचे रसवंतीगृह चांगले चालू लागले. त्यांचे उदगीर येथे सोने-चांदी विक्रीचे दुकानही आहे. या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला विक्रीतील व्यथा कानी पडत. कवडीमोल दराने विकावा लागणारा भाजीपाला, त्यातच वाहतूक, आडत, हमालीही शेतकऱ्यांच्या गळ्यात अशी स्थिती. स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतीमाल, भाजीपाला विक्रीच्या व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मांडली. २०१६ मध्ये रसवंतीगृहातच सर्व प्रकारच्या डाळी ठेवू लागले. ऑक्टोबर २०१७ मध्ये उदगीर येथील नांदेड नाका येथे भाजीपाला विक्री दुकान सुरू केले. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने त्याचवर्षी नगर परिषदेजवळ दुसरे भाजीपाला विक्री दुकान सुरू केले.
  • आता ते स्वतःही एक एकर क्षेत्रात वर्षभर नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेतात.
  • सध्या ४० शेतकऱ्यांकडून प्रतिमाह सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत भाजीपाला खरेदी करतात.
  • भाजीपाला विक्रीसाठी दोन दुकानांबरोबरच घरपोच भाजीपाला देण्याची व्यवस्थाही बसवली आहे. उदगीर येथील २९ ग्राहकांना मागणीनुसार घरपोच भाजीपाला पुरवतात. बाजारभावाप्रमाणे चांगल्या प्रतीचा भाजीपाला घरपोच दिल्याने ग्राहकही संतुष्ट आहेत.
  • २०१७ पासून लग्न व अन्य लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी भाजीपाला पुरवठ्याची ऑर्डरही घेतात.
  • भाजीपाला विक्रीचा ताळेबंद ः

  • रसवंतीसाठी ऊस नेतानाच भाजीपालाही उदगीरपर्यंत जात असल्याने वेगळ खर्च होत नाही.
  • भाजीपाला विक्री दोन दुकानांवर पाच तरुण पगारावर ठेवले असून, घरपोच भाजीपाला पुरवण्यासाठी दोन तरुण नेमले आहेत.
  • या व्यवसायासाठी महिन्याकाठी ८० हजार रुपये खर्च येतो.
  • सध्या हा व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवतात. खर्च वजा जाता केवळ आठ ते दहा हजार रुपये शिल्लक राहतात.
  • दूध व्यवसाय रसवंती व भाजीपाला विक्रीबरोबर २०१४ मध्ये चार गाई व तीन म्हशी विकत घेत दूध व्यवसायही सुरू केला. चांगला प्रतिसाद मिळाल्याने आठ देशी गाई व दहा म्हशीपर्यंत जनावरांची संख्या वाढली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात वर्षभर टप्प्याटप्प्याने मका लागवड करतात. २०१८ मध्ये सुसज्ज असा गोठा बांधला. खर्च व उत्पन्न –

  • दररोज दोन वेळचे गाईचे ३० लिटर व म्हशीचे ४० लिटर असे एकूण ७० लिटर दूध निघते.
  • उदगीर येथील २९ घरी भाजीपाल्यासोबत घरपोच दूध पुरवठा करतात.
  • गाईच्या व म्हशीच्या दुधाची ६० रुपये प्रति लिटरप्रमाणे विक्री करतात.
  • खर्च वजा जाता प्रति लिटर दहा रुपये नफा शिल्लक राहतो.
  • ‘माझा किसान’ शेतकरी कंपनी

  • २०१४ मध्ये ‘किसान’ रसवंतीगृहापासून सुरू करून भाजीपाला, धान्य, दूध विक्रीत जम बसवल्यानंतर भागवत यांना पुढील ध्येय खुणावते आहे. गृहिणीला स्वयंपाकात लागणारी प्रत्येक वस्तू एका छताखाली उपलब्ध करून देण्याचे. त्यासाठी २०१८ मध्ये नोंदणीकृत ‘माझा किसान अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी’ सुरू केली.
  • सहा रसवंतीवर प्रत्येकी तीन याप्रमाणे १८ तरुण, दोन भाजीपाला दुकानात पाच तरुण नोकरीवर आहेत.
  • रसवंतीला ऊस तोडणीसाठी तीन, टेम्पोवर दोन व अतिरिक्त चार असे एकूण ३२ तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
  • मूल्यवर्धन

  • भागवत केंद्रे यांच्याकडे ४५ एकर शेती असून, त्यापैकी २० एकरमध्ये ऊस लागवड असते. त्यातील १६ एकरमधील उसापासून गूळ तयार करतात. तसेच उर्वरित चार एकर ऊस पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने घेतात. त्यातील तीन एकर ऊस हा रसवंतीसाठी ठेवतात. एक एकरवरील उसाचे गाळप करून सेंद्रिय पाक व गूळ यांची विक्री केली जाते.
  • स्वतःच्या शेतातील मूग, तूरडाळ, हरभराडाळ गावातील डाळ मशिनवर भरडून घेतात. उदगीर येथील मॉलमधून पॅकिंग करून विक्री करतात. शेतीमालाच्या मूल्यवर्धनामुळे नफ्यात वाढ होते.
  • आपल्याकडील विविध उत्पादने आणि सेवांची माहिती सातत्याने सामाजिक माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोचवत असतात. त्यातून त्यांच्याशी अनेक ग्राहक व शेतकरी जोडले गेले असल्याचे भागवत सांगतात.
  • उदगीर येथील बाजारपेठ सोमवारी बंद असते. त्यामुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेत शेतातील नियोजनासह शेतकऱ्यांची बैठक घेतात. प्रति दिन घेतलेल्या भाजीपाल्यांचे दरानुसार दर सोमवारी शेतकऱ्यांचा हिशेब चुकता केला जातो. या बैठकीमध्ये उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात.
  • कुटुंबाची मदत महत्त्वाची भागवत सांगतात, माझे वडील शिवाजी केंद्रे यांनी शेतीत खूप कष्ट घेत आम्हा चौघा भाऊ बहिणींना शिकवले. स्वतःच्या पायावर उभे केले. अभियांत्रिकी सोडून रसवंती सुरू करण्याच्या कल्पनेतही माझ्या पाठीशी राहिले. मी विक्रीसाठी नियोजन करत असताना त्या त्या बाबी शेतात पिकवण्याची जबाबदारी घेतली. गावातील शेतकऱ्यांनाही विश्वासात घेत माझ्या व्यवसायवाढीसाठी सतत मदत केली. मोठे बंधू बालाजी हे ठाणे येथे शिक्षक असून, त्यांचीही विविध प्रकारे मदत होते. इथे मिळेल ताजा रस व भाजीपाला

  • रसवंती – उदगीर येथे नांदेड नाका, नगर परिषदेच्या बाजूस एसआर टॉवरजवळ, जय जवान चौक, हनुमान कट्टा रोड व नाईक चौक. लातूर येथे गूळ मार्केट लाइनला अशी एकूण सहा रसवंती गृहे.
  • भाजीपाला – उदगीर येथे नांदेड नाका व नगर परिषदेच्या बाजूस अशी दोन दुकाने.
  • यशाची सूत्रे –

  • वाहतूक व अडतीवरील खर्चात बचत होत असल्याने शेतकरी जोडले जात आहेत.
  • गावातील विश्वासू तरुणांची व्यवसायात केली निवड.
  • चांगल्या प्रतीचा व ताजा भाजीपाला विक्री यामुळे ग्राहकांची पसंती.
  • शेतीमालाच्या मूल्यवर्धनामुळे अधिक नफा मिळतो.
  • जिल्हा परिषद शाळेचे रुपडे बदलले आपल्या गावातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी २०१८ मध्ये गावातील जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग साहित्य, प्रोजेक्टर, आरओ शुद्धीकरण, शाळेची रंगरंगोटी व शैक्षणिक सॉफ्टवेअर अशा सुविधा उपलब्ध केल्या. यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. मात्र, त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे कुमठा खुर्दसारख्या खेडेगावातही चिमुकल्यांना एखाद्या प्रगत शाळेप्रमाणे शिक्षण मिळत आहे.

    पाच वर्षापासून रसवंती आणि साधारण दोन वर्षापासून भाजीपाला विक्रीमध्ये चांगला जम बसला आहे. सध्या मी केवळ ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर भाजीपाला विक्री सुरू असून, अधिक ग्राहकापर्यंत पोचण्याचे ध्येय ठेवले आहे. ‘माझा किसान’ कंपनीच्या माध्यमातून उदगीर येथील एक हजार ग्राहकांना घरपोच दूध, भाजीपाला, फळे, धान्य पोचण्याचे लक्ष्य आहे. यातून १०० बेरोजगारांना काम, ५० शेतकरी व महिला बचत गटांना काम पुरवण्याचे ठरवले आहे. - भागवत केंद्रे, ९९६०१३४६६६ - बालाजी केंद्रे (बंधू), ९८५०३०८८९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com