वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य सांभाळा

मुक्त संचार गोठ्यात जनावरांना सावली करावी.
मुक्त संचार गोठ्यात जनावरांना सावली करावी.

सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व आर्द्रता आहे. यामुळे गाई, म्हशींमध्ये चारा, पशुआहाराचे सेवन कमी होते. परिणामी, दूध उत्पादनात घट होते. गर्भधारणेवर परिणाम होतो. ही लक्षणे तपासून पशूतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात.

दुधाळ जनावरे वातावरणातील बदलाला अतिशय संवेदनशील असून, त्याचा परिणाम म्हणजे दुधाचे उत्पादन कमी होते, जनावरांची प्रजनन क्षमता कमी होते. आपल्या वातावरणात दूध उत्पादनासाठी उच्च उत्पादन क्षमतेच्या दुधाळ जनावरांसाठी साधारणतः २७ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व आर्द्रता असते. यामुळे जनावरांमध्ये चारा पशुआहाराचे सेवन कमी होते. परिणामी, दूध उत्पादनात घट होते. उष्णता तणावामुळे हे प्रमाण २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तसेच, गर्भधारणेच्या दरामध्ये १० ते २० टक्के घट येऊ शकते. वातावरणातील तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्याच्या किरणांचे विकरण याचा परिणाम जनावरांच्यावर होतो.

उपाययोजना

  •     उष्णता तणाव कमी करण्यासाठी प्रथमतः गोठ्याची जागा व त्याचे बांधकाम याचे अचूक नियोजन करावे. गोठ्याच्या शेडची उंची मध्यभागी अंदाजे १२ ते १५ फूट आणि बाजूने १० फूट असावी.
  •     शेडची लांबी पूर्व - पश्‍चिम असावी म्हणजे गोठ्यात थेट सूर्यप्रकाश येत नाही. परिणामतः गोठ्यातील तापमान कमी राहण्यास मदत होते.
  •     गोठ्याचे बांधकाम चालू असताना किंवा शक्‍य नसल्यास त्यानंतर लवकर वाढणारी गडद दाट
  • सावली देणारी झाडे गोठ्याच्या आजूबाजूला लावावीत. यामुळे गरम हवेचे झोत गोठ्यात येण्यास अडथळा निर्माण होतो. गार हवा गोठ्यात पसरते.
  •     मुक्तसंचार गोठा पद्धतीत एखादे झाड शेडच्या मध्यभागी असल्यास जनावरे त्याखाली सावलीत थांबतात. हा सगळ्यात परिणामकारक व स्वस्त उपाय आहे.
  •     गोठ्याच्या कडेला पोते बांधून त्यावर दुपारी पाण्याचे फवारे मारावेत. यामुळे  गोठ्यात गारवा तयार होतो.
  •     दुधातील जनावरे शक्‍य असल्यास दुपारी ऐन उन्हाच्या वेळी धुवावीत किंवा गोठ्यातील फरशीवर पाणी मारावे.
  •     गोठ्यात स्प्रिंकलर्स, फॉगर्स किंवा मिस्टर्स  बसवावेत. यामुळे पाण्याची बचत होते. गोठ्यातील तापमानात ४ ते ५ अंश सेल्सिअस फरक पडतो. यांच्या वेळा आपल्या सोयीनुसार आपण ठरवू शकतो. यामध्ये फक्त एकच काळजी घ्यावी लागते ती म्हणजे गोठ्यातील आर्द्रता वाढू नये अन्यथा बाकीचे दुष्परिणाम दिसतात.
  • सापेक्ष आर्द्रतासाठी उपाय

  •     उष्णता तणावामध्ये सापेक्ष आर्द्रता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उष्णता तणाव किंवा तापमान आर्द्रता सूचकांक यालाच आपण ‘टेंम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्‍स' असे म्हणतो.
  •     उच्च वातावरणीय तापमानात दुधाळ जनावरे त्यांची बरीचशी ऊर्जा तोंड उघडे ठेवून श्‍वासोच्छ्वास घेण्यात खर्च करतात. ही प्रक्रिया जर दिवसभरात जास्त तास सुरू राहिल्यास दूध उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. हा दोष किंवा ही अवस्था संकरित जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
  •     गरम व आर्द्र वातावरण दुधाचे उत्पादन, तसेच गुणवत्तेवर परिणाम करते. यामध्ये दुधाचे फॅट, एसएनएफ व दुधातील प्रथिने (मिल्क प्रोटिन) हे घटक वाढीव आर्द्रतेला कमी होतात.
  •     गोठ्यातील जास्त आर्द्रतेमुळे जनावरांमध्ये कासदाह निर्माण करणाऱ्या परजिवी जिवाणूंची संख्या वाढते. वासरांमध्ये न्यूमोनिया व जुलाबाचे प्रमाण वाढते.
  •     गोठ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी थंड हवेचे झोत गोठ्यात येणे गरजेचे असते. तसेच गोठ्यात गार हवेचा स्रोत ठेवण्यासाठी जागोजागी छतावर किंवा भिंतीवर पंखे बसवावेत.
  •     उष्णता तणाव व आर्द्रता कमी करण्यासाठी ठराविक वेळेस व ठराविक काळासाठी पंखे किंवा ब्लोअर्स चालू ठेवावेत. पंख्यामुळे दोन्ही म्हणजेच कोरडी आणि ओली आर्द्रता कमी होऊ शकते.
  • पाण्याचे नियोजन

  •  वाढत्या बाहेरील तापमानासह दुधाळ जनावरांच्या शरीराचे तापमानदेखील वाढते. परिणामी, श्‍वसन दर व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. चांगल्या दुधाळ जनावरांसाठी पुरेसा व योग्य पाणीपुरवठा आवश्‍यक आहे.
  •  पाणी ८० टक्के रक्त तयार करते, तसेच शरीराचे तापमान नियंत्रित करते. पोषक घटकांचे शोषण, तसेच शरीरातील चयापचयाचा कचरा शरीराबाहेर टाकण्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वातावरणाचे तापमान, जनावरांचे उत्पादन, सापेक्ष आर्द्रता, जनावरांचे वय आणि वजन यावर पाण्याची गरज अवलंबून असते.
  •  पर्यावरण व व्यवस्थापन घटकांमुळे पाण्याच्या सेवनावर परिणाम होऊ शकतो. पाण्याचे तापमान, खारटपणा, स्वाद आणि गंध हे अशुद्धता निर्माण करणारे घटक प्रभाव पाडतात. जनावरांच्या आहारावरसुद्धा पाण्याचे प्रमाण अवलंबून असते.
  •  दुधामध्ये साधारणतः ८५ ते ८७ टक्के पाणी असते. तसेच दुधाची गुणवत्ता ठरविण्यासाठी पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. साधारणतः एका प्रौढ व उत्पादनक्षय गाईची किंवा म्हशीची रोजची पाण्याची गरज ही ७० ते ८० लिटर असू शकते. जनावरास दिवसातून शक्‍यतो चार वेळेस व कमीत कमी तीन वेळेस पिण्याचे स्वच्छ पाणी द्यावे.
  • उन्हाळ्यातील आहार

  •     उष्णता तणावामुळे दुधाळ जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. चयापचयामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात तयार होते, त्यामुळे जनावरांच्या आहारात लक्षणीय घट होते. याचा दुष्परिणाम जनावरांच्या उत्पादन व पुनरुत्पादन क्षमतेवर होतो.
  •     वातावरणातील तापमानवाढीचा हायपोथॅलेमस या ग्रंथीवर थेट नकारात्मक परिणाम होतो. जनावरांचे आहार घेण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे उच्च तापमान क्षमतेची दुधाळ जनावरे नकारात्मक ऊर्जा संतुलन (निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्स) या स्थितीमध्ये जातात. परिणामी शरीराचे वजन घटते. जनावरांची रोग प्रतिकारक क्षमता घटून जनावरे इतर आजारांना बळी पडतात.
  •     शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे श्‍वसनाचा दर वाढून शरीरात कार्बनडाय ऑक्‍साईड  वायूचे प्रमाण वाढते. दीर्घकाळ ही स्थिती राहिल्यास रुमिनल ऍसिडोसीस होतो. अशा तणावग्रस्त जनावरांमध्ये कॉर्टिसॉल या संप्रेरकाची पातळी वाढते.
  •     पर्यावरणीय तणावापासून संरक्षण आणि सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीच्या प्राथमिक निर्देशकांत पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, हिमोग्लोबीन, पीसीव्ही, रक्तातील साखर आणि रक्तातील प्रथिने यांच्यात बदल होतो, म्हणूनच उष्ण आर्द्र भागात जनावरांची आरोग्य तपासण्यासाठी रक्त घटकांचे नियमित तपासणी करावी.
  •     दुष्परिणाम टाळण्यासाठी सकस, प्रमाणित व संतुलित हिरवा चारा द्यावा. तसेच, आहार व्यवस्थापन व आवश्‍यक बदल करू लागणाऱ्या सर्व अन्नघटकांचा पुरवठा करणे आवश्‍यक असते. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शुष्क घटकांचे सेवन, उच्च प्रतीची प्रथिने, जीवनसत्वे व योग्य खनिज मिश्रणांचा समावेश करावा.
  • -  डॉ. हेमंत कदम, ९४२२४००२५५ (बाएफ, उरुळी कांचन,जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com