नत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...

नत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...
नत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...

गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या पुस्तकांच्या आधारे भू सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख करून घेत आहे. मागील भागामध्ये आपण सूक्ष्मजीवांसाठी परिस्थितिकी, कर्बचक्र आणि हायड्रोकार्बन हा भाग पाहिला. या वेळी नत्र चक्राच्या अभ्यासातून काय फायदे होतील, याविषयी माहिती घेऊ. ज्या प्रमाणात वातावरणामध्ये दररोज इथिलिन मिसळला जातो, त्या प्रमाणामध्ये त्याची हवेतील टक्केवारी वाढत नाही. कारण, जमिनीद्वारे होणारे मोठ्या प्रमाणातील इथिलिनचे शोषण. प्राणवायूच्या उपस्थितीत सूक्ष्मजीवांकडून जमिनीतील इथिलीनचे विघटन केले जाते. एखाद्या ठिकाणी नैसर्गिक वायूची गळती झाल्यास तेथील हवा प्रदूषित होते. नैसर्गिक वायूत मिथेनचे प्रमाण जास्त, तर इथेन व इतर काही ज्वलनशील पदार्थ कमी प्रमाणात असतात. त्यांचे सूक्ष्मजीवाकडून विघटन होण्याची क्रिया सुरू असताना प्राणवायू वापरला जातो. परिणामी त्या भागातील प्राणवायूची टक्केवारी कमी होते. त्याचा तेथील वनस्पतीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. कर्ब चक्राच्या माहितीतून पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असे अनेक पूर्णपणे नवीन संदर्भ भेटतात. नत्रचक्र या पुस्तकात नत्रचक्र एकूण ८० पानांत मांडले आहे. नत्र हा शेतीत पिकाचे अन्नद्रव्य म्हणून सर्वात महत्त्वाचा घटक. प्रथिनातील हा एक प्रमुख घटक असून, त्यावर वनस्पती, सूक्ष्मजीव व प्राणी गटाचे अस्तित्व अवलंबून असते. पिकांसाठी दिलेल्या नत्राची मोठा भाग वातावरणामध्ये उडून किंवा निचरा होऊन त्यांचा ऱ्हास होतो. शेतकऱ्याने खर्च करून टाकलेले नत्र पिकांसाठी योग्य प्रकारे वापरले जावे यासाठी नत्राचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. या प्रक्रियेवर सूक्ष्मजीवांचे नियंत्रण असते. नत्रखताच्या कार्यक्षम वापरासाठी नत्र चक्राचा अभ्यास प्रत्येक शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. सेंद्रिय अगर रासायनिक कोणतेही नत्र खत जमिनीत गेल्यानंतर त्यात अनेक स्थित्यंतरे होतात. आजच्या सर्व खत शिफारशी या हेक्टरी किती किलो किंवा पोती टाकायची, इथेच अडकल्या आहेत. खत टाकल्यानंतर पुढे त्याचे जमिनीत काय होते, पिकापर्यंत ती कशी पोचतात, यावर कोणी बोलत नाही. शास्त्रज्ञ मंडळी फक्त स्फुरदाच्या स्थिरीकरणासंबंधी बोलतात. इतर अन्नघटकाच्या स्थिरीकरणाबाबत काहीच सांगत नाहीत. फक्त भू-सुक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासातून याचा उलगडा होतो. या पुस्तकात त्यासाठी एकूण पाच उपप्रकरणे आहेत. ती अशी ः १) स्थिरीकरण व उपलब्धीकरण २) नत्रीकरण (नायट्रीफिकेशन) ३) नत्रवायूत रूपांतर (डी नायट्रीफिकेशन) ४) असहजीवी नत्र स्थिरीकरण ५) सहजीवी नत्र स्थिरीकरण नत्र स्थिरीकरण, उपलब्धीकरणा या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेविषयी विस्तृत माहिती दिली आहे. स्थिरीकरण म्हणजे पाण्यात न विरघळणारे तर उपलब्धीकरण म्हणजे पाण्यात विरघळणारे स्वरूप होय. पुस्तकातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे...

  • जमिनीत सेंद्रिय स्वरूपात दिलेला नत्र दीर्घकाळ टिकून राहू शकतो. एका हंगामी पिकाचे काळात त्यातील फार थोड्या भागाचे उपलब्ध नत्रात रूपांतर होते. (यातून शेतकऱ्यांनी काय शिकावे? - आपल्या जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी त्यात स्थिर स्वरूपातील मोठा साठा करून ठेवला पाहिजे.)
  • जमिनीमध्ये नत्राची उपलब्धता व कर्बवायूची निर्मिती या समांतर चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. (स्थिर नत्र म्हणजे कर्बाला जोडलेला नत्र. त्याचे उपलब्ध नत्रात रूपांतर करणे म्हणजे त्याचा कर्बाशी असणारा बंध तोडणे. सूक्ष्मजीवांकडून ही प्रक्रिया होत असताना कर्बवायू बाहेर पडतो.)
  • वाढणाऱ्या वनस्पतीच्या गरजेनुसारच उपलब्ध नत्रात रूपांतरणाची प्रक्रिया सुरू असते.
  • नत्र उपलब्धतेच्या वेगाचे प्रमाण आर्द्रता, सामू, प्राणवायूचे प्रमाण, तापमान, सेंद्रिय नत्राचे प्रमाण यावर अवलंबून असते. (यातील अनेक घटकांचे संतुलन करणे आपल्याला शक्य होऊ शकते. यावर आपण कधी विचार करत नाही. कारण, आपल्याला केवळ किती पोती खत टाकायचे इतकेच सांगितले जाते.)
  • चिबड जमिनीत हवेची उपलब्धता कमी असल्याने सुक्ष्मजीवाचे कामही कमी होते. परिणामी, नत्राची उपलब्धता कमी राहते.
  • जमीन ओलावणे - वाळणे असे चक्र सातत्याने चालल्यास नत्राची उपलब्धता जास्त राहते. ५० ते ७५% ओलाव्यात उपलब्धता चांगली असते. दीर्घकाळ जमीन तापल्यानंतर पहिल्या ओलाव्यात उपलब्धता जास्त, पुढील चक्रात कमी कमी होत जाते. (याचा अनुभव शेतकरी नेहमी घेत असतात.)
  • आम्लयुक्त जमिनीत उपलब्धता कमी असते. (येथे चुन्याचा वापर केल्यास उपलब्धता वाढते.) (यासाठी सुपर फॉस्फेट या खतातून स्फुरद दिल्यास चुनाही मिळतो. हे कोकणसाठी महत्त्वाचे.)
  • यापुढील भागात युरिया खताच्या वाटचालीची माहिती मिळते. आज युरिया खताचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तो टाकल्यानंतर पाणी दिले, की पाण्यात विरघळून पिकाला मिळतो, इतकेच शेतकऱ्यांना माहीत आहे.
  • युरिया पाण्यात विरघळल्यानंतर त्याचे रूपांतर अमोनियम किंवा अमोनिया अशा स्वरूपात होते. अमोनियमचे पुढे अमोनियम कार्बानेटमध्ये रूपांतर होते. यासाठी युरिएज या संप्रेरकाचा उपयोग केला जातो. युरिएज हे संप्रेरक जमिनीत अनेक जाती-प्रजातींचे जीवाणू तयार करू शकतात. (यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाची गरज असते, इतके किमान शेतकरी बंधूंनी शिकावे.)
  • अमोनियाची वाटचाल पुढे नत्र वायूत होऊन तो हवेत उडून जातो. अशा प्रकारे टाकलेल्या नत्रखताचा ऱ्हास १० टक्क्यांपासून ७० टक्क्यांपर्यंत होऊ शकतो. हा ऱ्हास होऊ नये किंवा कमीत कमी राहावा, यासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो.)
  • सुक्ष्मजीव अगर सेंद्रिय कर्ब नत्राचे उत्पादन करू शकत नाहीत. अनुकूल परिस्थितीत संवर्धन करू शकतात.
  • नत्रयुक्त खतातील नत्राचे संवर्धन करण्यास शेतकरी शिकल्यास नत्र खतावरील खर्चात मोठी बचत करता येईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com