निवड दुधाळ गाई, म्हशींची...

निवड दुधाळ गाई, म्हशींची...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...

दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना त्याची शारीरिक स्थिती, दूध उत्पादन क्षमता, वय, वेत, वंशावळ, आरोग्य, लसीकरणाचा तपशील या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. दुधासाठी विकत घेतल्या जाणाऱ्या गाई, म्हशी तिसऱ्या वेतातील असाव्यात. कारण ४ ते ६ वेतात दूध उत्पादन सर्वाधिक असते. दुग्ध व्यवसायासाठी बाजारातून जनावर विकत घेताना अनेक गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यातील महत्त्वाच्या बाबी म्हणजे पशुपालकाची गरज, आर्थिक क्षमता, पाणी व हिरव्या चाऱ्याची उपलब्धता. या सगळ्यांना अनुसरून पशुपालकाला नफा देऊ शकेल, अशी जात निवडावी. फक्त दूध उत्पादन हा पशुपालकाचा हेतू असल्यास म्हैसपालन करणे उत्तम ठरते. शेती ओढ कामाकरिता गायींच्या जाती जसे खिल्लार व लाल कंधारी प्रजातींची निवड करावी. महाराष्ट्रातील दुधाळ जातीमध्ये देवणी, डांगी आणि गवळाऊचा समावेश होतो. या देशी गाईंचे दूध उत्पादन ५०० ते १००० लिटर प्रति वेत असले तरी औषध उपचार व चारा-पाण्यावर होणारा खर्च अत्यंत अल्प आहे. आणि नर जनावर शेतीच्या कामांसाठी उपयुक्त ठरते. दुधाळ जनावरांची निवड ः १) जनावर अंध असू नये, डोळे पाणीदार व तजेल असावेत. मझल ओलसर असावे. जीभ कोरडी असू नये. कायमस्वरूपी पांगळेपणा असलेली जनावरे अपात्र ठरतात. २) पाठीचा कणा वाकलेला असू नये. जनावरांची पहिली बरगडी दिसणे स्वाभाविक असले तरी तिसऱ्या बरगडीपर्यंत दिसणारी जनावरे अशक्त या प्रकारात मोडतात. ३) गायीच्या पोटाचा तसेच छातीचा भाग लांब, खोल, आणि रुंद असावा. उत्तम खाद्य पचवण्याची क्षमता असलेल्या जनावरांची निवड करावी. कास आणि सडाची तपासणी करावी. कासेची खोली माफक व क्षमता पुरेशी असावी. सड कासेच्या प्रत्येक चतुर्थांशी प्रमाणबद्ध असावेत. काटकोनात स्थित असावेत. मागील कास रुंद, ऊंच व घट्टपणे शरीराशी संलग्न असावी, किंचित वर्तुळाकार पद्धतीने मुळास जोडलेली असावी. कासेचे विभाजन पुरेशा प्रमाणात संतुलित असावे. पुढची कास घट्टपणे संलग्न असून, त्याची लांबी मध्यम आणि क्षमता पुरेशी असावी. सड दंडगोलाकार, एकसमान आकाराचे व मध्यम लांबी आणि व्यास असावा. कासेस चार व्यतिरिक्त अधिक सड असू नये. सडातून हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी प्रशस्त आणि फुगीर असावी. ४) जनावरांच्या दातांची पाहणी करून वयाची खात्री करता येते. या वयातील जनावरे चार दाती असतात. जनावरामध्ये गर्भपाताच्या घटनेचे प्रमाण तसेच कासदाह आजाराचा प्रादुर्भाव कधी झाला होता का याची माहिती घ्यावी. चारही सड पिळून पहाणे उत्तम. यामुळे सडनलिका बंद नाही याची खात्री होते. ५) अनेक आजारांचे जनावरांच्या बाह्य लक्षणांवरून निदान केले जाऊ शकते. जसे की डोळ्यातून अथवा नाकातून स्राव येणे हे जनावर आजारी असल्याचे लक्षण आहे. तसेच योनीमार्ग अथवा गुद्द्वारातून रक्त किंवा अस्वाभाविक स्राव येणे योनीचे आजार असल्याचे लक्षण आहे. आजारी जनावर सुस्त, मलूल व अशक्त झालेले असते. काही आजारात बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत. जसे ब्रुसेल्लोसिस आजार असलेले जनावर प्रथम दर्शनी तंदुरुस्त दिसत असले तरी या जनावरांमध्ये गर्भपाताच्या घटना आढळून येतात. आजारापासून वाचण्यासाठी जनावरांचे नियमित लसीकरण केले जाते का, याची चौकशी करावी व तसे पशुवैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याचा आग्रह धरावा. ६) आपल्याकडे होल्स्टिन संकरित आणि जर्सी संकरित गाई दिसतात. होल्स्टिन गाईंचे दुधाचे अधिक प्रमाण आहे. तर जर्सी संकरित गाईंच्या दुधात स्निंग्धता अधिक असते. गरजेप्रमाणे जर्सी किंवा होल्स्टिन गाईची निवड करावी. संकरित गाई घेताना पाणी व चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेता विदेशी रक्ताचे प्रमाण ६२.५० टक्के पेक्षा अधिक असू नये. जर्सी संकरित गाई डोंगराळ भागात संगोपनासाठी चांगल्या आहेत. पठारी भागात होल्स्टिन संकरित गाईंचे संगोपन करावे. दूध उत्पादन तपासा १) जनावराच्या आईचे दूध उत्पादन किती होते? स्वतः जनावराचे सरासरी उत्पादन किती आहे? जनावर कुठून घेतले होते? किती वेत झाली आहेत? याची चौकशी करावी. जनावरांचे नियमित लसीकरण करण्यात आले आहे का? याचीही खात्री करावी. २) दुधासाठी विकत घेतल्या जाणाऱ्या गाई, म्हशी तिसऱ्या वेतातील असाव्यात. कारण ४ ते ६ वेतात दूध उत्पादन सर्वाधिक असते. जनावराच्या वेताची किंवा वयाची माहिती नसल्यास किंबहुना खात्री करून घ्यावयाची असल्यास, तिसऱ्या वेतातील गाय ५ ते ६ वर्षांची असायला हवी. संपर्क ः डॉ. प्राजक्ता जाधव, ९८१९६६४७५१ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com