कर्नाटकात कोरडवाहू अल्पभूधारकांवर लक्ष केंद्रित

वातावरण बदलाविरुद्ध लढा देण्यासाठी कर्नाटक राज्याने सर्वांत प्रथम अल्पभूधारक शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांना ऊस, कापूस, तंबाखू या पिकांपासून दूर करण्यासाठी भरभक्कम अनुदान देत पारंपरिक ज्वारी, नाचणी आणि भात शेतीसाठी प्रोत्साहित केले.
कर्नाटकात कोरडवाहू अल्पभूधारकांवर लक्ष केंद्रित
कर्नाटकात कोरडवाहू अल्पभूधारकांवर लक्ष केंद्रित

वातावरण बदलामध्ये कर्नाटकने अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या लाखो शेतकऱ्यांना औद्योगिक समूहांच्या सामाजिक जबाबदारी फंड (सीएसआर) अंतर्गत शासनाच्या हमीवर संपूर्णपणे कर्जमुक्त केले. शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शासनाने स्वीकारली. यामुळे चिंतामुक्त झालेल्या लाखो शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर भाजीपाला, फळबाग उत्पादन, औषधी वनस्पती, वृक्ष लागवड अशी आव्हाने स्वीकारली. यात राज्याच्या कृषी विभाग, फलोद्यान विभाग, कृषी विद्यापीठे, श्री श्री रविशंकर संस्था, डॉ. स्वामिनाथन संशोधन संस्था आणि कृषी प्रयोग परिवार अशा समाजसेवी संस्थांचा मोलाचा वाटा आहे. वातावरण बदलामध्ये सर्वांत जास्त नुकसान समुद्र किनाऱ्यालगतच्या भातशेती, सुपारी, नारळ, फणस, काजू, पेपर आणि रबर बागांचे झाले होते. समुद्राची पातळी वाढत आहे. भरतीच्या उंच लाटा आता भात शेतीत शिरत आहेत. शेतकरी म्हणतात, पूर्वी आम्ही वर्षामधून तीन वेळा भात पीक घेत होतो, आज एक पीकसुद्धा घेता येत नाही. जमिनीत मिठाचे प्रमाण खूप वाढले आहे. समुद्र किनाऱ्यालगतची हजारो एकर जमीन भात शेतीकडून नापिकतेकडे वाटचाल करत आहे. येथील शेतकरी शेती करण्याऐवजी दूरवरच्या गावामध्ये शेतमजुरीकडे जात आहेत. काही लोक ‘मनरेगा’मध्ये १०० दिवस काम करतात. त्यातून पैसे साठवत फळबागांची काळजी घेतात. डॉ. स्वामिनाथन संशोधन संस्थेने आता या शेतकऱ्यांना ‘कागा’ हे समुद्री पाण्यावर वाढणारे भाताचे नवीन वाण दिले. त्याचे प्रयोग यशस्वी होत आहेत. संस्थेने स्थानिक शेतकऱ्यांकडून कागाचे वेगवेगळे वाण गोळा करून, त्याची स्वतंत्र बँक तयार केली आहे. शेतकऱ्याचा शेतमजूर होणे म्हणजे ‘रावाचा रंक’ होणे. हेच टाळण्यासाठी संस्था कर्नाटक, तमिळनाडूच्या किनाऱ्यावरील भातशेतीकडे लक्ष देत आहे. कर्नाटकामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या अल्पभूधारकांच्या आहेत. त्यास कारणीभूत ठरत आहे रासायनिक शेती, भूगर्भातील पाण्याचा उपसा, फेल गेलेल्या विंधन विहिरी आणि डोक्यावरचे वाढत जाणारे कर्ज. शासनाच्या कृषी विभागाने या अल्पभूधारकांना निसर्ग शेतीचे महत्त्व पटवून देत, १०० टक्के अनुदान देत निसर्ग शेती, सेंद्रिय शेतीकडे वळवले. २०११ च्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी २०० कोटी राखून ठेवले. त्याचबरोबर भारत सरकारच्या सन २००० च्या सेंद्रिय शेती राष्ट्रीय कार्यक्रमाचा पूर्ण फायदा घेतला. राज्याचे सेंद्रिय धोरण यशस्वी करण्यासाठी कृषी प्रयोग परिवार’ या सेंद्रिय शेती प्रसारक संस्थेवर जबाबदारी दिली. १ फेब्रुवारी, २००४ ला तो अहवाल स्वीकारून मंजूर केला. या अहवालात पारंपरिक बी बियाणे, सेंद्रिय शेती, एकत्रित पीक पद्धती, बायोमास, जैवविविधता, जमीन, जलसंधारण याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. राज्याने २००८ मध्ये सेंद्रिय शेतीचे धोरण स्वीकारत सुरुवातीस ९० हजार शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देत सामील केले. यामुळे या राज्यात सेंद्रिय शेतीची चळवळ जोमात आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही भविष्यामधील वातावरण बदलाच्या फटक्यापासून वाचण्यासाठी सेंद्रिय शेतीस पर्याय नसल्याचे समजू लागले आहे. कर्नाटकमधील लागवडीखाली असलेल्या ६५ टक्के जमिनीपैकी ७४ टक्के जमीन ही दक्षिण पश्‍चिम मॉन्सूनवर अवलंबून आहे, तर उरलेली २६ टक्के सिंचनाखाली आहे. या जमिनीवर ऊस, भात ही प्रमुख पिके. कृषी व फलोद्यान विभागाने मॉन्सून अतिसंवेदनशील अशा ७४ टक्के भूभाग आणि तब्बल ८० लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. आज कर्नाटक राज्यातून देशांच्या एकूण उत्पादनाच्या १२ टक्के फळे आणि ८ टक्के भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. याच भागात लहान लहान लाखो हरितगृहामधून फुलांचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटक हे देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे फूल उत्पादक राज्य आहे. फलोद्यान विभागाच्या प्रयत्नातून अल्पभूधारकांच्या १५.२१ लाख हेक्टरमधून प्रति वर्ष १०० लाख टन फळांचे उत्पादन मिळत आहे. या राज्यातून ८ हजार कोटी रुपयांवर फळ उत्पादनाची निर्यात होते. २०१५ या एकाच वर्षात याच पट्ट्यामध्ये ८०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या, यावर आज कुणी विश्‍वाससुद्धा ठेवणार नाही. उत्पादन वाढले पण विक्रीसाठी काय करायचे हा प्रश्‍न इथेही निर्माण झाला असता, पण फलोद्यान विभागाच्या पुढाकाराने आणि हमीमुळे अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण झाल्या असून, त्याचे उत्पादन प्रतिष्ठित उद्योग समूह जागेवर खरेदी करतात. ‘कोलार’च्या खाणी परिसरात हजारो हेक्टर नापिक बनलेल्या जमिनीवर शेतकरी कष्टाने टोमॅटो पिकवून कोलकत्यापर्यंत विकले जात आहेत. लाल टोमॅटोचा कोलार ते कोलकत्ता हा प्रवास अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणादायक ठरत आहे. पावसाच्या अपेक्षेने कायम आभाळाकडे डोळे लावून बसणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांना पडणाऱ्या पावसाला तिथेच मुरवण्याचे तंत्र, सेंद्रिय शेती शिकवण्यात आली. याच दुष्काळी भागातील एक शेतकरी उत्पादक कंपनी ४० हजार हेक्टरवर बटाटा उत्पादन घेते. एका खासगी कंपनीला विकते. शास्त्रज्ञ म्हणतात, की वातावरण बदलामध्ये वाढत्या कर्ब वायूला रोखण्यासाठी मका, बटाटा हीच पिके भविष्यात महत्त्वाची ठरणार आहेत. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीनुसार बटाट्याचे भरघोस उत्पादन त्याची खात्री पटवत आहे. भाज्या व फळांच्या खरेदीमध्ये आज हिंदुस्थान यूनिलिव्हर, पेप्सी, रिलायन्स, टाटा या सारखी बडी नावे आहेत. विजापूर या दुष्काळी जिल्ह्यामधील लिंबू बिहारमधील पाटणा शहरात जाते. तिथे अनेक उद्योग समूहांचे वातानुकूलित गोदामे आहेत. फळशेतीमध्ये २५ टक्के फळे खराब होतात. मात्र या राज्यात खाली पडलेल्या आणि करारामध्ये समाविष्ट नसलेल्या फळांचीही खरेदी व्यवस्था फळ उत्पादन विभागाकडून उभारली आहे. शेतकऱ्यांची ही सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी एकट्या बंगळूर शहरात ४९ विक्री केंद्रे असून, माल हातोहात संपतोसुद्धा. शाश्‍वत हरितक्रांतीसाठी... कर्नाटकामधील ३१ जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यातील किमान एक गाव सेंद्रिय शेतीचे प्रारूप म्हणून पूर्ण सेंद्रिय करण्यात आले. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांमध्ये श्री श्री रविशंकर या संस्थेचा उल्लेख केलाच पाहिजे. या संस्थेने २००७ पासून शेतकऱ्यांना लक्ष्मीतरुची ५ लाखांवर झाडे दिली. वातावरणबदलांमध्ये एखाद्या कल्पतरूप्रमाणे उपयुक्त ठरणारे हे झाड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर, डोंगर उतार, दुष्काळी भागात वेगाने वाढते. त्यापासून लाकडे, खाद्यतेल, औषधे, इथेनॉल- बायोडिझेल, पेंड, जमिनीस खत मिळते. अनेक विषाणूजन्य आजारांवर त्यातील औषधी गुणधर्म उपयुक्त असल्याचा दावा केला जातो. संस्थेचे शास्त्रज्ञ ‘ग्रीन रिव्होल्यूशन’नंतरची ‘Ever Green Revolution’ म्हणतात. लक्ष्मीतरूचे हे दान कर्नाटक भूमातेच्या अंगाखांद्यावर हरित दागिन्याप्रमाणे केवळ लकाकते आहे, असे नव्हे तरी वातावरण बदलात चिलखताप्रमाणे कार्य करेल, असा दावा ते करतात. झाडांची वकिली... प्रसाद राम हेगडे हे उत्तर कन्नडा जिल्ह्यातील कासार कोडलगाव (ता. येल्लापूर) येथील सुशिक्षित वकील तरुण. त्यांनी आपल्या १.७ हेक्टर जमिनीवर एक हजार वृक्ष लावले आहेत. डोंगर उतारावरील त्यांची दुष्काळी शेती खाली गाव. पावसामुळे डोंगरावरून पाण्याचे लोट गावात येत, शेती वाहून जाई. अशी शेती काय पिकणार, शहरात जाऊन वकिली कर, असा शहाणपणाचा सल्ला अनेक जण देत. प्रसादने नकार दिला. डोंगर उतारावर ४० खोल खड्डे घेतले. पावसाचे पाणी अडवले, मुरवले. याच पाण्यावर दालचिनी, फणस, मिरी, सुपारी, नारळ, चिक्कू, बांबू, काजू, कोको, औषधी वनस्पती, दालचिनी आणि जुनी पारंपरिक आंब्याची झाडे लावली. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक म्हणून सात देशी गाईचे पालन ते करतात. सोबत ४० मधमाशी पेट्याही ठेवल्या. राज्यशासन आणि फलोद्यान विभागाच्या सहकार्याने कृषी क्षेत्रात क्रांतीच केली आहे. राज्य शासनाच्या कृषी पंडित पुरस्कारासह अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. या बागेस भेट देणाऱ्यांना मिळते ती फळझाडाच्या रोपांची भेट. अगदी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन स्वखर्चाने स्वत:च्या बागेतील फळे मोफत वाटतात. ही झाडांची वकिलीच आहे. शेतीतील पुरुषोत्तमाचा सत्कार कर्नाटकमधील सेंद्रिय शेती प्रवासामधील महत्त्वाचा वाटा ‘कृषी प्रयोग परिवार’ या संस्थेचा आहे. राज्यात आज २ लाख शेतकरी म्हणजे प्रत्येक तालुक्यातील १२०० शेतकरी या प्रवाहात आहेत. तीर्थहल्ली येथे संस्थेचे कार्यालय आहे. प्रति वर्षी एप्रिलमध्ये उत्कृष्ट प्रकारची सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यास आमंत्रित करून त्यास ‘पुरुषोत्तम पारितोषिक’ दिले जाते. शेतकरी पुरुषोत्‍तमाची व त्याच्या कार्यात सहभागी होणाऱ्या कुटुंबीयांची रथामधून मिरवणूक काढली जाते. असाच सन्मान पाच वर्षामधून एकदा राज्याबाहेरील शेतकऱ्याचाही केला जातो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com