तोडून प्रतवारी केलेले बांबू.
तोडून प्रतवारी केलेले बांबू.

Bamboo Cultivation : बांबू लागवडीचा ताळेबंद

सर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून एक किंवा दोन कोंब सोडतो. याच कोंबाचे बांबूत रूपांतर होते. एकदा बांबू लागून निघाला की खंड न पडता उत्पादन मिळत राहाते. ओलिताखालील बांबू दरवर्षी कोरडवाहूपेक्षा दीडपट उपन्न देतो, कारण सर्व कोंबांचे बांबूत रूपांतर होते .

यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण बांबू प्रजातीपासून ते तोड करण्यापर्यंत माहिती घेतली. हा तोडलेला बांबू आपल्याला उत्पन्न देतो. बांबू तोडल्यानंतर त्याची वर्गवारी करावी. हिरवा बांबू (जो बांबू साधारणपणे ३० ते ३५ टक्के ओलसर असतो) खरा व्यापाराचा बांबू आहे. तोडल्याबरोबर त्यातील पाणी कमी होऊन तो वाळू लागतो. आपला तोडीचा हंगाम जर ऑक्टोबर ते जानेवारी असेल तर हा हिरवेपणा जास्त दिवस टिकतो.

मार्च- एप्रिलमध्ये तोडलेला बांबू हा लवकर वाळू लागतो. जेवढा हिरवा बांबू लवकर बाजारात किंवा कारखान्यात जाईल तेवढे त्याचे मूल्य जास्त असते. कोणत्याही कारखान्यात किंवा टोपल्या वगैरे हस्त कलेसाठी हिरवा बांबू लागतो. बांधकामासाठी वाळलेला बांबू घेतला जातो. हा बांबू आपल्याला किती पैसे देणार ते आपल्या या बांबूच्या प्रतीवर अवलंबून असते. ही प्रत बांबूची जाडी, उंची, सरळपणा आणि हिरवेपणा यावर ठरते. पीक म्हटले, की त्याच्या लागवडीसाठी लागणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पन्न याच लेखाजोखा मांडला पाहिजे.

बांबूपासून मिळणारे उत्पन्न :

  • सर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून एक किंवा दोन कोंब सोडतो. याच कोंबाचे बांबूत रूपांतर होते. जर लागोपाठ दुष्काळ पडला तर उत्पादन सुरू होण्यास एखादे वर्ष लांबू शकते.

  • एकदा बांबू लागून निघाला की खंड न पडता उत्पादन मिळत राहाते. ओलिताखालील बांबू दरवर्षी कोरडवाहूपेक्षा दीडपट उपन्न देतो, कारण सर्व कोंबांचे बांबूत रूपांतर होते.

  • डोंगर उतारावर कंटूर ५ मीटर वर घ्यावेत. यामध्ये कायमस्वरूपी कढीपत्ता किंवा शेवगा यांसारखी आंतरपिके घेता येतात. त्याचबरोबर चाऱ्याची पिके घ्यावीत. यामुळे जमीन कायम झाकलेली राहाते. जमिनीतील पाणी बाष्पीभवनाने उडून जात नाही.

  • कायमस्वरूपी मिश्रापिकांची लागवड करावयाची असेल तर लागवड ५मी x २मी अंतरावर करावी. मधल्या जागेत ही पिके घ्यावीत. बांबू तोडीपूर्वी मिश्रपिकाची काढणी होईल, अशा हिशेबाने पिकांची लागवड करावी.

  • पहिली दोन-तीन वर्षे बांबू हा आकाराने लहान व उंचीला कमी असतो

थोडक्यात पण महत्त्वाचे :

  • लेखातील जमाखर्चाचा आढावा घेताना सर्व साधारणपणे जर आपण मिश्र पिकातून लागवडीचा खर्च बाजूला काढला तर चौथ्या वर्षापासून एकरी साठ ते सत्तर हजार उत्पन्न मिळते. पुढे योग्य व्यवस्थापन असेल तर ४ लाखांपर्यंत जाते. यासाठी सातत्याने निगा, काळजी, राखण, खत देणे, भर देणे, पाणी देणे आवश्यक आहे.

  • बांबू हे कमी श्रमाचे पीक जरूर आहे, पण आळश्याचे पीक नाही. उसाला पर्याय म्हणून याकडे पाहू नये. दुष्काळ आला तरी हमखास तारणारे पीक म्हणून बांबूकडे पाहावे.

  • पाऊस नाही पडला तर बांबू सुप्तावस्थेत जातो. पाऊस पडताच पुन्हा वाढ सुरू होते.

  • बांबू तोडल्यानंतर त्याचे निमुळते शेंडे वेगळे कापले तर त्याला वेगळा दर मिळतो. सारख्या जाडीच्या बांबूला वेगळा दर मिळतो. कोल्हापूरमधील आजरा भागातील शेतकरी अशा पद्धतीने अधिक उत्पन्न मिळवितात.

काही धोके:

  • सध्या बांबू या पिकाकडे सरकारचे लक्ष गेल्याने याचा चांगला प्रचार होत आहे. तसेच अधिकचे उत्पन्न सांगणारी मंडळी आपली दिशाभूल करू शकतात. त्यापासून सावध राहावे.

  • जगामध्ये बांबूचे सर्वात जास्त उत्पन्न चीनमध्ये घेतले जाते. तेथे एकरी ३० टनांपुढे अजून उत्पन्न गेलेले नाही.

  • आपल्या हवामानास योग्य जाती लावा. माफक उत्पन्न मिळवा. बांबू ही जादूची कांडी नाही. पण निश्चित उत्पन्न देणारे व वर्षानुवर्षे टिकणारे पीक आहे.

  • काही लोक बांबूची जवळ लागवड जवळ लावून ४० टनांचा दावा करतात. हे ४० टन उत्पादन घेण्यासाठी संपूर्ण बांबू उसासारखा कापावा लागतो. हा फक्त बांबू नसतो तर पाने, फांद्या वगैरे सर्व भाग असतो. हा पूर्ण बांबू तोडल्यावर पुन्हा कापणीला येण्यासाठी ३ वर्षे जावी लागतात. म्हणजे दरवर्षी उत्पन्न तेवढेच झाले. शिवाय असा बांबू हा वीजनिर्मिती, औद्योगिक अल्कोहोल तयार करण्यासाठी किंवा जैविक सी एन जी करण्यासाठी वापरला जातो, असे कारखाने ज्यांच्या जवळपास आहेत त्यांनीच ही प्रजाती लावावी.

बांबू व्यवस्थापनाचा खर्च :  एक एकरामध्ये ४५० बांबू बेटे  अंतर ३ मिटर बाय ३ मिटर

Bamboo Cultivation
Bamboo Cultivationagrowon
Bamboo Cultivation
Bamboo Cultivationagrowon
Bamboo Cultivation
Bamboo Cultivationagrowon

टीप : बांबू लागवड आणि व्यवस्थापन खर्च संबंधित लागवडीचे ठिकाण आणि त्या वेळच्या परीस्थितीनुसार कमी जास्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे शेतकरी काही गोष्टी स्वतः करून आर्थिक बचत करू शकतात. शेतकऱ्याने स्वतः शेणखत किंवा काडीकचरा खत स्वतः बनवल्यास आणखी आर्थिक बचत होऊ शकते. स्वतः पीक व्यवस्थापन करून लागवड आणि व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या मजुरीत बचत करू शकतो.

Bamboo Cultivation
Bamboo Cultivationagrowon

टीप : चौकटीतील दर आणि मिळकत हे अंदाजासाठी आहे. स्थानिक परिस्थिती आणि बाजारपेठेतील दरानुसार उत्पादन आणि उत्पन्न बदलू शकते. अनेक शेतकरी कौशल्य आणि मेहनतीने यापेक्षा जास्त उत्पन्न घेऊ शकतात. त्याचबरोबर जवळ लावलेला बांबू अधिक काठ्या देतो. परंतु, काठीचा आकार लहान झाल्याने उत्पन्नाची गोळाबेरीज सारखीच येते.

- डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५, (लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com