योग्य नियोजनातून कपाशीचे भरघोस उत्पादन

योग्य नियोजनातून कपाशीचे भरघोस उत्पादन
योग्य नियोजनातून कपाशीचे भरघोस उत्पादन

शेतकरी ः अशोक देशमाने मंगरूळ, ता. मानवत, जि. परभणी पीक ः कापूस अशोक देशमाने यांची मंगरूळ (ता. मानवत, जि. परभणी) शिवारात हलक्या ते मध्यम प्रकारची १८ एकर जमीन आहे. सिंचनासाठी ३ विहिरी आणि एक कूपनलिका आहे. पाणी साठविण्यासाठी शेततळ्याची सुविधा निर्माण केली आहे. दरवर्षी हळद ५ एकर, आले दीड ते दोन एकर, कापूस ७ ते ८ एकर असे पीक नियोजन असते. गेल्या तीन वर्षांपासून शेडनेट, पॉलिहाउसमधील संरक्षित शेती सुरू केली असून, त्यात डच गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. एक एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केली असून, रेशीम कोष उत्पादन सुरू झाले आहे. कापूस लागवड...

  • खरिपामध्ये कपाशीची दरवर्षी ७ ते ८ एकर क्षेत्रावर लागवड केली जाते. त्यासाठी मे महिन्यात कापूस मशागत करून जमीन तयार केली जाते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार किंवा जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर पाच फूट अंतरावर ओळी तयार केल्या जाते. त्यासोबत मोग्याने पेरणी करून रासायनिक खताचा बेसल डोस दिला जातो. त्यानंतर ठिबक संचाच्या नळ्या अंथरल्या जातात. त्यानंतर दोन झाडांमध्ये दीड फूट अंतर ठेवून कपाशीची लागवड केली जाते.
  • बेसल डोसमध्ये एकरी १०ः २६ः२६ (७५ किलो), निंबोळी पावडर (२५ किलो), गंधक (५ किलो) यांचा समावेश असतो.
  • उगवणीनंतर कपाशीचे पीक तीन पानांवर आले असताना वखर पाळी घालून आंतरमशागत केली जाते.
  • पीक ४० दिवसांचे झाल्यानंतर ठिबक संचाद्वारे एकरी १३ किलो याप्रमाणे १९ः १९ः१९ या विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते.
  • पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर विद्राव्य सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा एकरी १ लिटर याप्रमाणे ठिबकद्वारे दिली जाते. त्यानंतर साधारणतः १०-१० दिवसांच्या अंतराने पीक पाते, फुले, बोंडे भरण्याच्या अवस्थेत असताना एकरी १३ किलो १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते.
  • विद्राव्य खते दिल्यामुळे कपाशीच्या पिकास योग्य प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होतात.
  • गंधकामुळे बोंडाचा आकार वाढतो. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
  • निंबोळी पावडरमुळे सेंद्रिय घटकांची उपलब्धता होते. तसेच मातीतून येणाऱ्या कीडरोगांना अटकाव होतो.
  • पीक संरक्षण -

  • कपाशीचे पीक ४० दिवसांचे झाल्यानंतर पहिली फवारणी निंबोळी अर्काची केली जाते. निंबोळी अर्क हे अंडीनाशक असून, रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते.
  • पीक पाते, फुले, बोंडे लागलेल्या अवस्थेत असताना दररोज पिकाची निरीक्षणे घेत असतो.
  • बोंड अळीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी एकरी आठ याप्रमाणे कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप) लावतो. सर्वेक्षणात कीड, रोगाचा प्रादुर्भावाची आर्थिक नुकसान ओलांडल्याचे आढळून आल्यास शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करतो.
  • बोंडे चांगल्या पद्धतीने फुटल्यानंतर महिला मजुरांकरवी कापूस वेचणी केली जाते. काडी, कचरा विरहित, कोरडा कापूस वेचणीनंतर सुरक्षित ठिकाणी साठवला जातो.
  • पहिल्या बहाराच्या फुटलेल्या सर्व बोंडातील कापसाची वेचणी झाल्यानंतर साधारणतः डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पऱ्हाटी उपटून टाकतो. गुलाबी बोंड अळीचा प्रसार रोखण्यासाठी फरदड घेत नाही. कपाशीच्या ठिकाणी टरबूज लागवड केली जाते.
  • अशोक देशमाने, ९८८१६३८६५०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com