agricultural stories in Marathi, cotton success story, Devendra Patil | Page 2 ||| Agrowon

कमी खर्चिक किफायतशीर कापूस पीक व्यवस्थापन

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 19 ऑगस्ट 2021

घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील देवेंद्र खेमराज पाटील यांनी लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड, फेरपालट, रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळून जैविक कीडनियंत्रणाचा वापर यामधून त्यांनी कापूस शेती व्यवस्थापन उल्लेखनीय असे केले आहे.

घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील देवेंद्र खेमराज पाटील यांनी अनेक वर्षांच्या अनुभवातून कापूस शेती कमी खर्चिक व अधिक उत्पादनक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड, फेरपालट, रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळून जैविक कीडनियंत्रणाचा वापर अशा अनेक बाबींमधून त्यांनी कापूस शेती व्यवस्थापन उल्लेखनीय असे केले आहे.

घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) हे तापी नदीपासून काही अंतरावर व चोपडा शहरापासून सुमारे २० किलोमीटरवरील गाव आहे. शिवारातील कमाल क्षेत्रात जलसाठे मुबलक आहेत. याच गावातील देवेंद्र पाटील यांची कपाशीचे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख आहे. सालगड्यांची मदत, वडील खेमराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ६० एकर शेतीचा गाडा ते यशस्वी हाकत आहेत. चार कूपनलिका (ट्यूबवेल) आहेत.

कपाशीतील व्यवस्थापन
जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवडीचे नियोजन असते. दहा एकरांसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था आहे. जमीन काळी कसदार आहे. यात सर्वच पिके जोमात येतात. केळीची लागवड मात्र टाळतात. सिंचनासाठी उर्वरित भागात जलसाठे कमी असल्याने पाटील यांनी शंभर टक्के क्षेत्र अद्याप ठिबक केलेले नाही. मात्र ठिबक नसलेल्या क्षेत्रातही चांगले उत्पादन ते घेत आहेत.

माती सुपीकता व फेरपालट- दोन बैलजोड्या, दोन म्हशी, तीन गायी असे पशुधन आहे. त्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या शेण, मूत्राचा कार्यक्षम उपयोग ते करून घेतात. दरवर्षी मेंढपाळांकडील मेंढ्या रानात बसवण्यावरही भर असतो. दर तीन वर्षांनी माती परीक्षण केले जाते. खोल नांगरणी व लागवडीपूर्वी शेत चांगले भुसभुशीत केले जाते. फेरपालटीवर भर असतो. ज्या क्षेत्रात कापसाची लागवड करतात त्यात पुढील वर्षी नत्र स्थिरीकरणासाठी मूग पीक घेतले जाते. मुगानंतर दादर ज्वारी घेतली जाते. मका पीक घेतल्यास पुढे हरभरा घेतला जातो. काळी कसदार माती असल्याने रब्बीमध्ये किमान चार महिने कमी पाणी किंवा कोरडवाहू पीक घेऊन सुपीकता राखावी असा उद्देश असतो. रब्बीचे पीक निघाल्यानंतर क्षेत्र किमान दोन महिने तापू दिले जाते. यामुळे जमिनीतील किडींचे कोष नष्ट होतात. पुढे खरिपात मुख्य पिकातील प्रादुर्भाव कमी करता येतो

 पूर्वी पारंपरिक पद्धतीने म्हणजे चार बाय तीन वा चार फूट अशी पाट पद्धतीच्या सिंचनाने मेच्या मध्यापासून लागवड व्हायची. अलीकडील वर्षांत या पद्धतीत सुधारणा झाली आहे. आता चार फूट बाय दीड फूट अंतर वापरले जाते.

 पाटील सुमारे ३० वर्षांपासून शेती करतात. दरवर्षी ३० ते ३५ एकरांत बीटी कापूस असतो. त्यात तीन ते चार प्रकारच्या वाणांचा ते वापर करतात. गुलाबी बोंड अळीचा अलीकडील काळात वाढलेला प्रादुर्भाव पाहता ‘अर्ली’ वाणांची निवड त्यांनी केली आहे. साधारण १२० दिवसांच्या कालावधीत कापूस काढणीस आल्यास अळीपासून होणारे नुकसान कमी करता येते असे ते म्हणतात. शिवाय ते फरदडही घेत नाहीत. अर्ली वाणांमुळे वेचणी लवकर सुरू होते. दिवाळीलाच बऱ्यापैकी उत्पादन हाती येते. या काळात कापसाचे वजन वातावरणातील आर्द्रता व थंडी यामुळे टिकून राहते. त्याची लवकर विक्रीही शक्य होते. या काळात दरही अनेकदा बऱ्यापैकी मिळतात. क्षेत्र डिसेंबरमध्येच रिकामे करून रब्बी पिकेघेणे शक्य होते. यामुळे नफा अधिक वाढतो. पशुधनाला मुबलक चाराही उपलब्ध करून घेता येतो. यंदा कापूस डिसेंबरमध्ये काढला. क्षेत्र रिकामे करून त्यात ज्वारीची पेरणी केली. चाऱ्याला चांगले दर मिळाले. तीन हजार रुपये प्रति शेकडा दरात विक्री केली.

जैविक कीडनियंत्रण ः कापूस पिकात रसशोषक किडी व अळ्यांचाही प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. रासायनिक उपायांपेक्षा पाटील यांनी जैविक उपायांवर अधिक भर दिला आहे. चिकट सापळे, सापळा पीक मका व झेंडू, पक्षिथांबे, जैविक कीडनाशकांचा उपयोग ते करतात. पावसात काळ्या कसदार जमिनीत मर रोग उद्‍भवतो. नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग केले जाते.

पाटील यांनी शेतात मित्रकीटकांचे संवर्धन करण्यावरही भर दिला आहे. गरजेनुसार ‘ट्रायकोकार्डस’चा वापरही ते करतात. कार्डसचे भाग करून दर १५ झाडांच्या अंतरावर स्टॅपलरच्या साह्याने ते झाडाला लावले जातात. एकरी चार कामगंध सापळ्यांचा उपयोग नर पतंग पकडण्यासाठी होतो. दीड महिन्याने त्यातील ल्यूर बदलला जातो. आपल्या शेतात क्रायसोपर्ला व लेडी बर्ड बीटल हे मित्रकीटकही चांगल्या प्रमाणात आढळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. क्षेत्र रिकामे करताना अधिक प्रादुर्भावग्रस्त पऱ्हाटींची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लावली जाते. कारण याच अवशेषांमुळे गुलाबी बोंड अळीचा शिरकाव होण्याची शक्यता असते.

उत्पादन व विक्री
पाटील यांनी दरवर्षी फरदडरहित एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादनाची सरासरी कायम ठेवली आहे. कापूस वेचणीचा खर्च वाढत आहे. तीन वर्षांपूर्वी तो प्रति किलो पाच रुपये होता. गेली दोन वर्षे तो सरासरी आठ रुपये येत आहे. निविष्ठा महाग होत असल्याने उत्पादन खर्च दोन ते तीन टक्के वाढला आहे. एकरी उत्पादन खर्च किमान १५ हजार रुपये होतो. कापसाची जागेवर विक्री होते. क्विंटलला चार हजार ते पाच हजार रुपये दर दरवर्षी मिळतो. साठवणूक पक्क्या घरात व्यवस्थित करतात. यामुळे दर्जा टिकून राहतो. वेचणी करताना कचरा (ट्रॅश) येणार नाही याची काळजी घेतात.

मनमिळाऊ व स्वतः राबण्याची तयारी
शेतीचा व्याप अधिक असल्याने पाटील नोकरीच्या मागे लागले नाहीत. वडिलोपार्जित शेती कसण्याबरोबर १० एकर शेती ते लीजवरही करीत आहे. कृषी पदवीधारक असल्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्यासह इतरांनाही करून देतात. तज्ज्ञांच्या संपर्कात ते असतात. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, खासगी कंपन्यांचे अधिकारी त्यांच्याकडे पीक पाहणी, प्रयोग या अनुषंगाने भेट देत असतात. एका स्वयंसेवी संस्थेचे ते सदस्य असून त्या माध्यमातून कार्यरत असतात. ट्रॅक्टर चालविणे, पाण्याचे व्यवस्थापन आदी कामे स्वतः करतात. पिकाचे सतत निरीक्षण करण्यावर त्यांचा भर असतो. पिकासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम, उपक्रम यात सक्रिय सहभाग घेतात. अनेक वर्षांपासून त्यांनी महत्त्वाच्या नोंदीही ठेवल्या आहेत.

- देवेंद्र पाटील, ७०२०९३२७५७, ७३५०९९४८१५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...