कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग, टरबूज_खरबूज, टोमॅटो, भाजीपाला

कृषी सल्ला
कृषी सल्ला

हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७) तापमान अंशत: ढगाळ राहील. ऊस ः सध्या बाष्पीभवनाचा वेग अधिक असल्याने जमिनीतील ओलावा कमी होतो. परिणामी ऊस पिकाची वाढ खुंटते. त्यामुळे पिकास सकाळी व सायंकाळी ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित पाणी द्यावे. कापूस ः मागील हंगामातील कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. त्यावर असलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील. मार्च- एप्रिलमध्ये जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील. उन्हाळी भुईमूग ः सध्या पीक वाढीच्या अवस्थेत आहे. उष्ण व कोरड्या हवामानात उन्हाळी भुईमूग पिकात तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम किंवा डायमेथोएट १.४ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकास पाणी देताना तुषार सिंचनाचा वापर करावा. शक्यतो सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. टरबूज / खरबूज ः टरबूज व खरबूज या पिकांवरील फुलकिडे, मावा व पांढरी माशी यांची पिल्ले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात. परिणामी पाने वाकडी होतात. त्याच प्रमाणे हे कीटक विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात. किडीच्या नियंत्रणासाठी, थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. टोमॅटो ः उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केली असल्यास टोमॅटोच्या दोन ओळीनंतर मका पिकांची लागवड करावी, त्यामुळे फुलगळ कमी होण्यास मदत होईल. टोमॅटो पिकात पर्णगुच्छ ( लिफ कर्ल ) हा रोग पांढरी माशी मार्फत आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस हा फुलकिड्यामार्फत पसरतो. या किडीच्या वेळीच नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नायनाट करावा. पिकांमध्ये पिवळे चिकट सापळे वापरावेत. फवारणी प्रति लिटर पाणी फिप्रोनील (५ एस.सी.) १.५ मिली अधिक मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम. अधून-मधून ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. भाजीपाला ः भाजीपाला पिकास पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचाच ( उदा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन ) वापर करावा. पिकांना पाणी देत असताना शक्यतो सकाळी, सायंकाळी किंवा रात्री पाणी द्यावे. फळझाडे ः फळझाडांना पाण्याची कमतरता असल्यास सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. उदा. ज्वारीची धसकटे, तूरकाड्या, वाळलेले गवत, गव्हाचा भुसा / काड्या, उसाचे पाचट, कपाशीच्या पऱ्हाट्या, वाळलेली पाने इत्यादी. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनातून फळपिकाच्या वाढीनुसार पाणी द्यावे. फळ झाडे जिवंत राहण्यासाठी दररोज किंवा एक दिवसाआड पाणी द्यावे. किमान एक तास तरी संच चालवावा. फुलशेती ः मोगरा फुलांची काढणी सकाळी लवकर करावी. काढणी केलेली फुले लांबच्या बाजारपेठेत कोरुगेटेड बॉक्समध्ये पॅक करून पाठवावीत. फुले जवळच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी बांबूच्या टोपल्या किंवा करंड्याचा वापर करावा. हंगामी फुलझाडांची लागवड केली असल्यास तीव्र उन्हापासून रोपांचे संरक्षण करावे. रोपांना काटकसरीने पाणी द्यावे. रोपांना ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. चारा पिके ः सध्या चाराटंचाई असताना उपलब्ध चाऱ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा. हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती, सगळ्या शुष्क चाऱ्यावर युरिया प्रक्रिया, ॲझोला उत्पादनातून कमी खर्चात पशुखाद्यास पर्याय मिळवणे शक्य आहे. त्याच प्रमाणे जनावरांच्या आरोग्यासाठी क्षार पुरवठा आणि पशु आहार पुरविण्याच्या वेळेत बदल करावेत. संपर्क ः ०२४२६- २४३२३८ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com