agricultural stories in Marathi, crop change in kadvanchi | Agrowon

कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई गटशेतीला सुरवात
अमित गद्रे
रविवार, 21 एप्रिल 2019

विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्याने गावामध्ये द्राक्ष लागवडीला गती मिळाली. १९८८ मध्ये कडवंचीमध्ये पहिली द्राक्ष बाग उभारणारे अनुभवी शेतकरी विठ्ठलराव क्षीरसागर. काळाची गरज ओळखून त्यांनी द्राक्षाच्या बरोबरीने गटशेतीमधून पपई लागवडीवर भर दिला आहे. या बदलाबाबत विठ्ठलराव क्षीरसागर यांच्याशी साधलेला संवाद...

विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्याने गावामध्ये द्राक्ष लागवडीला गती मिळाली. १९८८ मध्ये कडवंचीमध्ये पहिली द्राक्ष बाग उभारणारे अनुभवी शेतकरी विठ्ठलराव क्षीरसागर. काळाची गरज ओळखून त्यांनी द्राक्षाच्या बरोबरीने गटशेतीमधून पपई लागवडीवर भर दिला आहे. या बदलाबाबत विठ्ठलराव क्षीरसागर यांच्याशी साधलेला संवाद...

गावशिवाराचे कोरडे हवामान, जमिनी मध्यम-चांगल्या निचऱ्याच्या तसेच फारसा रोग, किडींचा प्रादुर्भाव नाही. शेतकरी काटेकोरपणे द्राक्ष बाग आणि पाण्याचे व्यवस्थापन करतात. गावामध्ये विदर्भ, मध्य प्रदेशातील व्यापारी येऊन खरेदी करतात, त्यामुळे दरही चांगला मिळतो. आर्थिक प्रगतीही झाली. पण आता कमी होणारे पाऊसमान आणि वाढती द्राक्ष बागायती पाहता कोठे तरी थांबावे लागेल. उपलब्ध पाण्याला मर्यादा आहेत. किती ताणायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे. आता आम्ही सांगतोय द्राक्षाच्या बरोबरीने पेरू, सीताफळ, पपई लागवडीकडे वळा, पशुपालनाला गती द्या...कडवंचीचे माजी सरपंच, पाणलोट समितीचे उपाध्यक्ष आणि प्रयोगशील द्राक्ष बागायतदार विठ्ठलराव क्षीरसागर भविष्यातील शेतीची दिशा स्पष्ट करत होते.

कडवंचीमध्ये द्राक्ष रुजण्याबद्दल विठ्ठलराव क्षीरसागर म्हणाले की, ८० च्या दशकात गावात पुरेसे पाणी होते. पिके चांगली यायची. या काळात मी ऊस लागवड करायचो. स्वतःचे गुऱ्हाळ होते. नंतर पाऊस, पाणी कमी होत गेले. त्यानंतर मी खासगी कंपन्यांसाठी कपाशी, सूर्यफूल बीजोत्पादन करून द्यायचो. परंतू त्यातही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे आम्ही काही शेतकरी पुन्हा एकदा आर्थिकदृष्या परवडणाऱ्या पिकाच्या शोधास सुरवात केली. या दरम्यान आमच्या गावाजवळील बॅंकेचे व्यवस्थापक श्री. निकम यांनी द्राक्ष पिकाची माहिती दिली. त्यांची नाशिक जिल्ह्यातील दाभाडी परिसरात द्राक्ष बाग होती. त्यांचा भाऊ ही द्राक्ष बाग बघायचा. दोन एकरांत त्यांना चांगले उत्पन्न मिळायचे. त्यांची द्राक्ष पाहण्यासाठी आम्ही पाच, सहा शेतकरी गेलो. शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. १९८८ च्या जानेवारी महिन्यामध्ये कडवंचीमध्ये मी, दगडू पाटील क्षीरसागर, नानासाहेब पाटील आणि सदाशिव क्षीरसागर यांनी ठरवून प्रत्येकी एक एकरावर स्वमुळावर थॉमसन जातीची द्राक्ष बाग रुजवली. ठिबक सिंचन केले. गरजेनुसार नाशिक भागातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घ्यायचो. चुका सुधारत द्राक्ष बाग फुलली. मला पहिल्यांदा एकरी दहा टन उत्पादन मिळाले, जालना बाजारपेठेत सात रुपये किलो दर मिळाला. माझ्या बरोबरीनेच चार शेतकऱ्यांच्या बागेच्या व्यवस्थापनात अडचणी आल्या पण पुढील हंगामात त्यांनी सुधारणा करत उत्पादनही घेतले आणि द्राक्ष बाग खऱ्या अर्थाने रुजली. टप्प्याटप्प्याने द्राक्ष बाग वाढत होती. मात्र ११९२ मध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष बाग जळाली. पुढे दोन वर्षात पाऊसमान सुधारले. पाणी पातळी वाढली. त्यामुळे १९९५ मध्ये मी अडीच एकरावर सोनाका लागवड केली. गावात ९५ मध्ये पंचवीस एकर, २००० मध्ये तीनशे एकर आणि आता १५०० एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. आम्ही शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करायचो. गावात हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमिनीतील द्राक्ष लागवडीनुसार शेतकऱ्यांचे गट तयार झाले. नाशिक, सोलापूर भागातील द्राक्ष बागायतदार, द्राक्ष बागायतदार संघ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून दर्जेदार उत्पादनासाठी बागेच्या व्यवस्थापनात गरजेनुसार बदल करत गेलो.

 या दरम्यानच्या काळात पाणीटंचाई चांगलीच जाणवू लागली. त्यामुळे २००० नंतर मी एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे केले. त्यानंतर २००५ मध्ये ७५ लाख लिटर, २०१० मध्ये ७५ लाख लिटर आणि २०१२ मध्ये अडीच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे केले. सध्या माझ्याकडे सात एकरावर द्राक्ष बाग उभी आहे. पावणेदोन एकरावर पपई आहे. द्राक्षाच्या सुपर सोनाका, माणिक चमन, गणेश जातीची लागवड आहे. सर्व बागांना ठिबक सिंचन, पाचटाचे आच्छादन, शेणस्लरीचा वापर, काटेकोर अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रणावर भर देत एकरी १२ ते १४ टनांचे उत्पादन मी घेतो. व्यापारी बागेमध्येच प्रति किलो ३० ते ३५ रुपये दर देतात. मी यंदा जबलपूर बाजारपेठेत अर्ली हंगामाच्या द्राक्षांची विक्री केली. मला ४७ रुपये प्रति किलो दर मिळाला. गेल्या १४ वर्षात द्राक्षामुळे गावात पैसा आला. शेतीमधील गुंतवणूक वाढली. अगदी एक, दोन एकरवाला शेतकरी शेततळ्यातून पाणी साठवत द्राक्ष बागायतदार झाले. द्राक्षाने सालदाराला बागायतदार बनविले.

जल, मृद संधारणातून क्रांती
गावातील जल, मृद संधारणाबाबत विठ्ठलराव क्षीरसागर म्हणाले की, सन १९९५ मध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून माथा ते पायथा जल, मृद संधारणाच्या कामांना सुरवात झाली. आम्ही पाणलोट समिती तयार केली. भगवान क्षीरसागर पाणलोट समितीचे अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष आहे. गावात सभा घेऊन लोकांना पाणलोटाचे महत्त्व पटवून दिले. शेतशिवारात बांधबंदिस्ती, डोंगर उतार, गायरानात पाणलोट उपचार, वनीकरण केले. शेतशिवारात पाणी मुरले. विहिरींची पाणी पातळी वाढली. शेततळ्यातून संरक्षित पाणी झाले. गावात ठिबकशिवाय कोणी पिकाला पाणी देत नाही.

पपईतून पीक बदल
एक पीक पद्धतीचा धोका ओळखून गावातील जाणकार शेतकरी पीक बदलाकडे वळू लागले. याबाबत विठ्ठलराव क्षीरसागर म्हणाले की, गावाचे हवामान कोरडे आहे, जमिनी चांगल्या निचऱ्याच्या आहेत. शेतशिवारात मुरणाऱ्या आणि विहीर, शेततळ्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटेकोर वापर होत आहे. परंतू बदलते हवामान, पाऊसमानही पाहावे लागतंय. शेतशिवारातील पाणी वापराला मर्यादा आहेत. किती ताणायचे हे ठरवावे लागतंय. पाण्याच्या बरोबरीने मजूरही संपलाय. त्यामुळे फळबाग करायची तर पेरू, सीताफळ, पपई तसेच पशुपालनाकडे आम्ही वळतोय. गावात पपई उत्पादकांचा गट बांधला आहे. माझी स्वतःची पावणेदोन एकरावर पपई लागवड आहे. रमजान, ईदच्या कालावधीत फळे बाजारपेठेत येतील असे नियोजन आहे. त्यापुढे किमान सात, आठ महिने फळांचे उत्पादन मिळेल.गटामध्ये दहा शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचे एक एकर असे दहा एकर क्षेत्र आहे. आम्ही सप्टेंबर महिन्यात लागवड केली. लागवडीचे अंतर ८.५ फूट बाय ८ फूट ठेवले आहे. गादीवाफ्यात शेणखत मिसळून ठिबक सिंचन करून झिगझॅग पद्धतीने रोपांची लागवड केली.  दर आठ दिवसांच्या अंतराने प्रति झाड एक लिटर शेणस्लरी दिली जाते. पिकाच्या गरजेनुसार सेंद्रिय खतांचा जास्त प्रमाणात वापर करणार आहोत. नाल्यातील गाळ, शेणखत, शेणस्लरीच्या वापरातून जमिनीची सुपीकता जपण्याचा प्रयत्न आहे. कीड, रोग नियंत्रणासाठी सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर भर आहे. गरज लागली तरच रासायनिक कीडनाशकांचा वापर करणार. आता फळधारणेला सुरवात झाली आहे. दररोज बाजारपेठेत दोन टन फळे जातील असे नियोजन आहे. रमजानच्या काळात प्रतिकिलो १० ते १२ रुपये दर मिळेल असा अंदाज आहे. या अनुभवातून पपईचे क्षेत्र वाढीचा प्रयत्न आहे.

शेणस्लरीच्या वापरावर भर

  •   तीन म्हशी, दोन गावरान गाई, दोन गीर आणि दोन वासरे.
  •   गोठा, जनावरे धुतलेले पाणी, शेण, गोमूत्र एका ठिकाणी जमा होण्यासाठी बारा हजार लिटरची टाकी. तेथून मड पंपाने ट्रॅक्टरचलित एक हजार लिटर टाकीमध्ये शेणस्लरी भरली जाते. या टाकीला पाइप बसविलेले आहेत. त्यामुळे द्राक्ष बागेत स्लरी देणे सोपे जाते. रासायनिक खतात बचत.
  •   चार वर्षापासून बायोगॅसचा वापर. बायोगॅसमुळे वर्षाला चार सिलिंडर वाचतात.

    संपर्क : श्री. क्षीरसागर ९६३७०६६५३२

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...