तयारी खरिपाची : बीटी कपाशीचे उत्पादन, दर्जा वाढविण्यासाठी टिप्स

जमिनीच्या प्रकारानुसार योग्य अंतरावर लागवड करावी.
जमिनीच्या प्रकारानुसार योग्य अंतरावर लागवड करावी.

बीटी कपाशीचे उत्पादन व त्याचा दर्जा वाढवायचा असल्यास शास्त्रोक्त पद्धतीने लागवड व्यवस्थापन करणे गरजेचे असते. कपाशीत कीड, रोगनियंत्रणही प्रभावी पद्धतीने करणे गरजेचे असते. त्यादृष्टीने लेखात दिलेल्या टिप्स शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील.

बीटी कापूस लागवडीची पूर्वतयारी

  •   स्वच्छता मोहीम : मागील हंगामातील पऱ्हाटी व शेतातील अवशेष वेचून त्यांची विल्हेवाट लावावी.
  •   जमिनीची निवड : पाण्याचा निचरा होणाऱ्या आणि जलधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर कपाशीची लागवड करावी. उथळ किंवा कमी खोली असणाऱ्या व हलक्या जमिनीवर लागवड करू नये.
  •   मशागत : उन्हाळ्यात खोल नांगरणी व ३ ते ४ वखराच्या पाळ्या प्रत्येकी दोन आठवड्यांच्या अंतराने कराव्यात.
  •   सेंद्रिय खते : शेवटच्या पाळीपूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी ५ टन (१० ते १२ गाड्या) आणि बागायती लागवडीसाठी १० टन  (२०-२५ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत वा कंपोस्ट खत जमिनीवर एकसारखे पसरून घ्यावे.
  • पीक फेरपालट

  • कोरडवाहू जमिनीत कापूस-ज्वारी किंवा सोयाबीन आणि बागायती कपाशीसाठी कापूस–गहू किंवा कापूस-उन्हाळी भुईमूग अशी फेरपालट करावी. भेंडी, टोमॅटो, अंबाडी किंवा हरभरा लागवड केलेल्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये.
  • वाणांची निवड

  • रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील वा प्रतिकारक तसेच रोगांना बळी न पडणारे वाण निवडावे. तसेच कमी कालावधीच्या (१५०-१६० दिवस) वाणाची लागवड करावी.
  • पेरणीची वेळ : बागायती कपाशीची लागवड मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. कोरडवाहू कपाशीची लागवड ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यावर करावी.
  • तणनियंत्रण व आंतर मशागत

  • पीक तीन आठवड्याचे झाल्यावर पहिली खुरपणी करावी. लगेच कोळपणी करावी. त्यानंतर सहा आठवड्यांनी दुसरी निंदणी व कोळपणी करावी. पिकास दोन खुरपणी आणि ३ ते ४ कोळपण्या कराव्यात.
  • आश्रय ओळीची (रेफ्युजी) लागवड बीटी वाणासोबत बिगर बीटी वाणाचे स्वतंत्र पाकीट दिलले असते. त्याची लागवड बीटी कपाशीच्या सर्व बाजूंनी पाच ओळी या पद्धतीने करावी. ज्या वाणांच्या बीटी बियाण्यांतच बिगर बीटी बियाणे मिसळलेले (रेफ्युजी इन बॅग) असेल तर वेगळ्या आश्रय ओळी लावण्याची गरज नाही.

    लागवडीचे अंतर

  •   कोरडवाहू लागवड :  १२० x ४५ सेंमी  (४ x दीड फूट)
  •   बागायती लागवड : १५० x ३० सेंमी (५ x एक फूट) किंवा १८० x ३० सेंमी (६ x एक फूट)
  •   बियाण्याचे प्रमाण : २.५ ते ३ किलो प्रतिहेक्टर
  • सिंचन बागायती कापूस मे महिन्याच्या अखेरीस लावल्यानंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीकवाढीच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी द्यावे.

    पातेगळ रोखणे शरिरक्रियात्मक कारणामुळे होणारी पातेगळ रोखण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एनएए) या संजीवकाची २१ पीपीएम (७ मिलि प्रति १५ लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.

    अतिरिक्त कायिक वाढ रोखणे  अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी पीक ७५ ते ९० दिवसांचे झाल्यावर शेंडा खुडावा किंवा क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ नियंत्रक ४ मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाद्वारे फवारणी करावी.

    एकात्मिक कीडनियंत्रण व्यवस्थापन

  • बीजप्रक्रिया : बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्लोप्रीड किंवा थायामेथोक्झाम (७० डब्ल्यूएस) ५ ते ७ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे बीजप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे सुरवातीला १५ ते २० दिवस रस शोषण करणाऱ्या किडींपासून संरक्षण मिळते.
  • रोग व रस शोषक कीटक यांना प्रतिकारक्षम किंवा सहनशील वाणांची लागवड करावी.
  • सुरवातीच्या काळात इमिडाक्लोप्रीडचा वापर टाळावा. पहिली फवारणी शक्य तेवढी लांबवावी. त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होईल.
  • तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे (स्पोडोप्टेरा लिट्युरा) अंडीपुंज व लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
  • सुरवातीच्या काळातील दुय्यम किडी उदा. करडे भुंगेरे, पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, ऊंट अळ्या, केसाळ अळ्या कमी प्रमाणात आढळून येतात. त्यांच्यासाठी शक्यतो कीटकनाशकाची फवारणी करू नये.
  • पिवळे चिकट सापळे लावावेत.
  • वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकाचा वापर करावा. यात पाच टक्के निंबोळी अर्काची अथवा अझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) एक मिलि प्रतिलिटर किंवा अझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) २.५ मि.लि. प्रतिलिटर प्रमाणात फवारणी करावी.
  • पिठ्या ढेकणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीजन्य कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • तंबाखूवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा लिट्युरा) अळीच्या नियंत्रणासाठी एसएलएनपीव्ही (५०० एलई) हे विषाणूजन्य कीटकनाशक दोन मिलि प्रतिलिटर पाणी किंवा नोमुरीया रिलाई या बुरशीजन्य कीटकनाशकाची चार ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.
  • गुलाबी बोंड अळीसाठी ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीच्या अंड्यांचे कार्ड (१.५ लाख अंडी/ हे.) पिकावर लावावीत.
  • - बी. व्ही. भेदे,  ७५८८०८२०२८ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com