नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी वाढली रंगत...

नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी वाढली रंगत...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी वाढली रंगत...

पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील देखणा नृत्याविष्कार, ठेका धरायला लावणाऱ्या ठसकेबाज लावण्या, विनोदाच्या हास्याचे फवारे आणि त्याला शिट्ट्या-टाळ्यांची भरभरून मिळालेली दाद...अशा जल्लोषी वातावरणात ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड  सोहळा बुधवारी (ता. ८) सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात चांगलाच रंगला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबीयांना यानिमित्ताने मनोरंजनाची आगळी मेजवानी अनुभवता आली.

सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डने गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. त्यानंतर नव्या पिढीचा गायक मंगेश बोरगावकरने गायलेल्या येवो विठ्ठल...या भावगीताने वातावरण प्रसन्न केले. त्यानंतर मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते...या चित्रपटगीताने उपस्थितांच्या हृदयाला जणू हळवा स्पर्श केला. त्यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी मोरे बन्सी... गाण्यावर देखणा नृत्याविष्कार सादर केला. तर अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी सादर केलेल्या ही पोरी साजुक तुपातली...या गाण्याने उपस्थितांना चांगलाच ठेका धरायला लावला. गायिका सावनी रवींद्र यांनी सादर केलेल्या गोऱ्या गोऱ्या गालावरी, चढली प्रेमाची लाली, गं पोरी नवरी आली...या लगीन गीताने त्यात चांगलाच रंग भरला. सावनी रवींद्र आणि मंगेश बोरगावकर यांनी गायलेल्या काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार...या शेतकरी गीतावर तर अनेकांनी जाग्यावरच ठेका धरला.

हाय बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला.., रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...आणि मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना या सावनी रवींद्र यांनी गायलेल्या ठसकेबाज लावण्या आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुलेंनी सादर केलेली हा पाहुणा करतोय खाणाखुणा...आणि मी साताऱ्याची गुलछडी....लावणीवरील नृत्याविष्काराला उपस्थितांनी शिट्या आणि टाळ्यांनी भरभरून दाद दिली. स्मिता शेवाळेंनी हिंदी चित्रपटातील मिश्र गाण्यावर केलेले नृत्य आणि त्यातील अदाही उपस्थितांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या.  एकापाठोपाठ एक कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा सन्मान आणि मनोरंजन अशा रंगतदार मिलाफामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. संपूर्ण कार्यक्रमात पहिल्यापासूनच भावपूर्ण, पण जल्लोषी वातावरण राहिले. बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी केले. या कार्यक्रमाचे  नियोजन विजयश्री इव्हेंटसचे निखिल निगडे यांनी केले होते.

हास्याचे फवारे अभिनेते आशुतोष वाडेकर आणि चेतन छावडा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सादर केलेल्या छोटेखानी विनोदी नाट्याने चांगलीच करमणूक केली. योगेश सुपेकर यांनी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, दिलीप प्रभावळकर, लक्ष्मीकांत बेर्डे, मकरंद अनासपुरे, भरत जाधव या कलाकरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजांची हुबेहूब नक्कल करत काही क्षण या सर्वांना मंचावर आणले. या नेत्यांच्या बोलण्याच्या लकबीवर  रंगमंदिरात हास्याचे चांगलेच फवारे उडाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com