सीताफळातील बहार व्यवस्थापन

सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहार येतो. मात्र, पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहार धरता येतो. उन्हाळी बहाराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने दर चांगला मिळू शकतो.
सीताफळातील बहार व्यवस्थापन
सीताफळातील बहार व्यवस्थापन

सीताफळ हे कोरडवाहू आणि हलक्या ते मुरमाड जमिनीमध्येही वाढणारे महत्त्वाचे फळ पीक आहे. अत्यंत कमी पाणी, कमी खर्चात आणि अत्यल्प मशागतीमध्येही चांगला फायदा मिळवून देणारे ठरत आहे. सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरिता बहाराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहार येतो. मात्र, पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहार धरता येतो. उन्हाळी बहाराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने दर चांगला मिळू शकतो. बहार व्यवस्थापनात पुढील बाबी महत्त्वाच्या असतात. १) झाडांची छाटणी करणे मागील हंगामातील फळांची काढणी झाल्यानंतर पाण्याचा ताण व हिवाळ्यातील कमी तापमानामुळे सीताफळ झाडांची पानगळ होते. झाडे सुप्तावस्थेत जातात. अपेक्षित फळधारणा व फळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने झाडाच्या फांद्यांची हलकी छाटणी करणे आवश्यक असते. उन्हाळी बहार धरावयाचा असल्यास फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात, तर नैसर्गिक बहार धरताना मे महिन्याच्या अखेरीस छाटणी करावी. छाटणीमुळे झाडांची वाढ नियंत्रित ठेवली जाते. झाडावर मर्यादित फळे राहून, चांगला आकार मिळू शकतो. फळांची गुणवत्ताही वाढते.

  • बागेची छाटणी करताना जुन्या वाळलेल्या फांद्या, अनावश्‍यक व दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.
  • झाडाचा मध्य भाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे यांच्याशी संबंधित आहे. झाडास मिळणारा सूर्यप्रकाश कमी असल्यास फळधारणा कमी होते.
  • झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटापर्यंत मोकळी करावीत.
  • खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट लावावी.
  • झाडांवर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर १ टक्का बोर्डोमिश्रणाची (१०० ग्रॅम चुना अधिक १०० ग्रॅम मोरचूद प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी.
  • २) आर्द्रता व्यवस्थापन सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते. उन्हाळी बहरामध्ये आर्द्रता कमी झाल्याने त्याचा बागेतील फळधारणेवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा चांगली फुले लागल्याचे दिसून आले तरी अपेक्षित फळधारणा होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बागेत वाढलेले तापमान आणि कमी आर्द्रता हेच होय.

  • उन्हाळी बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे आवश्‍यक असते. त्यासाठी साधारणपणे २ ते २.५ महिने पाणी तोडून पानगळ करून घ्यावी.
  • चांगला ताण बसण्यासाठी झाडांची ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पानगळ होणे आवश्‍यक असते.
  • ताण देण्याचा काळ संपल्यावर बहार धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. बागेत पडलेली काळी पाने, रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.
  • ज्या भागामध्ये आर्द्रता कमी असते, अशा बागेत बाजरीचे आंतरपीक घ्यावे. त्यामुळे बागेत आर्द्रता राखण्यास मदत होते. सीताफळ धारणा वाढते.
  • बागेत प्लॅस्टिक मल्चिंग अथवा पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा यांच्या आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी राहतो. पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन पाण्याची बचत शक्य होते.
  • ३) पाणी व्यवस्थापन नैसर्गिक बहारात निव्वळ पावसाच्या पाण्यावरसुद्धा चांगले उत्पादन मिळते. मात्र, उन्हाळी बहारात जमिनीच्या मगदरानुसार भारी जमिनीत ५-६ व हलक्या जमिनीत ३-४ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. फळ वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. पाणी देण्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ५० ते ७० टक्के पाण्याची बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. ४) खत व्यवस्थापन बागेतील पूर्ण वाढ झालेल्या झाडांना प्रति झाड ५० किलो शेणखत व २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश अशी खतमात्रा द्यावी. नत्राची निम्मी मात्रा तसेच स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा त्यानंतर ३० दिवसांच्या अंतराने द्यावी. डॉ. युवराज बालगुडे, ९८९०३८०६५४ (सहाय्यक प्राध्यापक - वनस्पती रोगशास्त्र, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com