पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची वेगळी ओळख

गाईंचा हवेशीर गोठा
गाईंचा हवेशीर गोठा

शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीमुळे जगामध्ये उत्तम दुग्धव्यवसायासाठी नेदरलॅंड या देशाने वेगळी ओळख तयार केली आहे. येथील सरकारने पशुपालन उद्योगासाठी नेदरलॅंड फूड अँड कंझ्युमर प्रॉडक्‍ट सेप्टी ॲथॉरटी ही स्वतंत्र संस्था स्थापन केली आहे. या संस्थेद्वारे देशभरातील शेती आणि पशुपालन उद्योग व्यवसायाचे नियंत्रण केले जाते. 

दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि बीफचा मोठा उत्पादक आणि जास्तीत जास्त निर्यात करणारा देश म्हणून नेदरलॅंडची (हॉलंड) ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगात केलेल्या अथक परिश्रमामुळे नेदरलॅंडने स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. अत्यंत नियोजनबद्ध वाटचाल, पशुपालनासाठी कडक नियम आणि त्याची अंमलबजावणी हे यासाठी कारणीभूत आहे. येथील सरकारने पशुपालन उद्योगासाठी नेदरलॅंड फूड आणि कंझ्युमर प्रॉडक्‍ट सेप्टी ॲथॉरटी ही स्वतंत्र संस्था स्थापन केली आहे. या संस्थेद्वारे देशभरातील शेती आणि पशुपालन उद्योग व्यवसायाचे नियंत्रण केले जाते.   गोठ्यामध्ये किती जनावरे ठेवायची, त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे, जनावरांच्यापासून मिळणारे दूध आणि मासांची गुणवत्ता कशी असावी, आरोग्यदायी उत्पादन कसे घेतले पाहिजे याबाबत संस्था पशुपालकांना मदत करते. पशुवैद्यकामार्फत वापरण्यात येणारी प्रतिजैवके कोणत्या प्रकारची असावीत, त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम, त्याचबरोबर एखाद्या प्रतिजैवकाला दाद न देणारे जिवाणू निर्माण होणार नाहीत आणि त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊनच त्याचा वापर करण्याविषयी कडक कायदे तयार केले आहेत. हे सर्व कायदे काटेकोरपणे पशुपालकांच्याकडून पाळले जातात. वेळोवेळी संस्थेतर्फे तपासणीदेखील करण्यात येते. त्यामुळे या देशातील दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस प्रक्रिया पदार्थांची गुणवत्ता चांगली आहे. उच्च दर्जाचे व्यवस्थापन, समतोल आहार, नियमित लसीकरण, उत्पादित दुधाची प्रत आणि भेसळ प्रतिबंधक कडक कायदे, कमीतकमी मानवी संपर्क, याचबरोबर रेकॉर्ड नोंदणीमुळे जनावरांना कमीतकमी उपचाराची गरज भासते. येथील पशुवैद्यकाचा जास्तीत जास्त वेळ पशुसंवर्धनविषयक मार्गदर्शनात जातो. शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीमुळे जगातील उत्तम दुग्धव्यवसायासाठी नेदरलॅंड देशाने वेगळी ओळख तयार केली आहे.

असे आहे गाईंचे व्यवस्थापन

  •  पशुपालकांच्या गोठ्यात होल्स्टिन फ्रिजियन गाईंचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. या देशातील जातिवंत दुधाळ गाई प्रतिदिन २८ ते ३२ लिटर दूध देतात.
  •   दुधामध्ये सरासरी फॅट ४.३ असते.   ठरावीक दिवसांच्या अंतराने पशुवैद्यकाच्या प्रत्यक्ष भेटीत सर्व गाईंची आरोग्य तपासणी करतात. तपासणीनुसार पशुपालकाला मार्गदर्शन केले जाते.
  • फार्मच्या नोंदवहीत प्रत्येक गाईची नोंद असते. यामध्ये खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, दुग्धोत्पादन आणि वाढीच्या टप्‍प्यांची नोंद ठेवली जाते.
  • पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण, उपचार आणि कृत्रिम रेतन केले जाते. काही ठिकाणी फार्म मालक स्वत: कृत्रिम रेतन करतात. प्रत्येक रेतनाची शास्त्रीय नोंद ठेवली जाते.
  •   प्रत्येक गाईचे आरोग्य चांगले राहील याकडे काटेकोर लक्ष दिले जाते. स्वच्छ आणि आरोग्यदायी दुग्धोत्पादनावर येथील पशुपालकांचा भर आहे.
  • मजूरटंचाई आणि वेळेची बचत होण्यासाठी गोठ्यामध्ये यांत्रिककरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दूध काढणी, पशुआहार मिश्रण याचबरोबरीने गोठ्यातील शेण गोळा करण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. काही ठिकाणी यंत्रमानवांचा वापर वाढला आहे.
  • गाईंपासून उत्पादित दूध हे रोगजंतू आणि कोणत्याही प्रकारच्या भेसळीपासून मुक्त असण्यासाठी गुणवत्तेच्या सर्व कसोट्या काटेकोर पद्धतीने पाळल्या जातात.
  • गाईंवर उपचार केल्यानंतर त्याची नोंद ठेवली जाते. औषध उत्पादक कंपनीचे नाव, बॅच क्रमांक, उत्पादन तारीख आणि वापर करण्यायोग्य तारीख याची नोंद ठेवली जाते.
  • गोठ्यामधील प्रत्येक गाय, वासराची संगणाकावर नोंद ठेवलेली असते. प्रत्येक जनावर हे नोंदणीकृत असल्यामुळे कृत्रिम रेतन, गर्भतपासणी, लसीकरण नोंदी या संगणकीकृत पद्धतीने ठेवल्या जातात. पशुपालन हे पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने केल्यामुळे येथील नोंदणीला फार महत्त्व आहे.
  • गोठ्यामध्ये दुधाळ गाई, भाकड गाई, गाभण गाई आणि वासरांच्यासाठी स्वतंत्र विभाग ठेवलेले आहेत.
  • गाईंना दुग्धोत्पादनाच्या प्रमाणात पशुखाद्य, वैरण दिली जाते. प्रत्येक गाईला टोटल मिक्स राशन पद्धतीनेच मिश्र पशुखाद्य दिले जाते.
  • पशुपालक उपलब्ध जमिनीत चाऱ्याचे उत्पादन घेतात. अतिरिक्त चाऱ्यापासून मूरघास तयार केले जाते. तसेच सुक्की वैरणदेखील तयार केली जाते.
  • वर्षांतील १२० दिवस या गाईंना कुरणात चरण्यासाठी सोडलेले असते. येथे प्रत्येक पशुपालकाच्याकडे मोठी चराऊ कुरणे आहेत. जे पशुपालक कुरणात गाईंना चरावयास सोडतात त्यांना सरकारतर्फे जास्तीचे अनुदान दिले जाते. याचे कारण म्हणजे या पद्धतीमुळे हरित वायूचे प्रसारण कमी होऊन पर्यावरणाला फारसे नुकसान होत नाही. त्यामुळे येथील पशुपालक मुक्त संचार पद्धतीने गाईंच्या व्यवस्थापनावर भर देऊ लागले आहेत.
  •  गोठ्यामध्ये जातिवंत दुधाळ गाई तयार होण्यासाठी कृत्रिम रेतनाचा वापर केला जातो. याचबरोबरीने आता सेक्स सॉर्डेड सिमेनचा वापर येथील पशुपालक करू लागले आहेत. परंतु, दुग्धोत्पादनाच्या बरोबरीने मांस उत्पादनासाठी गाई तसेच नर वासरांचे संगोपन केले जाते.
  •   दुग्धव्यवसायात यांत्रिकीकरणाचा समावेश मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्यामुळे कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त जनावरे सांभाळणे शक्‍य झाले आहे. यंत्रानेच गाईंचे दूध काढले जाते. प्रत्येक गोठ्यात बल्क कुलरची सोय असल्याने दुधाची प्रत उत्तम राखली जाते.
  •   विविध कंपन्या पशुपालकांच्या गोठ्यातून दूध गोळा करतात. त्यानंतर या दुधाची कंपन्या ब्रॅंन्ड नेमने मोठ्या मॉलमध्ये विक्री करतात. दुग्धजन्य पदार्थनिर्मितीसाठी शिल्लक दुधाचा वापर केला जातो.
  • प्रक्रिया उत्पादनांना जागतिक मागणी

    नेदरलॅंडमधील पशुपालक तसेच विविध उद्योगसमूह दुग्धोत्पादनाच्याबरोबरीने प्रक्रिया उद्योगामध्ये देखील आघाडीवर आहेत. उत्पादित दुधापासून मोठ्या प्रमाणात चीजचे उत्पादन घेतले जाते. मुरवलेले चीज त्याचबरोबरीने विविध स्वादाचे चीज आणि दही येथील उद्योग समूह बनवितात. चीजनिर्मितीसाठी दुधाची गुणवत्ता, निर्मिती तंत्रज्ञान, अनुकूल हवामान हे घटक महत्त्वाचे ठरतात. या देशात गाईच्या दुधाच्या बरोबरीने शेळ्या आणि मेंढ्यांच्या दुधापासून गुणवत्तापूर्ण चीजची निर्मिती केली जाते. या देशातून जगभरात चीज आणि विविध स्वादाच्या दह्याची निर्यात केली जाते.

    - डॉ. व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५ (लेखक पशुसंवर्धन विभागामध्ये  सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com